Rabi Season : आता भिस्त रब्बीवर...

शेतकऱ्यांनी चालू रब्बी हंगामात एक-दोन पिकांवर भर देण्याऐवजी तृणधान्य-कडधान्य-तेलबिया अशी वैविध्यपूर्ण पिके घ्यायला हवीत.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon
Published on
Updated on

मॉन्सूनने (Monsoon) देशभरातून थोड्या विलंबाने का होईना, अखेर माघार घेतली आहे. महाराष्ट्रासह मध्य, दक्षिण भारतात अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे नुकसानच (Kharif Crop Damage) अधिक केले तर उत्तरेकडे या वर्षी पाऊस थोडा कमीच राहिला आहे. मागील आठवडाभरापासून राज्यात स्वच्छ, कोरडे वातावरण (Dry Weather) आहे. दिवाळीत बोचऱ्या थंडीची जाणीव सर्वांना झाली असून, ही थंडी पुढे वाढतच जाईल.

दिवाळी संपल्यानंतर खरे तर सर्वत्रच रब्बी हंगामातील पेरण्यांना वेग येतो. या वर्षीच्या अतिवृष्टीने जमिनीत भरपूर ओल आहे. शिवाय भूगर्भ आणि भूपृष्ठावरील जलसाठेही भरलेली आहेत. त्यामुळे रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पाणी उपलब्धतेची चिंता जवळपास मिटली आहे, असे म्हणता येईल. रब्बी हंगामासाठी हा चांगला संकेत असून या वर्षी देशभर विक्रमी पातळीवर रब्बीच्या पेरण्या होतील, असे चित्र दिसते.

देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत ४६ टक्क्यांनी खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. पेरण्यांचा हा कल पुढील काही दिवसांत असाच राहणार आहे. एका हंगामात नुकसान झाले तरी ते भरून काढण्यासाठी देशभरातील शेतकरी नेहमीच कंबर कसत असतो. पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये मोहरी, हरभऱ्याच्या पेरण्यांनी जोर धरला असून, लवकरच गव्हाच्या पेरणीला देखील शेतकरी आरंभ करतील.

Rabi Season
Rabi Sowing : रब्बी पेरणीत गव्हाची आघाडी

खरिपाच्या तुलनेत रब्बीमध्ये लागवडीखालील क्षेत्र कमी असले तरी या काळातील चांगल्या वातावरणामुळे उत्पादनाची शाश्‍वती मिळते. परंतु मागील चार-पाच वर्षांपासून नोव्हेंबर ते मार्चपर्यंत अवकाळी पाऊस पडून रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान होत आहे. राज्याचा विचार करता रब्बीमध्ये ज्वारी, हरभरा, गहू या पिकांचेच क्षेत्र अधिक असते. या मुख्य पिकानंतर मक्यासह, करडई, सूर्यफूल, भुईमूग या तेलबियावर्गीय पिकांची देखील रब्बीत लागवड होते.

राज्यात धरणे, तलावात पाण्याची चांगली उपलब्धता असल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आवर्तने सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने करायला हवे. शिवाय रब्बी हंगामात अखंडित आणि दिवसा आठ तास वीजपुरवठ्याचे नियोजन महावितरकडून झाले पाहिजेत. असे झाले तरच शेतकऱ्यांना रब्बी हंगामात विविध पिके घेता येतील.

Rabi Season
Rabi Sowing : अकोला जिल्ह्यात रब्बीसाठी तयार झाले पोषक वातावरण

शेतकऱ्यांनी सुद्धा एक-दोन पिकांवर भर देण्याऐवजी रब्बीमध्ये तृणधान्य-कडधान्य-तेलबिया अशी वैविध्यपूर्ण पिके घ्यायला हवीत. राज्यात वाढीव क्षेत्राच्या अंदाजानुसार सर्व रब्बी पिकांचे पुरेसे, दर्जेदार बियाणे सर्वत्र उपलब्ध व्हायला हवेत. शिवाय पेरणीनुसार रासायनिक खतांची देखील उपलब्धता झाली पाहिजेत, ही काळजी कृषी विभागाने घ्यायला हवी.

हल्ली सोयाबीनमध्ये बीबीएफ लागवड तंत्राचा प्रसार राज्यात वाढत आहे. या तंत्राने कमीत कमी निविष्ठांच्या वापरातून उत्पादनात चांगली वाढ होते. रब्बी हंगामातील कोणत्या पिकांसाठी बीबीएफ तंत्राचा वापर करता येईल यासह इतरही उत्पादनवाढीची सूत्रे शेतकऱ्यांना सांगायला हवीत. अलीकडे कीड-रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाने रब्बी हंगामातील पिकांमध्ये उत्पादनात घट आढळून येते.

अशावेळी घातक कीड-रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी सुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन झाले पाहिजे. या यावर्षी रब्बीत पाण्याची उपलब्धता चांगली असली तरी शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीच्या दृष्टीने सूक्ष्म सिंचनाच्या वापरावरच भर द्यायला हवा. पीकविमा आणि पीककर्ज ह्या दोन्ही बाबी रब्बी हंगामाच्या दृष्टीने खूपच दुर्लक्षित राहतात. राज्यात खरीप हंगामात झालेले नुकसान आणि शेतीमालाचे घसरलेले दर यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक

परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. अशावेळी नुकसानीबाबतची मदत, पीकविमा भरपाई शेतकऱ्यांना तत्काळ मिळायला पाहिजेत. महत्त्वाचे म्हणजे या रब्बी हंगामात अधिकाधिक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे नियोजन राज्य शासनाने करायला हवे. शिवाय रब्बी हंगामातील नैसर्गिक आपत्तींनी होणारे वाढते नुकसान पाहता पीकविमा संरक्षणाची देखील व्याप्ती वाढवावी लागेल. या दोन्हीचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी विभाग राज्य शासनाने दक्ष राहायला पाहिजेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com