

Editorial Article on Scientist Jayant Narlikar: ज्ञानियांच्या जगात प्रकांड पंडित म्हणून दबदबा राखून असलेल्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची घरातल्या नातवंडांमधली ओळख मात्र ‘मस्त गोष्टी सांगणारे, विज्ञानाचा खाऊ वाटणारे आजोबा’ एवढीच असावी, असे काहीतरी मराठी विचारविश्वाचे झाले आहे. जयंत विष्णू नारळीकर हे नाव जागतिक विज्ञानपटावर ठळकपणे नोंदले गेले असले, तरी मराठी साहित्यविश्वात मात्र छानदार विज्ञान काल्पनिका रंगवून सांगणारे नारळीकरच लक्षात राहतील.
सर्वसामान्य लोकांनाच नव्हे, तर अगदी नामवंत साहित्यिकांनाही विज्ञानाची भीती वाटते, ही गोष्ट चांगली नाही, असे त्यांना मनापासून वाटत असे. लोक आणि विज्ञानातले हे अंतर कमी करण्यासाठी डॉ. नारळीकर अक्षरशः झटले. प्रसंगी आपले आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक वलय विसरून या कार्यात रमले.
विज्ञानाचे आणि लोकांचे नाते घट्ट होण्यासाठी आपल्यालाच दुवा व्हावे लागेल, ही खूणगाठ जणू त्यांनी मनाशी बांधली होती. काल्पनिकांच्या माध्यमातून विज्ञानातली गुह्ये त्यांनी सामान्य वाचकांच्या गळी उतरवली. अद्भुताची सफर घडवून आणणाऱ्या त्यांच्या कथा-कादंबऱ्या मराठी सारस्वतात अढळ स्थान मिळवत्या झाल्या आहेत. डॉ. नारळीकरांच्या पश्चात ते संचितच आपल्याला पुढला मार्ग दाखवेल.
बुद्धिमत्तेचा समृद्ध वारसा घेऊन आलेल्या नारळीकरांची शैक्षणिक कारकीर्द नेहमीच देदीप्यमान राहिली. केंब्रिजमध्ये सहविद्यार्थी स्टीफन हॉकिंगशी गप्पाष्टक जमविणारे, त्यांच्याशी टेबलटेनिस खेळणारे, विख्यात संशोधक आणि गुरुवर्य फ्रेड हॉइल यांच्याशी शास्त्रीय वादचर्चा करणारे नारळीकर हे कुठल्याही अर्थाने अत्यंत यशस्वी आयुष्य जगत होते. गुरू हॉइल यांची ‘स्टेडी स्टेट थिअरी’ तेव्हा खगोलज्ञांमध्ये चर्चेत होती. एका महास्फोटातून विश्वाची उत्पत्ती झाली, हा जो सर्वमान्य होत चाललेला सिद्धांत होता, त्याला हॉइल यांच्या ‘स्टेडी स्टेट’ सिद्धांताने छेद दिला.
त्यांच्या मते हा महास्फोट वगैरे काही झाला नाही. ‘जेनेसिस’मधल्या सश्रद्ध वर्णनाला वैज्ञानिक स्वरूप देण्याचा हा प्रकार आहे. उल्कापात, वैश्विक धूळ, लघुग्रह, धूमकेतू याद्वारे सूक्ष्मजीवांचे विश्वात वाटप होत गेले, त्यातून विश्वनिर्मिती झाली असावी, अशी हॉइल यांची धारणा होती. पण या धारणेला बळ देणारे पुरावे मात्र हॉइल यांना देता आले नाहीत. ते जमा करण्याच्या प्रयत्नात गुरू हॉइल आणि त्यांचे लाडके शिष्योत्तम जयंत नारळीकर यांनी एका गुरुत्वीय सिद्धांताची मांडणी केली.
हा हॉइल-नारळीकर सिद्धांत खगोलभौतिकीच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा ठरला. बुद्धिमान शास्त्रवेत्त्यांच्या मांदियाळीत नारळीकर हे भारतीय नाव दाखल झाले ते साठीच्या दशकातच. पण नंतर मायदेशातील बिरादरांचे आपण काही देणे लागतो, याची जाणीव ठेवून डॉ. नारळीकर भारतात परतले. वास्तविक तो सगळा काळ ‘ब्रेन ड्रेन’चा! पैशासाठी अनेक बुद्धिमंत परदेशी निघून जात होते.
त्या काळात नारळीकरांनी मात्र प्रवाहाच्या उलट आपल्या जीवनाचे गलबत हाकारले. मायभूमीचे पांग फेडणे म्हणजे यापेक्षा वेगळे काय असते? मनात आणले असते तर धनांच्या राशी त्यांच्या पायाशी पडल्या असत्या. पण ते सारे सोडून त्यांनी भारतात खगोल भौतिकी संशोधनाचा पाया रचला. पुण्याजवळ उभी राहिलेली ‘आयुका’ ही संस्था डॉ. नारळीकरांच्या कर्तृत्वाचा मानबिंदू मानायला हवा आणि महाराष्ट्राचा तर तो अभिमानबिंदू ठरावा!
न्यूटनने ज्या सफरचंदाच्या झाडाखाली बसून गुरुत्वाकर्षणाचे गणितीय कोडे सोडवले, असे म्हणतात. त्या झाडाची एक फांदी आणून पुण्याच्या ‘आयुका’च्या आवारात लावलेली आहे. नारळीकरांनीच ती तिथून आणून लावली होती. नारळीकरांच्या निधनानंतर हे प्रकर्षाने जाणवले, की हे फांदीचे रूपक किती किती अर्थपूर्ण आहे. नारळीकरांच्याच कथेतले एखादे भाकीत खरे ठरावे, अगदी तसे!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.