
Early Monsoon Arrived: यंदाचा पावसाळा वेगळा ठरणार याची चुणूक मे महिन्यातच दिसून आली. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पूर्वमोसमी पावसाचे अक्षरशः थैमान सुरू आहे. वळवाचा अथवा पूर्वमोसमी पाऊस हा एक-दोन दिवसांत पडून उघडतो. परंतु मागील पंधरा दिवसांपासून तर सतत लागून असलेल्या मूर पावसाने हा मॉन्सूनचाच पाऊस असावा, अशा चर्चाही रंगल्या.
या पार्श्वभूमीवर यंदा तब्बल ११ दिवस आधी राज्यात मॉन्सून दाखल झाला. यावर्षी आकाशाकडे टक लावून वाट पाहण्याची गरज पडली नाही. वेळेआधी आगमन झालेल्या मॉन्सूनचे स्वागत करावे की त्याने पंचाईत करून ठेवल्यामुळे पुढच्या नियोजनाची चिंता वाहावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
राज्यात अनेक भागांत सलग दहा-बारा दिवस पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यानंतर थोडीही उसंत न देता मॉन्सून डेरेदाखल झाला. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतींचा खोळंबा झाला. एकूण खरीप पेरण्यांचे सगळे नियोजन बिघडले आहे. मे महिन्यात झालेल्या पूर्वमोसमी पावसानेच अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आले.
विहिरींची पाणी पातळी वाढली. या पूर्वमोसमी पावसामुळे फळपिके, भाजीपाला, हंगामी पिकांचे जबर नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. सध्या पाऊस सुरू असला तरी मॉन्सूनच्या प्रवासाची गती मंगळवारपासून कमी होण्याची शक्यता आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईत खरीप पेरण्या उरकल्या तर त्यात नुकसान होऊ शकते, हा त्यामागचा तर्क.
सध्या बहुतांश ठिकाणी पेरणी करण्यायोग्य वाफसा स्थितीच नसल्यामुळे पेरण्यांसाठी घाई करण्याचा मुद्दा तसा सध्या तरी गैरलागू आहे. परंतु वाफसा आल्यानंतर पेरण्या उरकल्या आणि नंतर जून महिन्यात पावसात मोठा खंड पडला तर काय करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
जूनमध्ये पावसाचा खंड पडेल असा ढोबळ अंदाज असला तरी त्याचा कालावधी नेमका काय राहील, याबद्दल हवामान विभागाकडून ठोस अंदाज व्यक्त करण्यात आलेला नाही. आजच्या घडीला पावसाचा खंड निश्चितपणे सांगणे शक्य दिसत नाही. त्यामुळे पेरण्या कधी होणार आणि त्यांचे भवितव्य काय राहणार, हा प्रश्न गुंतागुंतीचा बनला आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी शेतकऱ्यांची गोची झालेली आहे.
एरवी चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या मॉन्सूनने वेळेआधीच हजेरी लावून शेतकऱ्यांना बेसावध गाठले आहे. पेरणीपूर्व मशागती, पीक कर्जाची तजवीज, खते-बियाणे व इतर निविष्ठांची उपलब्धता या सगळ्याच आघाड्यांवर काहीच तयारी झालेली नसताना पावसाने दमदार सुरूवात केल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे.
यावर्षीचे पाऊसमान आणि पीक परिस्थिती देखील दरवर्षीपेक्षा भिन्न असणार आहे. अशा वेळी हवामान विभागाकडून अल्पकालीन आणि दीर्घकालीन अंदाज अधिक अचूक मिळायला हवेत. तसेच कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाने नेहमीच्या सरकारी पठडीतले पीकसल्ले देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणींचा विचार करून त्यांना उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन करायला हवे.
अशा कसोटीच्या वेळी आपल्याकडील कृषी संशोधन व विस्तार व्यवस्थेचे पितळ उघडे पडते. गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाच्या संकटाचे तडाखे बसत असूनही कृषी संशोधनासाठी निधी, मनुष्यबळ व पायाभूत सुविधा यांची भरभक्कम तरतूद करण्याची निकड धोरणकर्त्यांना वाटत नाही.
हा विषय राजकीय अजेंड्यावर येतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे. इतःपर या आघाडीवर अधिक उशीर करणे म्हणजे आत्मघात ओढवून घेण्यासारखे आहे, हा धडा वेळेआधी आलेल्या मॉन्सूनच्या निमित्ताने तरी एक समाज म्हणून आपण शिकणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.