Animal Husbandry : पशुसंवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने...

Animal Care : जनावरांचे लसीकरण आणि जंत निर्मूलन ही कामे शास्त्रीयदृष्ट्या पावसाळ्यापूर्वीच पूर्ण झालेली असतात. त्यामुळे यात फारसे काही काम पशुसंवर्धन पंधरवड्यात करता येणार नाही.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

Animal Health Management : पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ पशुसंवर्धन पंधरवडा साजरा करीत आहे. शेतीपूरक व्यवसायात पशुपालन अग्रक्रमावर असून, या व्यवसायात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याची प्रचंड क्षमता आहे. परंतु त्या क्षमतांचा पुरेपूर वापर होताना दिसत नाही.

पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठी उच्च वंशावळीची पैदास करणे, दुधाळ जनावरांचा भाकड काळ कमी करणे, कृत्रिम रेतनाद्वारे नियमित वेत घेणे, जनावरांचे आहार-आरोग्य योग्य प्रकारे सांभाळणे, त्याचबरोबर दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या खरेदी-विक्रीसाठी बॅकवर्ड, फॉरवर्ड लिंकेजेस तयार केल्या तर पशुधनाचे उत्पादन आणि पशुपालकांचे उत्पन्नही वाढू शकते.

या सर्व बाबींच्या अनुषंगाने केंद्र-राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत जनजागृती, लसीकरण व जंत निर्मूलन, वंध्यत्व निवारण व पशू आरोग्य शिबिरांचे आयोजन, दूध अनुदान योजनेबाबत मार्गदर्शन, पशुचारा-पशुखाद्याचे महत्त्व पशुपालकांना पटवून देणे आणि पशू गणनेचे महत्त्व विषद करणे असे व्यापक उपक्रम या पंधरवड्यात राबविले जाणार आहेत.

मुळात या सर्व पातळ्यांवर पशुसंवर्धन विभागामार्फत नियमित काम सुरू असते. असे असताना बहुतांश योजना पशुपालकांपर्यंत पोहोचत नाहीत, पोहोचल्या तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामागील कारणांचा शोध घेतला असता गाव-तालुका पातळीवर काम करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडे अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो, शिवाय कृषी प्रमाणेच पशुसंवर्धन विभागातही बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे योजनांचा प्रसार-प्रचारांपासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत अनंत अडचणींचा सामना विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना करावा लागतो.

Animal Husbandry
Animal Husbandry : पशुपालनातून सावरली आर्थिक घडी

दुसरा मुद्दा हा पशुसंवर्धन पंधरवड्याच्या वेळकाळाचा आहे. हा पंधरवडा पावसाळ्याच्या मध्यावर घेण्यात येतो. जनावरांचे लसीकरण आणि जंत निर्मूलन ही कामे शास्त्रीयदृष्ट्या पावसाळ्यापूर्वीच पूर्ण झालेली असतात. त्यामुळे यात फारसे काही काम या पंधरवड्यात करता येणार नाही.

इतर उपक्रमांमध्येही बहुतांश शिबिरांचे आयोजन करून पशू पालकांपर्यंत केवळ माहिती पोहोचविण्याचे काम प्रामुख्याने होणार आहे. परंतु शेतकरी सध्या खरीप आंतरमशागतीच्या कामांत व्यस्त आहेत. सतत पावसाने बऱ्याच भागात पूर परिस्थिती आहे. शिवाय उघडीप मिळाली की निंदणी, डवरणी, पिकांना खते देणे, कीडनाशकांच्या फवारण्या करणे ही कामे उरकून घेण्यात शेतकऱ्यांचे प्राधान्य असणार आहे.

Animal Husbandry
Department of Animal Husbandry : पशुसंवर्धन विभागाच्या तीन एकर जागेवर डल्ला

त्यामुळे पंधरवाड्यांतर्गत शिबिरांना कितपत प्रतिसाद मिळतो, याबाबत शंकाच आहे. लसीकरण असो, कृत्रिम रेतन असो की आजारी जनावरांवर इलाज असो, पशुवैद्यकाकडे जनावरांना ओढत घेऊन जाण्यापेक्षा घरपोच सेवा अधिक सोयीची ठरते. त्यामुळे पशुपालकही अशाच सोयीची अपेक्षा करतात.

दूध अनुदान योजनेबाबत उत्पादकांच्या शंकांचे निरसन करण्यापेक्षा यातील किचकट अटी-शर्ती दूर करून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर विभागाने भर द्यायला हवा. पशुपालन व्यवसायात सकस चारा, पशुखाद्याचे महत्त्व पशुपालकांना पटलेले आहे. दुष्काळात चारा टंचाई आणि पशुखाद्याचे वाढलेले दर ह्या पशुपालकांच्या समस्या आहेत.

पशुधनाला वर्षभर चारा पुरेल, असे नियोजन पशुसंवर्धन विभागाने करायला पाहिजे. शिवाय पशुखाद्याचे दर कसे नियंत्रणात राहतील हे सुद्धा पशू संवर्धन विभागासह राज्य सरकारने पाहायला हवे. ‘चारा स्वयंपूर्ण गाव’ ही संकल्पना चांगली असली तरी सर्वत्र बारमाही सिंचनाची उपलब्धता हा त्यातील अडसर ठरू शकतो. अशावेळी बारमाही बागायती विभागांतील गावात ही संकल्पना राबवून तेथून दुष्काळी भागात चारा पोहोचविण्याचे काम झाले पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com