Soybean Market: सप्टेंबरमधील अतिवृष्टीनंतर आता ऑक्टोबरमध्ये उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे आपत्तीतून वाचलेले सोयाबीन पीक गोळा करून त्यापासून दोन पैसे पदरात पडतात का, हे शेतकरी पाहताहेत. देशात यंदा सोयाबीन लागवड क्षेत्रात झालेली घट आणि त्यात काढणीला आलेल्या पिकाला पावसाने दिलेल्या दणक्यामुळे उत्पादन १७ टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज ‘सोपा’ने व्यक्त केला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन मळणी केली असून, एकरी सर्वसाधारण आठ ते दहा क्विंटल उत्पादन येण्याऐवजी जेमतेम दोन-अडीच क्विंटल सोयाबीन पदरी पडत आहे. .काढणीला आलेल्या सोयाबीन पावसाने भिजल्याने त्यात ओलाव्याचे प्रमाण अधिक असून प्रतही खालावलेली आहे. त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल ५३२८ रुपये हमीभाव असला, तरी प्रत्यक्ष उत्पादकांना ३२०० ते ३७०० रुपयांपर्यंतच भाव मिळत आहे. अर्थात, प्रति क्विंटल दीड ते दोन हजार रुपयांचे उत्पादकांचे हे नुकसान आहे. यंदा दिवाळीही लवकर आल्याने सोयाबीन विकून टाकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही..Soybean Farmer Issue: सोयाबीन उत्पादकांची दिवाळी अंधारात?.कारण मूग, उडीद तर बहुतांश शेतकऱ्यांच्या हातीही लागले नाही. पहिल्या वेचणीचा कापूसही भिजला आहे. खरे तर कोणत्याही शेतीमालाचे जेव्हा उत्पादन कमी होते, त्या वेळी त्यास चांगला भाव मिळण्याची शक्यताच अधिक राहते. मात्र या वर्षी एकीकडे सोयाबीनचे उत्पादन कमी आणि दुसरीकडे भावही कमी, असा दुहेरी फटका उत्पादकांना बसत आहे..जागतिक बाजारातही सोयाबीनचे दर दबावात असल्याने भाव वाढण्याची शक्यता कमीच असल्याचे यातील जाणकारांचे मत आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे सोयाबीनसह इतरही शेतीमालास हमीभावापेक्षा थोडे अधिक दर मिळू लागले की केंद्र सरकार ते नियंत्रणात ठेवण्याचे धोरण राबविते. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने तत्काळ हमीभावात सोयाबीनची खरेदी सुरू करायला हवी. हमीभावापेक्षा कमी दर मिळत असताना अधिकाधिक शेतकऱ्यांचे सोयाबीन हे शासकीय केंद्रांद्वारेच खरेदी होईल, हेही पाहावे..Soybean Production Decline : सोयाबीन उत्पादनात १७ टक्के घट होणार.भावांतर योजना राबविणे हा देखील एक चांगला पर्याय या वर्षी ठरू शकतो. आपल्या शेजारील मध्य प्रदेश सरकार ही योजना या वर्षी सोयाबीनसाठी राबविते. परंतु आपण मात्र भावांतर योजनेबाबत अजूनही ठोस निर्णय घेत नाही. भावांतर योजनेअंतर्गत हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला तर भाव फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार जमा करते..केंद्र सरकार ज्या वेळी हमीभाव जाहीर करते, अशावेळी खुल्या बाजारातील भाव कमी झाल्यास शेतीमालास किमान हमीभावाचा आधार देण्याची जबाबदारी देखील त्यांचीच आहे. भावांतर योजना अधिक उत्पादन होणाऱ्या सर्वच राज्यांत एकाचवेळी राबविली तर बाजारात आवकही सुरळीत राहते आणि सर्वच राज्यातील उत्पादकांना त्यामुळे दिलासा मिळू शकतो..उत्पादकांना सोयाबीनची शेती किफायती ठरायची असेल तर उत्पादकता वाढीवर काम झाले पाहिजे. गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादकांना मिळायला हवे. पाने खाणाऱ्या अळीबरोबर मोझॅकसारख्या रोगाचे प्रभावी नियंत्रणाचे उपाय शेतकऱ्यांना द्यावे लागतील. भाव पाडण्यासाठी बाजारात सरकारचा हस्तक्षेप नको. आपले नॉन जीएम सोयाबीनसह, सोयातेल, पेंड जगभर पोहोचायला हवी. सोयाबीनपासूनच्या इतरही प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीसाठी उत्पादकांनी पुढे यावे. असे झाले तरच गोल्डनबीनची झळाळी वाढेल. सोयाबीन उत्पादकांची दिवाळी गोड होण्यास थोड्याफार प्रमाणात हातभारही लागेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.