हंगाम कोणताही असो, बदलत्या हवामानाचा फटका पिकांना बसत असताना शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञान कधी मिळणार, हा खरा प्रश्न आहे.भारत - अमेरिका व्यापार करार, एप्सटिन फाइल आणि माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील काही उताऱ्यांनी देशात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे, तर दुसरीकडे तापमानाचा पाराही चढत असल्याने त्याच्या झळा सर्वसामान्य नागरिकांपासून शेतीपिकांनाही बसत आहेत. जानेवारी शेवटपर्यंत जाणविणारी बोचरी थंडी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अचानकच गायब झाली आणि उकाडा जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभर अंशतः ढगाळ वातावरण तर खानदेशमध्ये झालेल्या वादळी पावसाचा हा परिणाम आहे. .या भागात केळीसह रब्बी पिकांना वादळी पाऊस, तसेच गारपिटीचा तडाखा बसला. तापमानातील हा चढ-उतार देशभर पाहावयास मिळतो. उत्तर भारतात थंडी कमी-अधिक होत आहे, तर दक्षिणेतील काही राज्यांत तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसवर गेला आहे. आपल्या राज्यातही दोन दिवसांपूर्वी भिरा येथे (कोकण) देशातील उच्चांकी तापमानाची (३८ अंश सेल्सिअस) नोंद झाली. राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानातील चढ-उतार अजून काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. हवामान बदलाच्या या काळात ऋतू कोणताही असो, दिवस-रात्रीच्या तापमानातील मोठ्या तफावतीचा प्रतिकूल परिणाम पिकांवर होत आहे..Climate Friendly Technology Campaign: हवामान अनुकूल शेतीसाठी राज्यभर तंत्रज्ञान अभियान सुरू.पावसाळ्यातील अतिवृष्टीनंतर देशभर पाण्याच्या अधिक उपलब्धतेने रब्बी पीकपेरा वाढला. राज्याचा विचार करता रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई ही पिके अनुक्रमे कणसे, ओंब्या, घाटे, बोंडे लागण्याच्या, काही ठिकाणी परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. सध्याच्या तापमानातील मोठ्या चढ-उतारामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. नेमक्या अशावेळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने प्रतिकारशक्ती कमी झालेल्या पिकांवर अळीवर्गीय किडी तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे..आंबा, काजूसह मोहरावर असलेली फळपिके, तसेच द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी यांना देखील हे बदलते हवामान बाधिक असल्याने उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भाजीपाला पिकांमध्ये रसशोषक किडी तसेच करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोग-किडींच्या नियंत्रणासाठी फवारणीचा खर्च वाढून उत्पादन घटही संभवत असल्याने दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. अचानकच तापमानातील या चढ-उतारात पिकांची एकंदरीतच नेमकी काळजी कशी घ्यायची याचे अचूक मार्गदर्शन संबंधित कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना करायला हवे. शेतकऱ्यांनी सुद्धा या बदलावर बारकाईने लक्ष ठेवून काटेकोर पीक व्यवस्थापनावर भर द्यायला हवा, तसे ते करतीलही. परंतु नवे वाण संशोधनापासून ते पीक काढणीपर्यंत हवामान अनुकूल तंत्रज्ञान त्यांना कधी मिळणार, हा खरा प्रश्न आहे..Eco-Friendly Farming: कीड नियंत्रणात पक्षी थांब्यांचं महत्त्व काय आहे? .मागील दशकभराचा विचार केला असता बदलत्या हवामानात वाढलेल्या आपत्तींनी शेती उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. हंगाम कोणताही असो अत्यंत विपरीत अशा हवामान परिस्थितीत शेती करायची कशी, असा सवाल देशभरातील शेतकरी विचारीत आहेत. परंतु याबाबत अजून कुणाला काहीही गांभीर्य दिसत नाही. शेती मुळातच जोखीमयुक्त आहे. त्यात आता ती अधिकच जोखमीची झाली आहे..आपल्या येथील पीक पद्धतीत बदलत्या हवामानास पूरक मोठे बदल आवश्यक आहेत. पारंपरिक पिकांना पर्यायी पिके, ताण सहनशील वाणं याबरोबरच खरीप तसेच रब्बी हंगामातील पीक पेरणीच्या वेळापत्रकातही बदल अपेक्षित आहेत. पीक लागवड तसेच व्यवस्थापन पद्धतीही बदलत्या हवामानानुसार बदलाव्या लागणार आहेत. हे समजून उमजून त्यावर उपाय योजना केल्याशिवाय शेती टिकणार नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही. हवामान अनुकूल शेती तंत्रासाठी एखादा प्रकल्प राबवून नव्हे, तर देशपातळीवर मोहीम म्हणून हे काम हाती घ्यावे लागेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.