Soybean Yellow Mosaic : सोयाबीनला विळखा ‘मोझॅक’चा

यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव फुलोरा अवस्थेत झाल्यास सोयाबीनच्या उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. यावर्षी नेमके याचवेळी या रोगाने सोयाबीनला गाठले आहे.
Yellow Mosaic Soybean
Yellow Mosaic SoybeanAgrowon

गेल्यावर्षी अतिवृष्टी (Heavy Rain) आणि लांबलेल्या पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान (Soybean Crop Damage) केले. सोयाबीनचे उत्पादन (Soybean Production) आणि दर्जाही घटला. त्याचा थेट आर्थिक फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसला. यावर्षी सुरुवातीलाच कमी पावसाने काही ठिकाणी सोयाबीनची दुबार पेरणी (Re Sowing Of Soybean) शेतकऱ्यांना करावी लागली. सोयाबीनची उगवण (Soybean Germination) होताना गोगलगायींच्या प्रादुर्भावाने (Snail Outbreak On Soybean) शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडले. कोंब उगवतानाच उपद्रव करणारी गोगलगाय यावर्षी सोयाबीन चांगले वीतभर वाढले तरी त्याची पाने खात होती. गोगलगायींनी सोयाबीन खाल्ल्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. इतर खरीप पिकांचेही गोगलगायींनी प्रचंड नुकसान केले.

Yellow Mosaic Soybean
Soybean : सोयाबीन, हळद, कापसाच्या किमतींत घट

शंखी गोगलगायींमुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत. शंखी गोगलगायींसह वानुने (पैसा) केलेल्या नुकसानीचेही पाहणी-पंचनामे करून त्वरीत मदत शेतकऱ्यांना मिळायला हवी. जुलै-ऑगस्टमध्ये लागून असलेल्या पावसाने सोयाबीनची वाढ खुंटली. पुरानेही नुकसान केले. आता फुले-शेंगा लागत असताना विदर्भ-मराठवाड्यात पावसाने उघडिप दिल्याने सोयाबीनचे पीक संकटात सापडले आहे.

आता एखादा पाऊस पडला नाही तर सोयाबीनच्या उत्पादनात चांगलीच घट होणार आहे. ही अरिष्ट्ये कमी होती की काय सोयाबीनला यलो मोझॅक रोगाने देखील विळखा घातला आहे. राज्यातील १५ टक्केहून अधिक (म्हणजे जवळपास सात लाख हेक्टर) क्षेत्र यलो मोझॅकने बाधित झाले आहे. हा विषाणूजन्य रोग असून पांढरी माशी हा रसशोषक कीटक या रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत आहे. राज्यात या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना उत्पादक शेतकऱ्यांना मात्र योग्य मार्गदर्शन मिळताना दिसत नाही.

Yellow Mosaic Soybean
Soybean : सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाचे हे संकट काही नवे नाही. २०१५ मध्ये या रोगाने विदर्भात थैमान घालून प्रादुर्भावग्रस्त भागातील ३० टक्के उत्पादन घटविले होते. त्यावेळी कृषी विभागाकडील सोयाबीनच्या कीड-रोगांच्या यादीत या रोगाची नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. २०१५ नंतरही राज्याच्या विविध भागांत दरवर्षी सातत्याने सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसतो. या रोगाचा प्रादुर्भाव फुलोरा अवस्थेत झाल्यास सोयाबीनच्या उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.

यावर्षी नेमके सोयाबीन फुलोऱ्यात असताना या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याचे गांभीर्य लक्षात यायला पाहिजे. या रोगात पाने पिवळी पडतात. फुलगळ होते. शेंगा पक्व होत नाहीत, दाणेही भरत नाहीत. सोयाबीनची पाने इतरही अनेक कारणांनी पिवळी पडत असल्याने रोग प्रादुर्भाव झाल्याचे शेतकऱ्यांच्या लवकर लक्षात येत नाही. अशावेळी कृषी विभागाकडून प्रादुर्भावास सुरुवात झाल्याबरोबर यलो मोझॅक कसा ओळखायचा, त्याची नेमकी लक्षणे याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. कृषी विभागानेच विभागनिहाय या रोगावर लक्ष ठेवायला पाहिजे.

मागील सात-आठ वर्षांपासून या रोगामुळे उत्पादन घटत असताना असे काहीही झालेले दिसत नाही. गंभीर बाब म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे लावा, प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून टाका असे सल्ले तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना दिले जात आहेत. खरे तर पीक कोणतेही असो विषाणूजन्य रोगांसाठी नियंत्रणात्मक उपाय फारसे नाहीत, असले तरी ते नुकसान टाळण्याच्या दृष्टिने प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना करूनच विषाणूजन्य रोग रोखणे हितावह ठरते. रोगप्रतिकारक जातींची निवड, बीजप्रक्रिया, शेतात पिवळे चिकट सापळे लावणे, शेत तणमुक्त ठेवणे, निंबोळी अर्काच्या फवारण्या करणे अशा काही प्रतिबंधात्मक उपायांनी पांढऱ्या माशीसह इतरही रस शोषक किडींचा प्रादुर्भाव शेतात होत नाही. पर्यायाने यलो मोझॅक रोगापासून आपले सोयाबीन पीक वाचू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com