
Milk Quality : राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने एकाच दिवशी हजाराहून अधिक दूध नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. नमुने तपासणीअंती यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.
खरे तर दसरा-दिवाळी असे सणासुदीचे दिवस आले की दूध, दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. याचा फायदा घेत भेसळखोर दुधात भेसळ करतात, कृत्रिम दुधाची निर्मिती करतात. दुधातच भेसळ होत असल्याने दुग्धजन्य पदार्थांतही मोठ्या प्रमाणात भेसळ होते. राज्यात उन्हाळी हंगामाची चाहूल लागताच दूध उत्पादन घटते शिवाय या काळातील लग्नसमारंभामुळे दुधाची मागणी वाढते आणि त्यातील भेसळही वाढत जाते.
राधाकृष्ण विखे पाटील दुग्धविकासमंत्री असताना त्यांनी राज्यात ३० टक्के दूध भेसळयुक्त असल्याची कबुली दिली होती. दुधात इतकी भेसळ होत असेल, तर हा दूध उत्पादकांबरोबर ग्राहकांच्याही जिवाशी खेळच म्हणावा लागेल. अशावेळी कुठे तरी भेसळीची तक्रार झाली म्हणून किंवा अन्न व औषध प्रशासन विभागाला आठवले तर पाठवले म्हणून नाही, तर दूध नमुने तपासणी ही या विभागाची नियमितचीच एक प्रक्रिया असली पाहिजे.
एकीकडे वाढता दूध उत्पादन खर्च, दुधाला मिळणारा कमी दर यामुळे उत्पादक मेटाकुटीस आलेले आहेत, तर दुसरीकडे भेसळखोर मात्र दुधात पाणी, पावडर, स्टार्च, साखर, ग्लुकोज, युरिया, मीठ, न्यूट्रिलायजर, हायड्रोजन पेरॉक्साइड, डिटर्जंट यांसारख्या पदार्थांची भेसळ करून, एवढेच नाही तर पूर्णपणे रसायनयुक्त कृत्रिम दूध तयार करून विक्री करीत आहेत.
अशा प्रकारच्या भेसळयुक्त व कृत्रिम दुधाच्या सेवनाने ग्राहकांना क्षयरोग, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पोटाचे आजार, यकृत-मूत्रपिंड निकामी होणे आदी दुर्धर रोगांचा सामना करावा लागत आहे. लहान मुलांची वाढ खुंटून त्यांच्यात विविध शारीरिक विकृती पुढे येत आहेत. दूध भेसळीमुळे टंचाई काळात दुधाचा महापूर येऊन दर पडत आहेत. दुधाची भेसळ कमी झाली तर ग्राहकांना आरोग्यदायी दूध मिळेल, दुधाची मागणी वाढून उत्पादकांना चांगला दर मिळेल.
दूध भेसळखोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार, देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणार, भेसळखोरांना थेट फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा घोषणा राज्य सरकारकडून अनेकदा झालेल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात थातूर मातूर कारवाईच्या पुढे काहीही घडले नाही. त्यामुळे भेसळखोरांचेही फावते आहे. प्रश्न केवळ दुधातील भेसळीचाच नाही दुधाऐवजी पाम ऑइल, वनस्पती तूप, व्हे पावडर, माल्टोजसारखे केमिकल्स वापरून बनावट पनीर बनविले जात आहे.
कृत्रिम खवा, मिठाई, बटर, तूप, आइस्क्रीम, दुधाचा वापर न करता इतर स्वस्त पदार्थांपासून बनावट पद्धतीने बनविले जात आहेत. दुधातील भेसळ रोखण्याचे काम अन्न व औषधी प्रशासनाकडे आहे. मात्र अत्यल्प मनुष्यबळ व अत्यल्प इच्छाशक्ती असल्याने या विभागाकडून दूध भेसळ रोखण्याचे काम होताना दिसत नाही. अन्न व औषध प्रशासनाने त्यामुळे हे काम दुग्ध विकास विभागाकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी सातत्याने होत असते, परंतु त्यावर निर्णय होताना दिसत नाही.
असे हस्तांतर होईपर्यंत पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग तसेच अन्न व भेसळ प्रशासन विभागाचे नेमके अधिकार स्पष्ट झाले पाहिजेत. दूध भेसळीबाबत नेमकी कायदेशीर कारवाई काय करायची, यातही स्पष्टता हवी. दूध भेसळखोरी कुठे उघडकीस आली, तर त्यांना वाचविण्यासाठीचा राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे थांबायला हवा. भेसळखोरांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजेत. अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तरच दूध भेसळीचा भस्मासुर गाडला जाईल, हेही तेवढेच खरे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.