Cotton Pest : वेळीच ओळखा, ‘गुलाबी’ विळखा

Cotton Pink Bollworm : मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंडअळीचा धुमाकूळ आणि त्यातून होणारे कापसाचे नुकसान, उत्पादनातील घट पाहता शेतकऱ्यांमध्येथोडे चिंतेचे वातावरण आहे.
Cotton Pink Bollworm
Cotton Pink Bollworm Agrowon
Published on
Updated on

Cotton Production : गुलाबी बोंडअळीसाठी मागील हंगामातील पीक निघाल्यानंतर शेतातील पऱ्हाट्यांच्या विल्हेवाटीपासूनच पुढील हंगामासाठीची खबरदारी घ्यावी लागते. यावर्षी आत्तापर्यंतच्या चांगल्या पाऊसमानामुळे कापूस, सोयाबीन या मुख्यपिकांसह इतरही खरीप पिकांची परिस्थिती चांगली आहे.

सोयाबीनवर अळीवर्गीय किडींचा प्रादुर्भाव कमी आहे, तर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांतील प्रक्त्र षे भेटी दरम्यान त्यांना कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंडअळीचा धुमाकूळ आणि त्यातून होणारे कापसाचे नुकसान, उत्पादनातील घट पाहता शेतकऱ्यांमध्येथोडे चिंतेचे वातावरण आहे. मात्र, तातडीने योग्य त्या उपाययोजना केल्या तर या किडीमुळे होणारे नुकसान टाळणे शक्य असल्याचा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांत २०१५ मध्ये बोलगार्ड २ कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. तेव्हापासून बोलगार्ड २ प्रति प्रतिकारशक्ती विकसित करीत गुलाबी बोंडअळी घातक होत चालली आहे.

राज्यात गुलाबी बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावास वर्षभर चालत असलेली कापसाची शेतीही जबाबदार आहे. आपल्याकडे जूनमध्ये लागवड केलेला कापूस मेपर्यंत शेतात राहतो. तर मॉन्सूनपूर्व कापसाची लागवड मे महिन्यातच केली जाते. त्यामुळे गुलाबी बोंडअळीला वर्षभर खाद्य तसेच आश्रयही मिळत राहतो. एकंदरीत हे वातावरण गुलाबी बोंडअळीस पोषक ठरत आह.

Cotton Pink Bollworm
Cotton Pest : कापसातील तुडतुड्यांचा प्रादुर्भाव असा ओळखा

गुलाबी बोंडअळीच्या प्रत्यक्ष शेतातील प्रादुर्भाव झाल्यानंतर या किडीला नियंत्रणात ठेवणे थोडे कठीणच आहे. त्यामुळे मागील हंगामातील कापसाचे पीक निघाल्यानंतर पऱ्हाट्यांच्या विल्हेवाटीपासून पुढील हंगामासाठीची खबरदारी घ्यावी लागते.

परंतु गुलाबी बोंडअळीच्या प्रतिबंधात्मक उपायांबाबत व्यापक प्रबोधनच झालेले नसल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा वापर शेतकऱ्यांकडून होताना दिसत नाही. परिणामी प्रादुर्भाव आढळून आल्यावर नियंत्रणात्मक उपाय योजनांवरच शेतकऱ्यांना भर द्यावा लागतो. त्यातून प्रभावी नियंत्रण होत नाही.

त्यामुळे कापसाचे उत्पादन घटून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापसाचे फरदड घेऊ नये, पूर्व हंगामी कापसाची लागवड उत्पादकांनी टाळायला हवी. हंगामात शेतात, वखाराभोवती, जिनिंग मिल्स, मार्केट यार्डाभोवती प्रकाश सापळे लावल्यास, त्यात पतंग अडकून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो.

कापसाचे पीक निघाल्यानंतर शेत स्वच्छता मोहीम, उन्हाळ्यात खोल मशागत तसेच बीटी कापसाची लागवड करताना नॉन बीटी बियाण्याचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा. हिरव्या बोंड अळीप्रमाणे गुलाबी बोंडअळी प्रतिकारक्षम जनुकीय वाण शेतकऱ्यांना मिळायला हवीत.

प्रगत देश बीजी-७ पर्यंत पोहोचलेले असताना आपण बीजी-२ वरच अडकलेले आहोत. कापसाची लागवड करताना भेंडीसह इतरही काही सापळा पिकांचा वापर शेतकऱ्यांनी आवर्जून केला पाहिजे. कापूस पिकास युरियाचा अतिरिक्त वापर टाळला पाहिजेत.

पीक ९० दिवसांचे होईपर्यंत दर आठवड्यात पीक सर्क्षवेण करून डोमकळ्या वेचून त्या अळ्यांसहित नष्ट कराव्यात. एकरी दोन फेरोमोन सापळे लावून सापळ्यात अडकलेले पतंग किमान दर आठवड्याने नष्ट करावेत.

शेतात प्रकाश, कामगंध सापडे तसेच ट्रायकोकार्ड देखील वापरायला हवेत. रासायनिक कीडनाशकांच्या फवारणी आधी वनस्पतिजन्य, जैविक कीडनाशकांचा वापर झाला पाहिजेत. एवढे करूनही गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास रासायनिक कीडनाशकांचा शिफारशीप्रमाणे वापर झाला पाहिजेत. कापूस उत्पादक पट्ट्यात प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय योजना सामूहिकरीत्या केल्यास गुलाबी बोंडअळीपासून होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com