Monsoon 2025: मॉन्सून आला अन् मनसोक्त बरसूही लागला...

Maharashtra Weather: यावर्षी मॉन्सूनने महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १२ दिवस आधीच हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी संभ्रमात असताना, हवामानाची अचूक समज हीच खरी गरज ठरते.
Monsoon
MonsoonAgrowon
Published on
Updated on

Rainfall Prediction India: चांगल्या पाऊसमानाच्या अंदाजानंतर यावर्षी मॉन्सून ठरावीक तारखेच्या १२ दिवस आधीच राज्यात दाखल झाला आहे. शेतकऱ्यांसाठी ही मुळातच गोंधळाची स्थिती असताना काही माध्यमांनी मॉन्सूनबाबत उलटसुलट चर्चा करून त्यांच्या गोंधळात भर घालण्याचे काम केले. अशावेळी प्रत्यक्ष परिस्थितीशी शेतकऱ्यांना अवगत करणे हेच त्यांच्या हिताचे ठरेल.

यंदाच्या वर्षी १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतला नैऋत्य मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा ५ टक्के अधिक राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने १५ एप्रिल रोजी वर्तवला होता. त्यानंतर नैऋत्य मॉन्सून अंदमान निकोबार द्वीपसमूहात १३ मे रोजी म्हणजे सरासरी तारखेच्या नऊ दिवस आधीच दाखल झाल्याची दुसरी खुषखबर देशाला मिळाली. त्याच सुमारास वातावरणात अशा काही घडामोडी झाल्या की, महाराष्ट्रावरची उष्णतेची लाट ओसरली आणि सर्वत्र वादळी पाऊस पडू लागला.

जणू उन्हाळा जाऊन पावसाळा सुरू झाला असे लोकांना वाटू लागले. महाराष्ट्राच्या हवामानात हा अचानकपणे झालेला बदल माध्यमांसाठीही एक चर्चेचा विषय बनला. काहींनी तर १० दिवसांपूर्वीच जाहीर केले की, महाराष्ट्रात मॉन्सून आला आहे. कोणी म्हणाले की, भारताच्या किनारपट्टीवर एक भीषण चक्री वादळ येऊन धडकेल. त्या वादळाचे त्यांनी शक्ती असे नामकरणही करून टाकले. इतर काहींनी सांगितले की, मॉन्सूनचे वेळापत्रक आता बदलले असून भविष्यातही असेच होत राहणार आहे.

Monsoon
Monsoon 2025: जूनमध्ये मान्सूनची स्थिती कशी असेल?

चक्री वादळे

भारतीय उपखंडाच्या परिसरात विनाशकारी चक्री वादळांची निर्मिती एकसारखी होत नसते. ती फार तर वर्षात पाच सहा वेळा होते. चक्री वादळांची निर्मिती फक्त समुद्रावर होते, जमिनीवर नाही. कारण त्यासाठी लागणारी प्रचंड उष्णता आणि बाष्प समुद्रावरच उपलब्ध असते. यामुळे महाराष्ट्रावर चक्री वादळ कधीच उद्भवू शकत नाही. ते अरबी समुद्रावर उद्भवू शकते आणि परिस्थिती अनुकूल असल्यास ते कोकणचा किनारा ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश करू शकते. जर ते उलट दिशेने म्हणजे ओमान देशाकडे निघून गेले तर आपल्याला त्याचा काही धोका राहत नाही.

चक्री वादळांची निर्मिती पावसाळ्यात आणि हिवाळ्यात होत नाही. ती एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या चार निवडक महिन्यांतच होते. कारण त्याच वेळी अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर भरपूर तापलेले असतात. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात जर अरबी समुद्रात चक्री वादळ निर्माण झाले तर त्याचा मॉन्सूनच्या आगमनावर दोन प्रकारे प्रभाव होऊ शकतो. जर भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर अशी त्याची वाटचाल राहिली तर मॉन्सून उत्तरेकडे खेचला जातो आणि महाराष्ट्रावर तो नेहमीपेक्षा लवकर पोहोचतो.

उलट जर चक्री वादळ ओमानच्या दिशेने दूर गेले तर वातावरणातील बाष्प ते बरोबर वाहून नेते आणि मॉन्सूनचा प्रवाह कमजोर पडतो. म्हणून मॉन्सून महाराष्ट्रावर कधी पोहोचेल हे ठरवताना हे पर्याय विचारात घ्यावे लागतात. हल्ली सोशल मीडियाद्वारे आणि विशेषतः यूट्यूब चॅनलवरून स्वतःचा हवामानाचा अंदाज सांगणारे पुष्कळ लोक आहेत. हवामानाविषयीची माहिती पुष्कळदा ब्रेकिंग न्यूजच्या स्वरूपात घाईघाईने घोषित केली जाते. शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या माहितीची व अंदाजांची विश्वसनीयता पडताळून पाहणे गरजेचे आहे. हवामान विभागाची अधिकृत माहिती विचारात घेणे त्यांच्या फायद्याचे ठरेल.

Monsoon
Monsoon 2025: माॅन्सून सोलापूर, पुणे, मुंबईत दाखल; ३ दिवसात आणखी पुढे सरकणार

स्थानिक वादळे

वातावरणातील सगळे प्रवाह सरळ रेषेत मार्गक्रमण करत नसतात. काही वाऱ्यांचा मार्ग चक्राकार असतो, पण ते सगळेच वादळी नसतात. सगळ्याच कमी दाबाच्या क्षेत्रांचे चक्री वादळात रूपांतर होत नाही. चक्री वादळे आणि चक्राकार फिरणारे प्रवाह यांच्यातला फरक जाणून घेतला तर उगीच भीती निर्माण होणार नाही. एप्रिल-मे महिन्यात महाराष्ट्रावर सामान्यपणे स्थानिक वादळे उद्भवतात.

त्यांची व्याप्ती, त्यांतील वाऱ्यांची गती आणि त्यांतून होणारी पर्जन्यवृष्टी चक्री वादळांच्या मानाने खूपच कमी असते. स्थानिक वादळांचा प्रभाव फार तर आठ-दहा किलोमीटरपर्यंत सीमित असतो. स्थानिक वादळांमुळे मोठी जीवितहानी क्वचितच होते. पण कापणीसाठी तयार झालेल्या पिकांचा नाश होऊ शकतो हे खरे आहे. सलग काही दिवस पाऊस पडत राहिला तर भूस्खलन होऊ शकते. कधी कधी गाराही पडतात.

काही ठिकाणी वीज कोसळते. चक्री वादळ व स्थानिक वादळ यांच्यातील फरक शेतकऱ्यांनी अवश्य जाणून घ्यावेत. अमक्या शेतावर इतक्या वाजता वादळी पाऊस पडेल हे कोणालाही निश्चितपणे सांगता येत नाही पण हवामान विभागाच्या मौसम व दामिनीसारख्या ॲप वर हवामानाच्या परिस्थितीची माहिती अपडेट केली जात असते जी शेतकऱ्यांनी जरूर वेळोवेळी पाहण्याची सवय करावी.

मॉन्सूनची ओळख

मॉन्सूनपूर्व पाऊस बहुधा मुसळधार किंवा वादळी स्वरूपाचा असतो. तो अर्ध्या-एका तासात पडून जातो. पण मॉन्सूनच्या हलक्या, रिमझिम पावसाची संततधार पडत राहते. मॉन्सूनपूर्व ढग लहान पण उंच असतात. त्यांतून गडगडाट होतो, वीज चमकते. मॉन्सूनचे ढग मध्यम उंचीचे पण विस्तृत असतात.त्यांतून मेघगर्जना किंवा विजेचा लखलखाट होत नाही. आपण आकाश न्याहाळून बघितले किंवा उपग्रह चित्रे पाहिली तर हे फरक लगेच जाणवतात. म्हणून मे महिन्यातला पाऊस मॉन्सूनचा आहे की नाही हे आपण स्वतःच ठरवू शकतो.

त्याशिवाय शेतकऱ्यांना उपयोगी पडतील असे सतर्कतेचे इशारे हवामान विभागातर्फे वेळोवेळी दिले जात असतात. हे इशारे पूर्ण जिल्ह्यासाठी असतात. जिल्ह्यात सर्वत्र काही विपरीत घडेलच असे नाही. पण ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे खबरदारीचे उपाय करणे चांगले. आपण तयारीत राहिलो पण काही वाईट घडले नाही, हे आपण निष्काळजी राहिलो आणि पिकांचे नुकसान झाले यापेक्षा नक्कीच बरे.

सध्याची परिस्थिती

मॉन्सूनचे केरळवरील आगमन महत्त्वाचे मानले जाते. कारण तेथूनच त्याची पुढची वाटचाल सुरू होते. यंदाच्या मॉन्सूनचे केरळवरील आगमन १ जून या त्याच्या सरासरी तारखेपेक्षा आठ दिवस आधी म्हणजे २४ मे रोजी झालेले आहे. हा एक चांगला संकेत आहे. मॉन्सूनला केरळहून महाराष्ट्रावर पोहोचायला साधारणपणे १०-१२ दिवस लागतात, पण यावर्षी तो लवकरच आला. मॉन्सूनचे महाराष्ट्रावर येणे मागे-पुढे होऊ शकते. महाराष्ट्रावर यंदाच्या मे महिन्यात नेहमीपेक्षा पुष्कळ जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे जमिनीत आधीचाच ओलावा आहे. हे सगळे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी नेमकी कधी करायची ते ठरवावे.

९८५०१८३४७५

(लेखक ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com