Seed Traceability System: सीड ऑथेंटिकेशन, ट्रेसेबिलिटी आणि होलिस्टिक इन्व्हेंटरी (SATHI) हे पोर्टल केवळ एक डिजिटल प्रणाली नाही, तर ती बियाणे साखळीत पारदर्शकता आणणारे एक प्रभावी शस्त्र आहे. केंद्र सरकारच्या या कल्पक योजनेला महाराष्ट्र शासनाने अत्यंत प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविले आहे. .‘जसं पेराल, तसं उगवेल’ ही मराठीतील एक साधी म्हण वाटत असली, तरी ती भारतीय शेतीचे सर्वांत मोठे आणि कठोर वास्तव मांडते. जमिनीत पेरले जाणारे बियाणे हे एका शेतकऱ्याचे स्वप्न, त्याचे वर्षभराचे अपार कष्ट आणि त्याच्या कुटुंबाचे संपूर्ण भविष्य असते. गेल्या काही दशकांत हवामानाचा लहरीपणा, तांत्रिक ज्ञानाचा अभाव आणि बाजारपेठेतील बनावट बियाण्यांच्या सुळसुळाटामुळे हा ‘बळीराजा’ मोठ्या विवंचनेत सापडला आहे. .SATHI Portal-2 : कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा मंगळवारी राज्यव्यापी बंद.उत्तम गुणवत्तेच्या बियाण्यांमुळे उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. मात्र बनावट बियाणे आणि माहितीचा अभाव (एका जिल्ह्यात तुटवडा, तर दुसऱ्या जिल्ह्यात साठा) हे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची कारणे आहेत. पण म्हणतात ना, ‘अंधार कितीही गडद असला, तरी पहाटेचा किरण नक्कीच फुटतो.’ आज भारतीय कृषी क्षेत्राला अशाच एका डिजिटल क्रांतीचा स्पर्श झाला आहे, ज्याचे नाव आहे ‘साथी’ (SATHI) पोर्टल. हे भारत सरकार आणि NIC यांचा संयुक्त उपक्रम असून, बियाण्याचा संपूर्ण प्रवास स्पष्टपणे दिसणारे आणि गुणवत्ता रक्षण करणारे एक सशक्त व्यासपीठ आहे.कृषी आयुक्त सूरज मांढरे, संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आज हे पोर्टल महाराष्ट्रातील बियाणे उत्पादक कंपन्या व विक्रेते यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. साथी पोर्टलबद्दल विक्रेत्यांची एक भूमिका आहे, त्या संदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विक्रेत्यांशी संवाद साधला आहे. संवादपर्वातून नवा अध्याय आता लिहिला जात आहे. शेतकऱ्यांच्या मोबाइलपर्यंत ‘साथी’ पोहोचविण्याच्या प्रयत्नाला वेग येतो आहे..साथी ही पारदर्शक आणि तंत्रज्ञानयुक्त एकात्मिक कृषी परिसंस्था शेतकरी (संरक्षण), उत्पादक व वितरक (विस्तार) आणि शासन (अचूक धोरण) या तिन्ही स्तंभांना जोडणारी एक प्रणाली आहे. या पोर्टलचा मुख्य उद्देश बियाण्यांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांची ‘ट्रेसेबिलिटी’ (मागोवा) सुनिश्चित करणे हा आहे. बियाण्याचे उत्पादन कोठे झाले? त्यावर प्रक्रिया कोणी केली? ते कोणत्या गोदामात होते आणि ते आता कोणत्या दुकानात उपलब्ध आहे? या प्रत्येक टप्प्याची नोंद डिजिटल स्वरूपात केली जाते..‘एआय’ आणि कृषी क्षेत्रअलीकडेच नवी मुंबई येथे झालेल्या ‘AI4AGRI Summit 2026’ मध्ये सहभागी होताना मला तंत्रज्ञानाची ही ताकद अधिक स्पष्टपणे उमजली. जगभरातील तज्ज्ञांनी जेव्हा ‘एआय’चा उपयोग सर्वसामान्यांसाठी कसा करता येईल यावर चर्चा केली, तेव्हा त्याचे उत्तम उदाहरण म्हणून ‘साथी’ पोर्टलकडे पाहता येईल. आज एआय तंत्र केवळ मोठ्या आयटी कंपन्यांपुरते मर्यादित राहिले नाही, ते आता शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले आहे. AgriStack मधील डेटा आणि ‘साथी’ पोर्टलवरील माहिती यांची सांगड घातल्यास आपल्याला अद्भुत परिणाम मिळत आहेत. .उदाहरणार्थ ...मागणीचा अंदाज : कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या हंगामात कोणत्या पिकाच्या बियाण्यांची किती मागणी असेल, याचा अंदाज आता प्रशासनाला आधीच घेता येतो व उत्पादकाला आणि विक्रेत्याला पुढच्या वर्षीचे नियोजनाला फायदा होतो. यामुळे बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या साठेबाजांना लगाम बसणार आहे.बनावट बियाण्यांवर आळा : क्यूआर कोडच्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्याला बियाणे खरेदी करतानाच त्याची सत्यता तपासता येते. जर काही दोष आढळला, तर AgriStack मधील डेटावरून त्या विशिष्ट बॅचचे बियाणे कोणत्या शेतकऱ्याने वापरले आहे, हे त्वरित शोधून त्यावर कारवाई करता येते..Sathi Portal : साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री व्यावहारिक नाही .महाराष्ट्र पॅटर्नचा सर्वत्र दरवळमहाराष्ट्राच्या मातीचा सुगंध जसा देशभर कायमच पसरत असतो, तसाच आता आमच्या कृषी विभागाच्या कार्याचा सुगंधही इतर राज्यांत पोहोचत आहे. ‘साथी’ पोर्टलची यशस्वी अंमलबजावणी आणि बियाणे उत्पादक कंपनी व विक्रेत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होत असलेला लाभ याची यशोगाथा मांडण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेवरून मला विविध राज्यांत निमंत्रित केले गेले. .अलीकडेच लखनौ येथील कृषी संचालनालयात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उत्तर प्रदेशातील कृषी विभागातील अधिकारी व बियाणे उत्पादकांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रात आम्ही स्टॉक विक्री, ट्रान्स्फर प्रक्रिया, अहवाल निर्मिती आणि डिजिटल प्रणालीची कार्यपद्धती कशा प्रकारे राबवली, हे पाहून तेथील अधिकारी भारावून गेले. लखनौ आणि हैदराबाद येथील चर्चासत्रांमध्ये जेव्हा मी मराठी मातीचे कणखरपण मांडते, तेव्हा मला जाणवते की, आम्ही केवळ गुणवत्तापूर्ण बियाणे देत नाही, तर आम्ही बळीराजाशी असलेली आमची नाळ अधिक घट्ट करत आहोत. ‘महाराष्ट्र पॅटर्न’ आज देशासाठी एक दीपस्तंभ ठरत आहे..डिजिटल अंमलबजावणीचे टप्पेउत्पादन आणि नोंदणी : बियाणे तयार होतानाच त्याची नोंदणी पोर्टलवर करणे अनिवार्य आहे.गुणवत्ता चाचणी : प्रयोगशाळेत बियाण्याची शुद्धता आणि उगवणक्षमता तपासल्यानंतरच त्याला प्रमाणपत्र मिळते.टॅगिंग आणि ट्रॅकिंग : प्रत्येक पाकिटावर एक lot निहाय कोड असतो, ज्यामुळे त्याची संपूर्ण ‘कुंडली’ डिजिटल स्वरूपात उपलब्ध असते..पारदर्शक वितरण : बियाणे वितरणादरम्यान होणारी लुबाडणूक टाळण्यासाठी स्टॉकची रिअल-टाइम माहिती उपलब्ध असते.आतापर्यंत शेतकऱ्याला ‘बांधावर बियाणे’ मिळणे हे एक स्वप्न होते. आज ते वास्तवात उतरले आहे. कोणत्याही वांध्याशिवाय ‘शुद्ध आणि उत्तम दर्जाचे’ बियाणे आज शेतकऱ्याच्या हातात पडणार आहे. यामुळे केवळ उत्पादन वाढणार नाहीये, तर शेतकऱ्याचा व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा एकदा दृढ होण्यास मदत होणार आहे..आगामी काळात ‘साथी’ पोर्टलमध्ये आणखी सुधारणा करून ते अधिक युजर-फ्रेंडली बनविण्याचा शासनाचा मानस आहे. जमिनीचा पोत, हवामानाचा अंदाज आणि बियाण्यांची निवड या तिन्ही गोष्टींचा मेळ एकाच प्लॅटफॉर्मवर घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. फार्म टू फार्मर या संपूर्ण साखळीमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी उत्पादक व विक्रेत्यांचा सहभाग अत्यावश्यक आहे. या संदर्भात बियाणे उत्पादकांनी वेळेत उत्पादन व पुरवठा सुनिश्चित करणे, बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता व गुणवत्ता राखणे तसेच शासनाच्या नियोजनासाठी अचूक माहिती उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. .त्याचप्रमाणे विक्रेत्यांनी अंतिम स्तरावरील जबाबदार घटक म्हणून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, पारदर्शक व्यवहार व नोंदी ठेवणे तसेच साथी प्रणालीचा सक्रिय वापर करणे आवश्यक आहे. पारदर्शकतेचे मूळ असलेले साथी पोर्टल हे केवळ एक तंत्रज्ञान नसून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला सुरक्षित आणि प्रगत बनवणारी एक चळवळ आहे. त्याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देत उत्पादनक्षमता वाढविणे शक्य होईल.९८८१३७२५८५(लेखिका कृषी विभागात उपसंचालक - बियाणे या पदावर कार्यरत आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.