Sahyadri Farm : सह्याद्री’ची पताका

Sahyadri Farm Success : अपयशाला न घाबरता धीराने आणि दूरदृष्टीने वाटचाल करणाऱ्या विलास शिंदे यांचे नेतृत्व आणि त्यांचे झपाटून काम करणारे सहकारी, कर्मचारी यांचा ‘सह्याद्री’च्या यशात मोलाचा वाटा आहे.
Sahyadri Farm
Sahyadri FarmAgrowon
Published on
Updated on

Sahyadri Farmers Producer Company : नाशिकमधील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या देदीप्यमान वाटचालीचा आलेख सातत्याने उंचावतो आहे. महाराष्ट्रासह देशभरातील कृषीक्षेत्र विविध संकटांच्या झाकोळाखाली काळवंडलेले असताना फलोत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या कंपनीचे दीडेक दशकातील यश नजरेत भरण्यासारखे आहे.

आपल्याकडे फक्त ऊस आणि दूध या दोनच कच्च्या मालांना मूल्य प्रदान करणारी साखळी विकसित झाली. स्वातंत्र्यानंतरच्या पाऊण शतकात शेती क्षेत्रात सांगण्यासारखे इतकेच आपण करू शकलो. तशी ही लाजिरवाणी बाब, पण लाज वाटून घेण्याइतकी संवेदनशीलता आपल्या राजकीय नेतृत्वाकडे उरली आहे काय हा कळीचा प्रश्न! नाही म्हणायला फलोत्पादनात आपण परिपूर्ण मूल्यसाखळी उभी करू शकलो नसलो तरी बरेच काही भरीव घडते आहे.

Sahyadri Farm
Sahyadri Farm : सह्याद्री फार्म्समध्ये ३९० कोटींची नवीन गुंतवणूक

फलोत्पादनासाठी गुंतवणूक अधिक होत असली तरी आस्मानी आणि सुल्तानी कहर झाला नाही तर परतावाही तितकाच आकर्षक मिळतो. त्यामुळे कितीही संकटे आली तरी न डगमगता शेतकरी फलोत्पादनात सातत्य ठेवण्याची जोखीम पत्करतो. ही जोखीम विभागता यावी, त्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड मिळावी, अधिक उत्पादनासाठी परदेशातून नवे वाण आणता यावेत,

सामूहीक ताकदीमुळे बाजारावर नियंत्रण ठेवता यावे यासाठी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी सुरू झाली. अनेक प्रयोगांत अपयश आल्यानंतरही जिद्दीने कृषी क्षेत्रातच कार्यरत राहिलेल्या कृषी पदवीधर विलास शिंदे यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या तरूणाचे नेतृत्व या उपक्रमाला लाभले ही सर्वांत जमेची बाजू!

Sahyadri Farm
Sahyadri : सह्याद्री हे असे मोहक रूप दाखवतं!

‘सह्याद्री’मध्ये युरोप आणि अमेरिकेतील या कंपन्यांनी ३९० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याआधीही ३१० कोटींची परकीय गुंतवणूक ‘सह्याद्री’ला मिळाली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या एका कंपनीमध्ये परदेशी कंपन्या गुंतवणूक करत आहेत, यातून या कंपनीची पत किती उंचावलेली आहे हेच दृग्गोचर होते. पत आणि प्रतिष्ठा ही शेतकऱ्याच्या दृष्टीने मोलाची गोष्ट. सबंध शेती क्षेत्रात आज त्याचाच अभाव जाणवतो.

शेतकऱ्यांच्या मानसिक, आर्थिक खच्चीकरणाचे ते एक कारण. सातत्याने नागवल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना पत आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम ‘सह्याद्री’ करते आहे. एक काळ असा होता की बँका ‘सह्याद्री’ला कर्ज द्यायला नकार देत होत्या. आज परिस्थिती अशी आहे की देश-परदेशातील अनेक बँकांचे संचालक-अधिकारी, आमच्याकडूनच कर्ज घ्या आणि तेही कमीत कमी व्याजदरात, असा प्रस्ताव घेवून ‘सह्याद्री’च्या दारात प्रतीक्षा करत असतात.

ही जादू एका रात्रीत घडलेली नाही. अपयशाला न घाबरता धीराने आणि दूरदृष्टीने वाटचाल करणाऱ्या विलास शिंदे यांचे नेतृत्व आणि त्यांचे झपाटून काम करणारे सहकारी, कर्मचारी यांचा या यशात मोलाचा वाटा आहे. ‘सह्याद्री’शी जोडले गेलेले २५ हजारांवर प्रयोगशील शेतकरी तर या कंपनीचा कणा. सुरवातीला केवळ द्राक्षात काम करणारी ही कंपनी आता अनेक फळ पिकांमध्ये आणि काश्मीरसह अनेक राज्यांमध्ये काम करते आहे.

तिचा परीघ दिवसेंदिवस विस्तारतो आहे. गेल्या वर्षीच उलाढालीचा १५०० कोटींचा टप्पा पार केल्यांनतर आता भांडवल बाजारात पदार्पणाचे वेध ‘सह्याद्री’ला लागले आहेत. आगामी वर्षात कंपनीच्या वाढीचा वेग ४० टक्क्यांवर राहण्याचा अंदाज आहे. हे सारे स्तिमित करणारे, महाराष्ट्रातील कृषिवलाचा स्वाभिमान उंचावणारे आहे. उत्तम नेतृत्व लाभले तर आकाशालाही गवसणी घालता येते, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणारी ‘सह्याद्री’ महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील नवे तीर्थक्षेत्र आहे. डोळे भरून अनुभवावी, जमेल तितके अनुकरण करावे अशीच ही यशोगाथा!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com