Tomato Market : नियोजनातून टळेल लाल चिखल

Tomato Rate : लागवडीचे योग्य नियोजन, मागणीनुसार देशांतर्गत तसेच विदेशी बाजारात पुरवठा आणि प्रक्रिया उद्योग वाढले, तर टोमॅटोचा लाल चिखल होणार नाही.
Tomato Market
Tomato Market Agrowon
Published on
Updated on

Tomato Crop : एक क्रेट (३० किलो) टोमॅटो बाजारात नेण्यासाठी म्हणजे तोडणी, हाताळणी, प्रतवारी आणि वाहतूक याकरिता जवळपास ६० ते ७० रुपये खर्च येतो. सध्या टोमॅटोला ३५ रुपये प्रतिक्रेट अर्थात ८५ पैसे प्रतिकिलो दर मिळत आहे.

टोमॅटो तोडणी करून बाजारात न्यायचा म्हटले, तर प्रतिक्रेट ३५ रुपये उत्पादकांना खिशातून घालावे लागत आहेत. त्यामुळे बहुतांश टोमॅटो उत्पादकांनी उभ्या टोमॅटो पिकात जनावरे सोडली आहेत, तर काही उभ्या टोमॅटोच्या शेतात रोटर फिरवत आहेत. साहजिकच टोमॅटो पट्ट्यात सर्वत्र लाल चिखल पाहावयास मिळतोय.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष म्हणजे टोमॅटो शिवारात वर्षभरात अनेकदा असेच चित्र दिसते. सुमारे दोन-अडीच महिन्यांपूर्वी जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात मागणी-पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन अल्प काळासाठी टोमॅटोचे दर थोडे वधारले होते. त्या वेळी लगेच खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने टोमॅटो आयातीचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करून तो ग्राहकांना सवलतीच्या दरात विकण्याचेही ठरविले.

खरे तर टोमॅटोच नाही, तर कोणत्याही भाजीपाल्याचे दर थोड्या काळासाठी वधारले, तर सर्वसामान्य ग्राहक ते खरेदी करणे टाळतात. त्यामुळे दर वाढलेले असताना टोमॅटो आयात करून तसेच सवलतीच्या दरात ग्राहकांना पुरवून केंद्र सरकारने काय साध्य केले, हा खरा प्रश्‍न आहे. आम्हाला ग्राहकांची खूप काळजी आहे, हे दाखविण्यापलीकडे यातून काहीही साध्य झाले नाही. मागील चार-पाच वर्षांत बहुतांश वेळा शेतकऱ्यांना टोमॅटोचे पीक घेणे परवडत नसल्याने लाल चिखल करावा लागला. त्या वेळी मात्र उत्पादक शेतकरीहितार्थ सरकार पुढे येताना दिसत नाही.

Tomato Market
Tomato Market : आता नकोच ‘लाल चिखल’

राज्यातील टोमॅटो उत्पादक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यामुळे टोमॅटोचे उच्चांकी उत्पादन मिळते आणि खर्चही वाढत आहे. त्यात बहुतांश वेळा दर दगा देत असल्याने टोमॅटो उत्पादकांची हतबलता वाढली आहे. टोमॅटोला बाजारात सर्वाधिक मागणी असते. राज्यातील टोमॅटो देशांतर्गत बाजारात व्यवस्थित (मागणीनुसार) पोहोचविता आला तर उत्पादकांना हे पीक नेहमी पैसा देऊन जाते. यासाठी हंगामनिहाय कोणत्या राज्यात, कधी टोमॅटोची मागणी वाढते, कधी कमी असते यानुसार लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांनी करायला हवे.

कृषी तसेच पणन विभागाने यात शेतकऱ्यांना सहकार्य करावे. टोमॅटो हे सर्वाधिक नाशवंत पीक असल्याने शीत साठवणूक, तसेच टिकवणक्षमता वाढविण्याच्या सुविधा विकसित करायला हव्यात. काही देशांनी ‘सेल्फ लाइफ’ अधिक असलेली टोमॅटो वाण विकसित केली आहेत, तर काही देश टोमॅटोची योग्य काढणी, प्रतवारी आणि शीत साठवणुकीद्वारे २० ते ३० दिवसांपर्यंत टोमॅटो उत्तमरीत्या टिकवून ठेवतात.

Tomato Market
Tomato Rate : शिवारातच टोमॅटोचा लाल चिखल

चीनमध्ये जेव्हा फळभाज्या अथवा इतर फळांचे भाव कमी असतात, तेव्हा शेतकरी फळांची पक्वता रोखण्यासाठी विशिष्ट संप्रेरकांचा सौम्य फवारा मारतात, जेणेकरून बाजारात योग्यभाव येताच शेतकऱ्यांना फळांची तोडणी करणे शक्‍य होते. त्यासाठी सरकार सर्व प्रकारची मदत करते.

तिथे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या नाशिवंत फळे व भाज्यांची साठवण करण्यासाठी अद्ययावत शीतगृहेदेखील आहेत. जगभरात मागील दीड-दोन दशकांपासून अतिनील किरणांच्या वापराद्वारे टोमॅटोच नाही, तर विविध फळ-भाजीपाल्याची टिकवणक्षमता वाढविण्याचे प्रयोगही सुरू आहेत.

असे नुकसान कमी करणारे संशोधन, तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांना कधी मिळणार? टोमॅटोवर प्रक्रिया करून सॉस, चटणी, केचअप, लोणचे आदी अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. असे प्रक्रिया उद्योग टोमॅटो पट्ट्यात उभे करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट यांसह उद्योजकांनी पुढे यायला पाहिजे.

असे झाले तर प्रक्रिया उद्योगाकडून टोमॅटोची मागणी वाढेल. ताजे टोमॅटो तसेच टोमॅटोचे प्रक्रियायुक्त पदार्थ यांची निर्यातही शेजारील देशांबरोबर आखाती, युरोपियन देशांत वाढायला हवी. असे झाले तर टोमॅटोचा लाल चिखल करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com