मधमाश्या वाचवा अन् वाढवाही

पीक उत्पादनवाढीच्या सर्व निविष्ठा वापरूनही पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतात मधमाश्या नसतील तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
Honey Bee
Honey BeeAgrowon
Published on: 
Updated on: 

आज ‘जागतिक मधमाश्या दिन.’ मानवाच्या काही कृतीतून मधमाश्यांसह इतरही परागीकरण करणाऱ्या कीटकांना धोका पोहोचत असून, त्याबाबत जाणीव-जागृती आजच्या दिवशी जगभर केली जाते. या वर्षीच्या जागतिक मधमाश्या दिनाची संकल्पना फारच चांगली आहे. मधमाश्यांची विविधता आणि मधमाश्यापालन प्रणाली उत्सवात त्यांच्याप्रमाणेच व्यस्त राहा, असा संदेश घेऊन हा दिवस आला आहे. मधमाश्या मध उत्पादनाबरोबर पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढीस अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. पीक उत्पादनवाढीच्या सर्व निविष्ठा वापरूनही पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतात मधमाश्या नसतील, तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही.

‘एफएओ’च्या एका अहवालानुसार जगात मधमाश्यांचा नाश होत राहिला तर १० वर्षांत अन्नधान्य उत्पादन एक तृतीयांशाने घटेल आणि याचा मोठा फटका भारतासारख्या विकसनशील देशांना बसणार आहे. आजही आपल्याकडे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इस्राईल अशा प्रगत देशांच्या तुलनेत फारच कमी मधमाश्यांच्या वसाहती आहेत. असे असताना हे देश मधमाश्या वाचविणे, वसाहती वाढविणे यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत तर आपल्याकडे अनेक कारणांनी मधमाश्या, त्यांच्या वसाहती नष्ट होत आहेत, ही बाब अधिक चिंताजनक म्हणावी लागेल. आपल्या देशात, राज्यात मध गोळा करताना अनेक जण पोळे जाळतात. शिवाय आपल्याकडे कीडनाशकांच्या अनियंत्रित वापराने देखील मधमाश्यांसह अनेक परागसिंचक कीटकांच्या जाती नामशेष होत असल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

आपल्या राज्यात तर मधमाश्यांच्या महत्त्वाबाबत आत्तापर्यंत तरी फारसे कोणी काही गांभीर्याने घेतलेच नाही. एकट्या खादी ग्रामोद्योग विभागाकडून वसाहतीबरोबर मध उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. परंतु त्यांचेही प्रयत्न फारच तोकडे आहेत. पिकांचे उत्पादनवाढीच्या अनुषंगाने मधमाश्या हा शेतीचा विषय असताना कृषी विभागासह कृषी विद्यापीठांनी देखील त्यांचे संरक्षण, संवर्धनासाठी फारसे काही काम केले नाही. त्यामुळे देखील शेती आणि मधमाश्या यांचा एकत्रित विचार शेतकऱ्यांच्या पातळीवर अजूनही झाला नाही. आपल्याकडे मधमाश्यांबद्दल अजूनही पुरेसे ज्ञान नाही, मधमाश्या पालनाबाबत प्रशिक्षणाची वानवा आहे. कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे एकतर मधमाश्या पालन कुणी करीत नाही. मधमाश्या वसाहती कुणाला हाताळता येत नाहीत. आणि मधमाश्या पालन कुणी केलेच तर ते यशस्वी होण्याचे प्रमाण फारच कमी आहे.

याबाबत कधीतरी राज्य शासनाला जाग आली तर त्यांच्याकडून रिकाम्या पेट्या वाटण्याचे काम होते. कारण मधमाश्यांच्या वसाहती ना त्यांच्याकडे ना कृषी विभागाकडे. मधमाश्यांच्या वसाहतीच नाहीत तर त्या विकसित कशा कराव्यात, त्यांचे प्रजनन कसे करावे, या बाबी तर फार पुढच्या म्हणाव्या लागतील. राज्याच्या लागवड क्षेत्राचा विचार करता मधमाश्या वसाहती संगोपन क्षमता २० लाख असताना आपल्याकडे केवळ सात ते आठ हजारच वसाहती उपलब्ध आहेत. अशावेळी नियोजन पद्धतीने वसाहती वाढविण्याचे काम हाती घ्यावे लागेल. मध आणि त्या आनुषंगिक इतर उत्पादनांबरोबर पिकांच्या परागीभवनासाठी मधमाश्यापालन ही संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजवावी लागेल. याकरिता गाव, तालुका, जिल्हास्तरावर मधमाश्यांचे शेतीत महत्त्व, त्यांचे संगोपन, प्रजनन, वसाहती वाढविणे याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना द्यावे लागेल.

पीक उत्पादनवाढीत मधमाश्यांचे महत्त्व शेतकऱ्यांना पटल्यावर भाडेतत्त्वावर मधमाश्या वसाहती देण्याचा नवा व्यवसाय राज्याच्या ग्रामीण भागात उभा राहू शकतो. मधमाश्यांना उत्पादनवाढीची निविष्ठा म्हणून राजमान्यता मिळाली आहे. परंतु याबाबत माहितीचा अभाव आणि ही निविष्ठा उपलब्ध होत नसल्याने वापर वाढत नाही. महाबळेश्‍वर तालुक्यातील मांघर या गावाची निवड ‘देशातील पहिले मधाचे गाव’ म्हणून करण्यात आली आहे. या गावात सामूहिक पद्धतीने मधमाश्यापालन केले जाते. मधाचे गाव ही संकल्पना राज्यभर पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com