Snail Control : शास्त्रज्ञांचा सल्ला डावलून ‘मेटाल्डीहाइड’ची खरेदी

Pesticide Procurement : एका कंत्राटदाराच्या माध्यमातून तुंबड्या भरण्यासाठी कृषी खात्यातील एका लॉबीने २५० टन मेटाल्डीहाइड खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
Snail
SnailAgrowon

Pune News : उच्चपदस्थ अधिकारी व शास्त्रज्ञांच्या शासकीय समितीने नाकारलेल्या घातक कीटकनाशकाची खरेदी करण्यासाठी संशयास्पद घडामोडी झाल्याची माहिती हाती आली आहे. एका कंत्राटदाराच्या माध्यमातून तुंबड्या भरण्यासाठी कृषी खात्यातील एका लॉबीने २५० टन मेटाल्डीहाइड खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी कंत्राटदाराला पाच हजार रुपये प्रति पाच किलोचा दर दिला जात आहे.

२५ कोटी रुपयांच्या या खरेदी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मंत्रालयात असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शंखी गोगलगायीमुळे होणाऱ्या शेतीमालाच्या नुकसानीचा अभ्यास करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी तज्ज्ञ समिती नेमली होती. या समितीत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त व कृषी सहसंचालक तसेच लातूरमधील कृषी सहसंचालक यांच्यासह कृषी विद्यापीठामधील दोन शास्त्रज्ञांचा समावेश होता.

Snail
Snail Control : गोगलगायीसाठी प्रतिबंधाबाबत उपाय करा

‘‘गोगलगाय निर्मूलनासाठी मेटाल्डीहाइडला पर्याय म्हणून आयर्न फॉस्फेट वापरले जावे. कोणत्याही स्थितीत रासायनिक कीटकनाशक वापरले जाऊ नये. त्यामुळे उपयुक्त कीटक व त्यावर अवलंबून असलेल्या जैवसाखळीतील पक्षी, प्राणी यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो,’’ असा अहवाल या समितीने दिला आहे. मात्र हा अहवाल कृषी खात्याने दाबून ठेवला आहे.

कृषी उद्योग महामंडळातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की मेटाल्डीहाइडचा विषय महामंडळाने आणलेला नाही. कृषी आयुक्तालयानेच ही बाब मंत्रालयाच्या डोक्यात घुसवली. त्यासाठी विस्तार संचालकाने बैठका घेतल्या. त्यातून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यास भाग पाडले. कृषी आयुक्तालयातील मंडळींनी मंत्रालयाला एक अहवाल पाठवला. त्यात मेटाल्डीहाइडबाबत स्पष्टपणे मुद्दे मांडले नाहीत. उलट राज्यात ५० हजार हेक्टरवर प्रतिहेक्टरी पाच किलो मेटाल्डीहाइड वापरण्यास हरकत नाही, असे सुचविले गेले.

हीच भूमिका कंत्राटदारासाठी उपयुक्त ठरली. कृषी आयुक्तालयाने सरकारी अहवाल दडवून ठेवला. मंत्रालयाला वस्तुस्थिती न सांगता उलट या कीडनाशकाचे नाव सुचवले. त्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांनीच शिफारस केल्याचा दावा केला. राज्यात आधीपासून या कीडनाशकाचा वापर होत आहे. मात्र खरेदीबाबत निर्णय शासनाने घ्यावा, असे आयुक्तालयाने शासनाला सुचविले. मेटाल्डीहाइडबाबत आयुक्तालयानेच संदिग्ध भूमिका घेतली, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Snail
Snail Crop Damage : मराठवाड्यात गोगलगायींचा ५५ हजार हेक्टरला फटका

कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार ११ मार्च २०२३ रोजी याबाबत शास्त्रज्ञांची मते जाणून घेण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. कमी पाऊस झाल्यास गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी कृषी विद्यापीठांनी मेटाल्डीहाइडची शिफारस केली असल्याचे बैठकीत सांगितले गेले.

सदर कीडनाशक आताही वापरास योग्य असल्याचेही शास्त्रज्ञांनीच सांगितले आहे. काही जिल्ह्यांत यापूर्वीही मेटाल्डीहाइडचा वापर झालेला होता. सध्याही शास्त्रज्ञ अनुकूल मत देत होते. त्यामुळे कृषी खात्याने यापूर्वीही मेटाल्डीहाइडची खरेदी केली होती. या बाबी विचारात घेत आम्ही मेटाल्डीहाइडचा वापर काळजीपूर्वक करण्याबाबत प्रस्तावित केले. कंत्राट वाटपाचा निर्णय आमचा नसून शासनाचा आहे.

शासकीय समितीचा अहवाल म्हणतो…

‘‘मेटाल्डीहाइड कीडनाशकाच्या गोळ्या ओलसर जमिनीत तीन दिवस तशाच राहतात. त्यामुळे पाळीव प्राणी किंवा कुत्रे, शेळी, पक्षी व जनावरांनी या गोळ्या खाल्ल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे पर्यावरणातील जैविक समतोल बिघडू शकतो.’’ असे शासकीय समितीच्या अहवाल सांगतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com