
Maharashtra River Condition : महाराष्ट्र राज्यातील ५५ नद्यांची खोरी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात लहान-मोठ्या मिळून नद्यांची संख्या ४०० च्या आसपास आहे. त्यांपैकी ५५ नद्यांची खोरी नामशेष होत असतील तर ही बाब गंभीर म्हणावी लागेल.
राज्यातील बहुतांश नद्या प्रदूषित झाल्या आहेत. नद्यांचे हे प्रदूषण आता पात्राबाहेर पडून संपूर्ण खोरे नामशेष होत आहेत. शुद्ध पाण्याने खळखळ वर्षभर वाहती नदी ही त्या भागासाठीची जीवनदायिनी मानली जाते. नदीची एक स्वतंत्र परिसंस्था असते. पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता आणि नदीकाठच्या परिसरातील सुपीक जमिनीमुळे भटकंती करणाऱ्या मानवांच्या टोळ्या नदीकाठी स्थिरावल्या.
नदीतीरावर खेडी वसली. नदीने माणसे जगवली, पशु-पक्षी, झाडे-झुडुपे जगवली. नदी खोऱ्यातील शेती सुजलाम-सुफलाम केली. पुढे पाण्याच्या उपलब्धतेनुसार उद्योगाची चाकेही नदी भोवती फिरू लागली. पाण्याद्वारे वाहतुकीतून व्यापार-व्यवसाय नदीकाठीच फुलला. त्यामुळेच जगभरातील बहुतांश मोठी शहरे ही नदीकाठीच दिसून येतात. यांस आपला देश आणि राज्यही अपवाद नाही.
नदीला नदी मानणाऱ्या युरोपसह अनेक देशांनी नद्या नितळ पाण्याने खळखळत वाहत्या अशा ठेवल्या, तर आपण नदीला माता, गंगा मानणाऱ्यांनी या नद्यांचे लचके तोडायला सुरुवात केली. नदीला अस्वच्छ, प्रदूषित करण्यात आपल्यापैकी कोणीही थोडीशी कसर ठेवलेली नाही. नदीतून शेतीसाठी पाण्याचा अनियंत्रित उपसा सुरू झाला.
शहरी भागात नदीपात्रात अनधिकृत अतिक्रमणे वाढली. अनेक ठिकाणी नदीच्या प्रवाहाला अडसर निर्माण केले गेले, काही ठिकाणी ते बदलण्यातही आले. अनियंत्रित वाळूउपशाने नदीचे नैसर्गिक नदीपण आपण गमावून बसलो आहोत. शहरांचे सांडपाणी-मैला, उद्योग व्यवसायाचे दूषित विषारी पाणी, प्लॅस्टिकसह इतरही कचरा सरळसरळ नदीत सोडला जाऊ लागला आणि नद्या गटारगंगा झाल्या.
नद्यांची एकंदरी परिसंस्थाच (खोरे) धोक्यात आली आहे. नदीच्या प्रदूषित पाण्याने भूपृष्ठावरचे, भूगर्भातील जलस्रोत प्रदूषित झाले. त्यामुळे मानवी आरोग्यास हे पाणी घातक ठरत आहे. रसायन तसेच जडधातूयुक्त पाण्याने नदीखोऱ्यातील शेती खराब होत आहे. नदी स्वच्छ, प्रदूषणमुक्त करून खोरे वाचवायचे असेल तर इथून पुढे नदीच्या उगमापासून ते शेवटपर्यंत तिच्या पात्रात कुठलेही अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी.
त्याचबरोबर आत्तापर्यंत झालेले अतिक्रमणे धाडसाने हटवावी लागतील. शक्य असेल तिथे नदीपात्रे रुंद आणि खोल करून त्यातील पाणीसाठा वाढवावा लागेल. नदीतील जलपर्णी काढून टाकायला पाहिजे. नदीपात्रात कर्दळ, बांबू, रानकेळी, रानअळू अशा वनस्पती वाढवून पात्राची शोभा आणि स्वच्छता अबाधित ठेवायला हवी.
या वनस्पती पाण्यातील जड धातू शोषून घेतात. याचबरोबर नदीकाठी झाडे लावल्यास परिसरातील गाळ नदीत वाहून येणार नाही. शहरातील सांडपाणी तसेच उद्योगाचे दूषित पाणी हे प्रक्रिया करूनच नदीत सोडले जाईल, याची काळजी घ्यायला हवी. वाळूस पर्यायी माध्यमांचा शोध घेऊन त्यांचा वापर वाढवून अनियंत्रित वाळूउपसा पूर्णपणे थांबवावा लागेल.
नदी खोऱ्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकपद्धती आणि पाणीउपसा याचे धोरण ठरवून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी. अशा उपायांनीच नदीखोरे पुन्हा एकदा सुजलाम-सुफलाम होणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.