Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Crop Insurance : रब्बी पिके करा विमा संरक्षित

Rabi Summer Season Crop : रब्बी-उन्हाळी हंगामातही नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी रब्बी, तसेच उन्हाळी हंगामातील पिकांचा विमा काढून शेतकऱ्यांनी आपली पिके विमा संरक्षित करणे हेच हिताचे ठरेल.
Published on

Rabi Season Crop Insurance : रब्बी हंगामात आधी सर्वसाधारणपणे निरभ्र आकाश असायचे. स्वच्छ, कोरड्या, थंड हवामानात पिकांची निरोगी वाढ होत असे. वादळी पाऊस, गारपीटही झाली तर एप्रिल-मेमध्ये होत असे. अर्थात, तोपर्यंत रब्बी पिके निघून नैसर्गिक आपत्तींनी नुकसानीची शक्यता कमीच असायची. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल रब्बी पिकांसाठी पीकविमा काढण्याकडे दिसून येत नव्हता.

परंतु मागील दशकभरापासून हवामानात मोठा बदल झाला आहे. मागील दोन वर्षे पावसाळा लांबला. रब्बी हंगामात सातत्याने ढगाळ वातावरण राहत आहे. अधूनमधून पाऊसही पडतोय. रब्बी हंगामात तापमानातही मोठा चढ-उतार पाहावयास मिळतो. रात्री कडाक्याची थंडी, सकाळी दाट धुके, तर दुपारी उन्हाचा चटका अशा विपरीत हवामानाचा पिकांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतोय. पूर्वी गारपीट झालीच, तर मॉन्सूनपूर्व काळात (एप्रिल-मे) होत होती. हिवाळ्यात गारपीट सहसा होत नव्हती.

२०१४ च्या अभूतपूर्व अशा गारपिटीपासून फेब्रुवारी-मार्चमध्ये दरवर्षीच राज्यात गारपीट धुमाकूळ घालतेय. या वर्षी तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच गारपिटीने हजेरी लावली आहे. राज्यात तीन-चार दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस, गारपिटीने रब्बी हंगामातील पिके उद्‍ध्वस्त केली आहेत. एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिके बाधित झाली आहेत. द्राक्ष, आंबा, डाळिंब, संत्रा, केळी, स्ट्रॉबेरी या फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पिकांचा विमा शेतकऱ्यांनी काढून आपली पिके विमा संरक्षित करणे यातच हित आहे.

Crop Insurance
Advance Crop Insurance : सांगलीतील ७१ हजार शेतकरी २५ टक्के अग्रिमच्या प्रतीक्षेत

रब्बी ज्वारीचा पीकविमा भरण्यासाठी (मुदतवाढ झाली नाही तर) आज शेवटचा दिवस (३० नोव्हेंबर) आहे. गहू, हरभरा, रब्बी कांदा विमा शेतकरी १५ डिसेंबरपर्यंत भरू शकतात, तर उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग या पिकांचे विमा प्रस्ताव शेतकरी ३१ मार्च २०२४ पर्यंत सादर करू शकतात. पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपया लागणार आहे. विमा हप्त्याचा थेट बोजा शेतकऱ्यांवर पडणार नसल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवायला हवा.

मागील खरीप हंगामात एक रुपयांत पीकविम्याची तरतूद असताना बहुतांश ऑनलाइन सेवा देणाऱ्या केंद्रांनी प्रतिअर्ज ५०० रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना लुटले आहे. असे रब्बी पिकांचा विमा उतरताना होणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे. रब्बी पीककर्जाबाबत बॅंका, कृषी विभाग आणि राज्य शासन यांच्याकडून फारसा प्रसार-प्रचार, प्रबोधन आणि कर्जवाटपासाठी प्रयत्न होत नाहीत.

Crop Insurance
Crop Insurance : कृषी विभाग फेरसर्वेक्षण कशाचे करणार?

अगदी तसाच अनुभव रब्बी पीकविम्याबाबतचा आहे. अनेक शेतकऱ्यांना रब्बी पिकांचाही विमा उतरविता येतो, हे माहीत नाही. त्यामुळे रब्बी पीकविम्याचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार-प्रचार करण्यासाठी राज्य शासन कृषी-महसूल विभागाने पुढाकार घ्यायला हवा. रब्बी हंगामातील पिकांची ई-पीक पाहणीही शेतकऱ्यांनी करून घ्यायला हवी.

रब्बी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेले नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीत काढणीपश्‍चात झालेले नुकसान, तसेच पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट यामध्ये आपल्या पिकांना संरक्षण मिळू शकते, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.

पीकविम्यात नुकसान भरपाई मिळण्यासाठीची प्रक्रिया ही खूपच गुंतागुंतीची आहे. विशेष म्हणजे याबाबतच्या नोंदी नीट होत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा काढून नुकसान झाले तरी त्यांना भरपाई मिळत नाही. पीकविमा कंपन्यांनी या प्रक्रियेत सुधारणा करून विमाधारक प्रत्येक शेतकऱ्यास नुकसान झाले असता भरपाई दिली तर हंगाम खरीप असो रब्बी असो की उन्हाळी, प्रत्येक शेतकरी आपल्या पिकांचा विमा उतरवतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com