Rain Prediction : आता भिस्त परतीच्या पावसावरच

Rain Update : दुष्काळी भागात सलग दोन-तीन वर्षे चांगला पाऊस पडला म्हणून तो दरवर्षी चांगलाच पडावा, अशी आशा ठेवणे व्यर्थ आहे. पण या भागातही, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत पाऊस पडतो, हा एक साधारण अनुभव आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

डॉ. रंजन केळकर

IMD Alert : दुष्काळी भागात सलग दोन-तीन वर्षे चांगला पाऊस पडला म्हणून तो दरवर्षी चांगलाच पडावा, अशी आशा ठेवणे व्यर्थ आहे. पण या भागातही, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत पाऊस पडतो, हा एक साधारण अनुभव आहे.

नैर्ऋत्य मॉन्सून या वर्षी ८ जूनला केरळला दाखल झाला, म्हणजे त्याच्या आगमनाच्या सामान्य तारखेच्या एक आठवडा उशिरा. ३० जूनला त्याने संपूर्ण देश व्यापला, म्हणजे त्याच्या सामान्य तारखेच्या दोन आठवडे लवकर. त्यानंतर मॉन्सूनचे असे अनेक चढ-उतार आपल्याला पाहायला मिळाले. जुलै महिन्यात भरपूर पाऊस पडला.

खोळंबलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या. अनेक ठिकाणी अतिवृष्टीच्या व भूस्खलनाच्या घटनाही घडल्या. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात २० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात १०० जण ढिगाऱ्यात अडकून पडले. त्यातील २७ जणांचा मृत्यू झाला. नंतर ऑगस्टचा महिना मात्र पुन्हा कोरडा गेला. आता पिकांचे काय होणार, हा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे आज उभा आहे.

‘एल निनो’चा लाल कंदील
यंदाच्या वर्षी अगदी मार्च महिन्यातच ‘एल निनो’चा लाल कंदील परदेशी शास्त्रज्ञांनी भारताला दाखवला होता. यंदाच्या मॉन्सूनचा पाऊस सामान्य, परंतु सरासरीहून थोडासा कमी राहील, असा इशारा भारतीय हवामान विभागानेही एप्रिलमध्ये दिला होता. अगदी त्यानुसार जूनचा पाऊस बेताचाच राहिला. जुलै महिन्यात मात्र पावसाची उणीव भरून निघाली. नंतर ऑगस्टमध्ये पावसाची जास्त अपेक्षा बाळगू नये, असाही इशारा पुन्हा एकदा अधिकृतपणे दिला गेला होता.

म्हणून मॉन्सूनच्या तीन महिन्यांत जे काही घडले ते सर्व अनपेक्षित होते असे म्हणता येणार नाही. एल निनो ही प्रशांत महासागरावर अधूनमधून उद्‍भविणारी एक प्रक्रिया आहे. जेव्हा मध्यवर्ती व पूर्व प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा काही अंशांनी वाढते, तेव्हा त्याला एल निनो म्हणतात. त्याच्या मोजमापासाठी प्रशांत महासागराचे निनो-१, निनो-२ असे विविध भाग पाडले गेले आहेत.

त्यांचा भारतीय पर्जन्यमानाशी कमी अधिक संबंध जोडला जातो. निनो-३.४ या भागांचे तापमान मार्च महिन्यात सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअस अधिक होते. आता ते सरासरीपेक्षा ०.८ अंश सेल्सिअस एवढे वाढले आहे आणि ते हळूहळू आणखी वाढत आहे. त्याचा भारताच्या पर्जन्यमानावर होत असलेला विपरीत परिणाम आज आपण पाहत आहोत.

Rain Update
Rabi Season : आता भिस्त रब्बीवर...

देशातील पाण्याचा साठा
हे नेहमी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, की मॉन्सून हा आपल्या देशात दरवर्षी चार महिने येऊन राहणारा एक पाहुणा आहे. मॉन्सूनचा पाऊस चांगला पडो किंवा बेताचा, बाकीच्या आठ महिन्यांसाठी पाण्याची तरतूद करण्याची जबाबदारी आपली असते. त्यातही निसर्ग आपली थोडीफार मदत करतो. एक तर मॉन्सूनचा पाऊस संपल्यानंतरही नद्या वाहत राहतात. त्या लगेच कोरड्या पडत नाहीत.

भारतात असे १५० जलाशय आहेत जे पावसाळ्यात भरतात आणि पुढील पावसाळ्यापर्यंत देशाला पाणी पुरवत राहतात. धरण किंवा विद्युत प्रकल्पांचा भाग असलेले काही जलाशय वगळता ते सर्व नैसर्गिक आहेत. त्यांच्यातील पाण्याच्या स्तरांवर भारताचा केंद्रीय जल आयोग बारकाईने नजर ठेवून असतो.

प्रत्येक पावसाळ्यात हे सर्व जलाशय १०० टक्के भरतात असे मुळीच नाही. त्यातील पाण्याचा साठा कमी जास्त होत असतो. मागील दहा वर्षांची सरासरी काढली, तर त्या सरासरीच्या तुलनेत आजचा साठा ९१ टक्के आहे. या उपलब्ध पाण्याचा वापर सुज्ञतेने करणे गरजेचे
आहे.

Rain Update
खरीप गेला, आता भिस्त रब्बी हंगामावर

परतीचा पाऊस
१ जून ते ३० सप्टेंबर दरम्यानचा चार महिन्यांचा कालावधी मॉन्सूनच्या पर्जन्यमानाची आकडेवारी तयार करण्यासाठी निश्‍चित केला गेला आहे. सामान्य मॉन्सूनची व्याख्या त्याच संदर्भात केली जाते. यामुळे अशी एक गैरसमजूत निर्माण झाली आहे, की जून महिना सुरू होताच पावसाची सुरुवात होते आणि सप्टेंबर महिना संपताच पाऊस बंद होतो. प्रत्यक्षात मॉन्सून या तारखांनी बांधलेला नाही. खरे तर कॅलेंडरमधील जूलियस सीझर किंवा ऑगस्टस सीझर या रोमी सम्राटांची नावे असलेल्या महिन्यांशी निसर्गाचा संबंध नाही.

नैर्ऋत्य मॉन्सून केरळपासून राजस्थानपर्यंत टप्प्याटप्प्याने आगेकूच करत जातो, तसाच तो तेथून टप्प्याटप्प्यानेच माघारही घेतो आणि शेवटी त्याचे रूपांतर ईशान्य मॉन्सूनमध्ये होते. ईशान्य मॉन्सूनचा प्रभाव देशाच्या दक्षिणी भागापुरता मर्यादित असला, तरी त्याचा काहीसा परिणाम महाराष्ट्रावरही होतो. यामुळे राज्यातील अनेक भागांत सप्टेंबरच्या उत्तरार्धात आणि ऑक्टोबरच्या पूर्वार्धात पाऊस पडतो.

यालाच ‘परतीचा पाऊस’ असेही म्हटले जाते. मॉन्सून संपल्यानंतरही जसे जलाशय पाण्याने भरलेले राहतात, तशीच जमीनही तिच्यात पाणी साठवून ठेवते. जमिनीत मुरलेल्या ओलाव्यावर ज्वारी-बाजरीसारखी भरडधान्याची पिके रब्बी हंगामात काढण्याची महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे.

‘इंडियन ओशन डायपोल’
नैर्ऋत्य मॉन्सूनचे वारे भारतावर वाहत येतात ते हिंद महासागरावरून. म्हणून नैर्ऋत्य मॉन्सूनच्या निर्मितीत आणि प्रक्रियेत हिंद महासागराच्या तापमानाचा मोठा प्रभाव असतो हे उघड आहे. त्याच्या नावात हिंद शब्द असला तरी प्रत्यक्षात श्रीलंकेपासून अंटार्क्टिकापर्यंत आणि आफ्रिकेपासून इंडोनेशियापर्यंत असा त्याचा प्रचंड विस्तार आहे. इतक्या मोठ्या समुद्राचे तापमान सर्वत्र समान असू शकत नाही.

जेव्हा हिंद महासागराचा पश्‍चिमेकडील भाग त्याच्या पूर्वेकडील भागापेक्षा अधिक तापलेला असतो, तेव्हा भारतावर चांगला पाऊस पडतो असे दिसून आले आहे. याविरुद्ध, जेव्हा हिंद महासागराचा पूर्वेकडील भाग त्याच्या पश्‍चिमेकडील भागापेक्षा उष्ण असतो, तेव्हा भारतावर पावसाचे प्रमाण कमी होते.

या उलट-सुलट बदलणाऱ्या स्थितीला ‘इंडियन ओशन डायपोल’ किंवा संक्षेपात ‘आयओडी’ असे नाव पडले आहे. हवामानशास्त्रज्ञ त्यावर सतत लक्ष ठेवून असतात. काही दिवसांपूर्वी, म्हणजे यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच, ‘आयओडी’ मॉन्सूनसाठी काहीसा अनुकूल बनला आहे आणि येणाऱ्या दोन महिन्यांत तो अनुकूल राहण्याची चांगली शक्यता आहे.

पुढील दोन महिने...
महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती अशी आहे, की कोकणात आणि विदर्भात चांगला पाऊस पडतो, पण मराठवाड्यातील व मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळप्रवण आहेत. तेथे सलग दोन-तीन वर्षे चांगला पाऊस पडला म्हणून तो दरवर्षी चांगला पडावा, अशी आशा ठेवणे व्यर्थ आहे. पण या जिल्ह्यांतही, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत पाऊस पडतो, हा एक साधारण अनुभव आहे.

त्याबरोबर ‘आयओडी’ अनुकूल राहण्याची शक्यता लक्षात घेतली, तर महाराष्ट्र राज्यासाठी सप्टेंबर व ऑक्टोबर हे दोन महिने आशादायक आहेत. देशभरासाठी सप्टेंबर महिन्याचा पाऊस सरासरीच्या ९१ ते १०९ टक्के राहण्याची शक्यता हवामान विभागाने नुकतीच वर्तवली आहे आणि ती खरी ठरेल, अशी आपण आशा बाळगू शकतो.

(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com