Agriculture Rain Alert : जूनमधील पावसाला उशिरा सुरुवात झाली, मध्ये मोठे खंड पडले आणि एकंदरीत पावसाचे वितरण खूप असमान होते. मात्र, जुलै महिना लागताच राज्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. आठ जुलैला कोकणासह विदर्भ, मराठवाड्यातही मुसळधार पाऊस झाला. खानदेशात थोडा पावसाचा जोर कमीच होता.
१० जुलैदरम्यान राज्यात मुसळधार पावसाची बॅटींग सुरूच होती. यावेळी खानदेशातही पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. १५ जुलैला राज्यातील ९५ मंडलांत १०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.
१७ जुलैदरम्यान कोकण किनारपट्टीसह विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पाऊस होऊन जळगावसह खानदेशालाही पावसाने दिलासा दिला. १७ जुलैनंतर मागील पाच दिवसांपासून राज्यात धुवाधार पाऊस पडत आहे.
कोकण, कोल्हापूर तसेच पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक असल्याने तिथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला, जनजीवनही विस्कळीत झाले आहे. जुलैमधील पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले.
नदी-नाले खळाळून वाहत आहेत. भूगर्भातील पाणी पातळी वाढली आहे. बहुतांश धरणांतील पाणीसाठा देखील वाढला आहे. सध्याचे पावसाळी वातावरण पाहून शांता शेळके यांच्या ‘पाऊस’ या कवितेतील ओळी आठवतात.
सुस्नात जाहली धरणी हांसली
वरुणाच्या कृपावर्षावाने संतोषली
एकंदरीतच काय तर पावसानं सारं रान चिंब झालं आहे. वरुणराजाच्या कृपावर्षावाने धरणीवर सर्वत्र आबादानी पसरली आहे. पाऊस म्हणजे उत्साह, पाऊस म्हणजे ऊर्जा, पाऊस म्हणजे आनंद, समृद्धी अन् भरभराटही!
शेतीचे तिन्ही हंगामाचे गणित तर मॉन्सूनच्या पावसावरच अवलंबून आहे. एवढेच नव्हे, तर आपल्या देशात शेतीची भरभराट म्हणजे बहुतांश उद्योग-व्यवसायाचीही भरभराट, असे सूत्र ठरलेले आहे.
असे असले तरी अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांच्या काही भागांत पिकांसाठी तसेच धरणांतील पाणीसाठा वाढण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात तर अजूनही पावसाने ओढ दिलेली असल्याने खरिपातील पिके करपत असून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर घोंघावत आहे. पावसाळी चार महिन्यांत मोजून १५ ते २० दिवसांतच पडणाऱ्या पावसाचे पाणी पुढे आठ महिने पुरवायचे असते.
पाण्याचा प्रत्येक थेंब अडविला, जिरविला पाहिजे, असे शासनापासून ते शेतकऱ्यांपर्यंत केवळ म्हटले जाते. प्रत्यक्ष कृती मात्र सर्वांकडूनच फार कमी होते. त्यामुळेच मागील चार वर्षे राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले आहे.
धरणात साठलेल्या पाण्याचा बाष्पीभवनासह ते शेतात पोहोचेपर्यंत अपव्ययच जास्त होतो. भूगर्भसाठेही अनियंत्रित उपशाने लवकरच कोरडे पडतात. ही सर्व परिस्थिती बदलावी लागणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून गावशिवारात होणाऱ्या मृद् जल संधारणांचे अपेक्षित परिणाम (काही अपवाद वगळता) दिसत नाहीत. अशावेळी शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवरच आपले शेत हेच पाणलोट क्षेत्र समजून उपाय योजना करायला हव्यात.
शेताची चांगली बांधबंदिस्ती, शेतात उताराच्या दिशेने बांधालगत खोल चर, उताराला आडवी मशागत याशिवाय पीक लागवड करताना बीबीएफ अर्थात रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब असे उपाय शेतकरी आपल्या शेतात करू शकतात.
बीबीएफ पद्धतीने जमिनीत पावसाचे पाणी मुरते, ओलावा अधिक काळ टिकून राहतो, पावसाच्या खंडात हा ओलावा पीक वाढीस उपयुक्त ठरतो. अतिवृष्टीत सरीमधून पाणी वाहून जात असल्याने पिकांचे नुकसान होत नाही.
विभागनिहाय मूलस्थानी जलसंधारणाचे तंत्र विकसित झालेले असून, अत्यंत उपयुक्त अशा या तंत्राचा शेतकऱ्यांनी अवलंब वाढवायला हवा. संरक्षित सिंचनासाठी शेत तेथे शेततळे केले पाहिजेत. यासाठी शासनाची योजना पण आहे. असे केल्याने पावसाच्या खंडात पिकांना संरक्षित पाणी देऊन ती वाचविता येऊ शकत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.