Team Agrowon
सध्या रोपावस्था ते शाकीय वाढीच्या दरम्यान (पेरणीपासून ४० दिवसांपर्यंत) असलेल्या कपाशी पिकात तुडतुडे या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
सुरुवातीच्या शाकीय वाढीच्या अवस्थेतील पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येऊन नये यासाठी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वेळेत रोखणे गरजेचे आहे.
तुडतुडे ही कीड पोपटी रंगाची व त्रिकोणी आकाराची असून पंखांच्या मागील बाजूस गर्द काळे दोन ठिपके दिसतात. ही कीड तिरकस चालते (इंग्रजी झेड Z आकारासारखी).
पिल्ले आणि प्रौढ दोन्हीही कोवळ्या पानाच्या खालील बाजूस राहून रसशोषण करतात. त्यामुळे पाने खालच्या बाजूला वळलेली (वाकडे झालेले) दिसतात.
पानांच्या कडा सुरुवातीला पिवळसर बनतात. कालांतराने पिवळ्या रंगाचे लाल/तांबूस तपकिरी रंगात रूपांतर होऊन पीक लालसर झालेले दिसते.
वाढीच्या प्रारंभिक अवस्थेत आलेला लालसरपणा हा अनेकदा शेतकऱ्यांना लाल्या विकृतीबाबत संभ्रमित करतो.
मॅग्नेशिअम अथवा नत्राच्या कमतरतेमुळे बोंड लागणे ते त्याचा विकास होणे या अवस्थेत (९० दिवसांपासून पुढे) लाल्या आणि तुडतुडे प्रादुर्भाव दिसून येतो.
त्यामुळे सुरुवातीच्या काळात (६० दिवसांपेक्षा कमी) आलेला व नंतरचा लालसरपणा यातील फरक ओळखणे अत्यंत गरजेचे आहे.