Farmer Issue : उत्पादकांची उद्विग्नता गांभीर्याने घ्या

Soybean Farming Issue : शेती विकून पैसे बॅंकेत ठेवण्याची भाषा शेतकरी करीत असताना तोट्याची शेती आणि त्यातून निर्माण होत असलेली उद्विग्नता सर्वांनीच गांभीर्याने घ्यायला हवी.
Indian Farmer
Indian FarmerAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : कमी कालावधी, कमी खर्च, चांगले उत्पादन, बऱ्यापैकी दर, बेवड आणि आंतरपीक पद्धतीसह उत्तम, खरिपातील सोयाबीननंतर रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा घेता येत असल्याने अल्पावधीत सोयाबीन हे पीक राज्यातील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले. राज्यात खरीप हंगामात या पिकाखाली जवळपास ५० लाख हेक्टर क्षेत्र असते. सोयातेल, सोयापेंड, सोयाचंक्स अशा अनेक प्रक्रिया उद्योगात सोयाबीनचा वापर होत असल्याने औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे पीक आहे. जागतिक बाजारातही सोयाबीन, सोयापेंडची मोठी उलाढाल पाहावयास मिळते.

असे असताना मागील काही वर्षांपासून सोयाबीनचा वाढलेला उत्पादन खर्च, घटती उत्पादकता आणि मिळणाऱ्या अत्यंत कमी दरामुळे सोयाबीनची शेती उत्पादकांना परवडेनाशी झाली आहे. त्यामुळेच सोयाबीन पेरण्यापेक्षा शेती विकून पैसे बॅंकेत ठेवले तर परवडू शकते, अशा भावना उत्पादक व्यक्त करताना दिसताहेत.

Indian Farmer
Indian Farmer : स्वातंत्र्याशिवाय शेतकऱ्यांना काहीही नको

आतापर्यंत आपण पाहिले की एखादे पीक शेतकऱ्यांना परवडत नाही, असे दिसताच शेतकरी त्यावर नांगर फिरवितो अथवा त्यात जनावरे चरायला सोडतो. अर्थात, शेतकऱ्यांची उद्विग्नता त्या पिकापुरती मर्यादित असायची. परंतु राज्याच्या जिरायती भागात पिकांचे फारसे पर्याय उपलब्ध नसल्याने आणि बहुतांश पिके आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शेती विकून पैसे बॅंकेत ठेवण्याची भाषा शेतकरी करू लागले आहेत. अशावेळी तोट्याची शेती आणि त्यातून निर्माण होत असलेली उद्विग्नता सर्वांनीच गांभीर्याने घ्यायला हवी.

सोयाबीनची शेती उत्पादकांना किफायतशीर ठरण्यासाठी उत्पादकता वाढ आणि दर यावर काम करावे लागेल. सुमारे पाच वर्षांपूर्वी डाऊडी या जॉर्जिया येथील शेतकऱ्याने सोयाबीनमध्ये एकरी ५१.७७ क्विंटल उत्पादन नोंदवून जागतिक उच्चांक स्थापित केला. त्यांचे हे विक्रमी उत्पादन आपल्या राज्यातील उत्पादकतेच्या (एकरी ४ क्विंटल) १३ पटीने अधिक आहे. सोयाबीनची जागतिक सरासरी उत्पादकता देखील आपल्या उत्पादकतेपेक्षा चार पटीने अधिक (एकरी १६ क्विंटल) आहे.

Indian Farmer
Farmer Issue : अभ्यास, अहवाल अन् आत्मपरीक्षण

असे असताना आपल्या देशात एकरी १० क्विंटल उत्पादनक्षम जाती आहेत. त्यातून सरासरी एकरी चार क्विंटल उत्पादन मिळते. सोयाबीनला सध्या ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. एक एकर सोयाबीनमधून उत्पादकांना १६ हजार रुपये मिळत आहेत. सोयाबीनचा उत्पादन खर्च एकरी १६ ते २० हजार रुपये असताना शेतकरी सोयाबीनची शेती करतील कशाला, असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळेच सोयाबीनच्या अधिक उत्पादनक्षम जातींवर तसेच बियाण्याच्या गुणवत्तेवर प्राधान्यक्रमाने काम झाले पाहिजेत.

सोयाबीन पेरणीनंतर उत्पादकता वाढीसाठी तण, अन्नद्रव्य, कीड-रोग व्यवस्थापन सुधारावे लागेल. या वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये पावसाची झड असल्याने दोन वेळा तणनाशके फवारूनही व्यवस्थित तणनियंत्रण झाले नाही. शिवाय हंगामात अचानक बदलत्या वातावरणाने पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भावही अधिक दिसून आला. या सर्वांच्या परिणामस्वरूप व्यवस्थापन खर्च वाढून उत्पादन घटले आहे. त्यामुळे तण आणि कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाय द्यावे लागतील.

उत्पादक सोयाबीनला त्रस्त होण्याचे अजून एक कारण म्हणजे वाढती मजुरी आणि मजूरटंचाई. सोयाबीन शेतीचे पेरणी ते काढणी-मळणी यांत्रिकीकरण वाढायला हवे. सोयाबीनचे एकरी किमान १० क्विंटल उत्पादन आणि त्यास कमीत कमी ६ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याशिवाय ही शेती शेतकऱ्यांना परवडणार नाही. सोयाबीनला अधिक दर मिळण्यासाठी हमीभावात वाढ करावी लागेल, गाव-तालुका पातळीवर प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजेत. सोयाबीनसह त्यांचे प्रक्रियायुक्त पदार्थ निर्यातीवरही भर द्यावा लागेल. सोयाबीन प्रमाणेच इतर जिरायती पिकांत उत्पादकता वाढली आणि त्यांना अधिक दर मिळाला तरच शेती विकण्याच्या उद्विग्नतेतून शेतकरी बाहेर पडतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com