Public Transport: ‘प्रवाशांच्या सोईसाठी’, असे ब्रीदवाक्य असलेली एसटी मागील काही वर्षांपासून राजकारण्यांच्या स्वार्थासाठीच अधिक वापरली जात आहे..सटी, अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा हा बहुतेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. स्वस्त व सुरक्षित प्रवासी सेवा पुरविण्याबरोबर एसटीने विद्यार्थ्यांची, जेवणाच्या डब्यांची तसेच टपाल वाहतूक करून सेवाभावी वृत्ती जपत राज्याच्या विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. एसटीच्या विविध सवलतींचा अनेकांना फायदाही झाला आहे. सर्वसामान्यांसाठी उपयुक्त अशा एसटीचा राजकारण्यांनी वेळोवेळी त्यांना हवा तसा उपयोग करून हे महामंडळ तोट्यात घालण्याचे पाप केले आहे..Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला.आताही मुंबईतील लोकप्रतिनिधींनी केवळ अन् केवळ मतदारांना खुश करण्यासाठी राज्यभरातील प्रवाशांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. गणेशोत्सवाची धामधूम ही राज्यभर असते, कोकणात ती अधिकच असते, हे मान्य! मुंबईतील बहुतांश चाकरमानी वर्षभर कोकणात गेले नाही तरी, गणेशोत्सवात आपल्या गावाला जातातच. परंतु त्यासाठी एसटी महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या १४ हजार पैकी जवळपास निम्म्या (पाच हजार ७००) बसेसची खरेच गरज होती का, हा खरा प्रश्न आहे. .मागील अनेक वर्षांपासून सातत्याने एसटी महामंडळ तोट्यात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून देताना कोणताही व्यवहार्य विचार केला गेला नाही. गणेशोत्सवाला चाकरमान्यांना कोकणात सोडल्यानंतर पाच ते १० दिवसांनी त्यांच्या परतीच्या प्रवासाची मात्र काहीही सोय केली जात नाही. त्यामुळे परतीच्या प्रवासात त्यांची फरफट होतेच. त्याचवेळी मुंबई-कोकणात बहुतांश बसेस गेल्याने राज्यभरातील प्रवाशांची देखील ऐन सणासुदीच्या काळात एसटीविना फरफट होते, तसेच खासगी बसचालकांकडून त्यांची आर्थिक लूटदेखील होते, हे विसरून चालणार नाही..Modi Government Leadership: सैल झालेली पकड घट्ट करण्याचे प्रयत्न.गेल्या ४६ वर्षांमध्ये केवळ ८ वर्षे एसटी महामंडळ नफ्यात राहिले आहे, उर्वरित ३८ वर्षे ते तोट्यातच आहे. राज्यातील तब्बल ९० टक्के लोकसंख्येला थेट परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून ओळखली जाते. अशी एसटी पुढील काही वर्षांत सक्षम करू, महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी देखील उपाय योजना करू, अशा घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक देत असतात. परंतु प्रत्यक्षात एसटीचे चाक अधिकाधिक खोलात जाणाऱ्याच धोरणांचा अवलंब त्यांच्याकडून होतो. .खरे तर सणासुदीच्या काळात एसटीला नफा होण्याची शक्यता अधिक असते. अशा काळात जादा बसेस सोडून एसटीचा गाडा मार्गावर आणला जाऊ शकतो. परंतु गणेशोत्सवात मुंबईतील लोकप्रतिनिधींनी स्वार्थासाठी प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत त्यावर पाणी फेरण्याचे काम केले आहे. एवढेच नव्हे तर ग्रुप बुकिंगसाठी लावण्यात येणारा २७ टक्के अधिभार रद्द करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने एसटीचा खर्च अन् पर्यायाने तोट्यात वाढच होणार आहे. आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी एसटीने वर्षभरापूर्वी नवी नियमावली जाहीर केली असून, त्यातील बहुतांश नियम कागदावरच आहेत. .आजही एसटीची दैनंदिन प्रवासी संख्या ६० लाखांच्या आसपास आहे. असे असताना गेल्या काही वर्षांपासून एसटी पद्धतशीरपणे खिळखिळी केली जात आहे. तिकीटदर वाढवीत असताना गाड्या वेळेवर न येणे, रद्द होणे, वाटेतच बंद पडणे, त्या जुन्या-खिळखिळ्या झालेल्या असणे, स्थानकांच्या जीर्ण इमारती, अस्वच्छता, पिण्याचे पाणी-उपाहारगृहे-स्वच्छतागृहे आदी बाबतच्या असुविधा, अशा अनेक अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारचे खासगीकरणाचे धोरण! एसटीचे एकदमच खासगीकरण केल्यास जनक्षोभ उसळेल, म्हणून राज्यात टप्प्याटप्प्याने खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. या धोरणामुळे अनेक राज्यांमधली परिवहन मंडळांची सेवा डबघाईला आली आहे. महाराष्ट्राची एसटी वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न न झाल्यास तिही त्याच मार्गावरून जाईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.