Snail
SnailAgrowon

Agriculture Department : ‘मेटाल्डीहाइड’चा तिढा

Agriculture Inputs Procurement : शेती-माती-शेतकरी-प्राणी-पक्षी-पर्यावरण यांचे कितीही नुकसान झाले, तरी आम्ही केवळ आमचा स्वार्थ साधणार, अशी कृषी खात्यातील भ्रष्ट लॉबीची मानसिकता दिसते.

Snail Pest Control : थेट लाभ हस्तांतर प्रणालीला डावलून ३०० कोटी रुपयांच्या निविष्ठा खरेदीचा गैरप्रकार ताजा असतानाच आता शास्त्रज्ञांचा सल्ला डावलून मेटाल्डीहाइड खरेदीचा गैरप्रकार पुढे आला आहे. सुमारे २५ कोटी रुपयांच्या या खरेदी घोटाळ्यात कृषी खात्यातील एक लॉबी कार्यरत असून, त्या लॉबीचा मुख्य सूत्रधार मंत्रालयात असल्याची चर्चा आहे. राज्यात मागील दशकभरापासून पावसाळ्यात शंखी गोगलगायींचा उद्रेक पाहावयास मिळतो. ही कीड सोयाबीन, कापूस अशी हंगामी पिके फस्त करण्यापासून ते द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, संत्रा अशा फळपिकांचे मोठे नुकसान करीत आहे.

शंखी गोगलगाय तसेच वानू (पैसा) यांच्या उद्रेकाने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील या किडीची चांगलीच धास्ती घेतली आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डीहाइडचा वापर करण्याची शिफारस सर्रासपणे करण्यात येत होता. परंतु दोन वर्षांपूर्वी एका तज्ज्ञ समितीने मेटाल्डीहाइडचे पर्यावरणावरील घातक दुष्परिणाम पाहता त्याऐवजी आयर्न फॉस्फेट वापरण्याचे सांगितले होते.

Snail
Snail Control : शास्त्रज्ञांचा सल्ला डावलून ‘मेटाल्डीहाइड’ची खरेदी

परंतु हा अहवाल दाबून ठेवत कृषी खात्यातील एका लॉबीने मेटाल्डीहाइड खरेदी तसेच वापरास पूरक अनेक बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. एवढेच नव्हे तर २५० टन मेटाल्डीहाइड खरेदीस मान्यताही देण्याचे काम केले आहे. यावरून शेती-माती-शेतकरी-प्राणी-पक्षी-पर्यावरण यांचे कितीही नुकसान झाले तरी आम्ही केवळ आमचा स्वार्थ साधणार, अशी कृषी खात्यातील भ्रष्ट लॉबीची मानसिकता दिसते. हा सर्व प्रकार पर्यावरणाला घातक तर आहेच, परंतु कृषी विभागासह सरकारच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा आहे.

पावसाळ्यातील ढगाळ वातावरण, कमी सूर्यप्रकाश, जास्त पाऊस, जास्त आर्द्रता, कमी तापमान (२० ते ३२ अंश) या किडीला पोषक आहे. साधारण ५० मिमी पाऊस पडल्यावर शंखी गोगलगायी सुप्तावस्थेतून बाहेर येऊन नुकसान करायला सुरुवात करतात. आपल्याकडे कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव वाढला की त्याच्या उच्चाटन अथवा निर्मूलनाची मोहीम हाती घेतली जाते. त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाऐवजी रासायनिक कीडनाशकांचा वापर केला जातो. परंतु निसर्गातून कोणतीही कीड नष्ट करता येत नाही, हे अनेकदा आपल्या लक्षात येऊनही त्यापासून आपण काहीही धडा शिकत नाही.

Snail
Snail Control : गोगलगायीसाठी प्रतिबंधाबाबत उपाय करा

शंखी गोयलगाय ही काही पिकांना घातक ठरत असली तरी ती निसर्गातील अन्न साखळीचा एक घटक आहे. त्यामुळे गोगलगायींना नष्ट करण्यात पर्यावरणाची हानीच आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दिसली कीड की केली वापरले कीडनाशक, असा ट्रेंडच आपल्याकडे आहे. यातूनच शंखी गोगलगायी नियंत्रणासाठी मेटाल्डीहाइडचा वापर वाढतोय. परंतु पाऊस पडल्यावर मेटाल्डीहाइड प्रभावी ठरत नाही. शिवाय यातून माती प्रदूषणाबरोबर निसर्गातील अनेक प्राणी-पक्षी यांना धोका संभवतो.

मेटाल्डीहाइडऐवजी आयर्न फॉस्फेटचा वापर केल्यास ते पाऊस पडल्यावरही दोन आठवड्यांपर्यंत क्रियाशील राहते. आयर्न फॉस्फेटच्या वाफा होत नाहीत. टाकलेल्या जागेपेक्षा अधिक पसरत नाही. आयर्न फॉस्फेट हे पाळीव प्राणी, मानव, मासे, पक्षी, मित्रकीटकांसाठी सुरक्षित आहे. जमिनीतील गांडुळासारख्या जिवांसाठीही अपायकारक ठरत नाही. हे मेटाल्डीहाइडपेक्षा अधिक प्रभावी आहे.

परंतु कृषी विभागातील भ्रष्ट लॉबीला याचे काही एक देणंघेणं दिसत नाही. नैसर्गिक आपत्तींसह इतर अनेक संकटे वाढत असताना शेतकऱ्यांच्या सोयीचे निर्णय घेण्यापेक्षा कृषी विभाग निविष्ठांचा गोंधळ घालून त्यांना अडचणीत टाकण्याचेच काम करीत आहे.

या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजेत. मेटाल्डीहाइड वापराचा गोंधळ कृषी विद्यापीठांनी देखील दूर करायला हवा. शंखी गोगलगायींच्या नियंत्रणाकरीता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा देखील वापर वाढला पाहिजे. या बाबत कृषी विभागानेच शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन वाढवायला पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com