
Lumpy Infection : विषाणूजन्य रोगाची लागण झाली तर तो आजार लवकर बरा होत नाही. बहुतांश औषधे थेट विषाणूवर प्रभाव पाडू शकत नसल्याने त्यांचे नियंत्रण कठीण जाते. त्यामुळेच पिकांमधील विषाणूजन्य आजारात बाधित पिके अथवा पिकांचा भाग काढून टाका, असा सल्ला दिला जातो.
मनुष्यप्राणी आणि पशुधनात तो होऊन नये म्हणून काळजी घेतली जाते, तसेच विषाणूजन्य रोगवाहक (कीटक, जीवजंतू) नियंत्रणावर भर दिला जातो. विषाणूजन्य आजाराबाबत अजून एक गंभीर बाब म्हणजे विषाणू वारंवार उत्परिवर्तनातून (म्युटेशन) आपला प्रकार-स्वरुप (व्हेरिएंट) सातत्याने बदलत असतो. त्यामुळे नवीन प्रकार आधीच्या उपचाराला दाद देत नाही आणि आजार बळावतच जातो. कोरोनाच्या बाबतीत हा अनुभव आपल्याला आला आहे.
प्रकार बदलून आलेली कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयानक होती. असाच काहीसा अनुभव आता पशुधनात लम्पी स्कीन आजाराबाबत येत आहे. राज्यात लसीकरण करूनही लम्पी स्कीनचा विषाणू नियंत्रणात येत नसल्याने नवीन व्हेरिएंट तयार झाला आहे का? याबाबत संशोधन सुरू आहे.
खरे तर अशा शंका गेल्या पावसाळ्यात या आजाराचा उद्रेक झाला होता तेव्हा शास्त्रज्ञांना आल्या होत्या. तेव्हाच नवीन व्हेरिएंटबाबत संशोधन होणे गरजेचे होते. परंतु तसे काही झाले नाही. आता ते काम हाती घेतलेच आहे तर नवीन व्हेरिएंटबाबतच्या संशोधन अधिक गतिमान करावे, शिवाय त्यात कोणताही कसूर राहणार नाही, हे पाहावे. लम्पी स्कीनचा नवीन व्हेरिएंट असल्यास त्यानुसार उपचाराची नवी पद्धती पण पशुतज्ज्ञांनी द्यायला हवी.
गेल्या वर्षी पावसाळ्यातच लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढला होता. वातावरणातील वाढती आर्द्रता, गोठ्यातील ओलावा यामुळे रोगप्रसार करणारे कीटक गोचीड, गोमाश्या यांची वाढ होते. शिवाय ढगाळ हवामान, उष्ण-दमट वातावरण आणि गोठ्यातील अंधारात लम्पीचा विषाणू अधिक सक्रिय होतो आणि प्रादुर्भाव वाढतो.
आता येथून पुढे जनावरांच्या बाजारात पशुधनाची गर्दी होणार आहे. बैलगाडा शर्यतीही चालू होतात. ऊस गळीत हंगामही तोंडावर असल्याने पशुधनाचे स्थलांतर वाढते. चारा-पाणीटंचाईत छावण्यांचा निर्णय झाला तर त्यात हा आजार मोठा अडथळा ठरू शकतो. अशा एकंदर परिस्थितीमध्ये लम्पी स्कीन आजार रोखणे हे मोठे आव्हानात्मक काम ठरणार आहे. विषाणूजन्य आजारावर लसीकरण हा प्रभावी उपाय असतो.
परंतु लम्पी स्कीनबाबत त्या आजारावरील विशिष्ट लस अजूनही आपल्याकडे तयार झाली नाही. सध्या आपण देत असलेली लस ही पर्यायी (गोट पॉक्स) लस आहे. या लशीची परिणामकारकता ८० टक्क्यांपर्यंतच आहे. त्यातही दुर्गम-डोंगराळ भागात लसीकरण झाले नाही. वासरे, गाभण गाईंना अनेकांनी लसीकरण केलेच नाही.
लसीकरण केलेले जनावर महिनाभरात बाधिताच्या संपर्कात आल्यास त्यालाही प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा परिस्थितीत तूर्त उपलब्ध गोट पॉक्स लस सर्व पशुधनाला देऊन घ्यावी. लम्पी स्कीन विशिष्ट लस (Lumpi-ProVacind) निर्मितीचे काम युद्धपातळीवर झाले पाहिजेत.
नवी लस उपलब्ध होईपर्यंत लम्पीला रोखण्यासाठीच्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांकडून तंतोतंत पालन होईल, ही काळजी घ्यायला हवी. बाधित जनावरांचे त्वरित विलगीकरण करून त्यावर शास्त्रशुद्ध उपचार सुरू करावेत. लहान वासरे बाधित जनावरांच्या संपर्कात येऊ देऊ नयेत.
जनावरांचे विलगीकरण झाल्यानंतर गोठा निर्जंतुक करून घ्यावा. लम्पीचा प्रसार कीटकांमार्फत होत असल्याने ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ हे अभियान सर्वांनीच गांभीर्याने घ्यायला हवे. कीटक निर्मूलन मोहीम राज्यभर राबवायला हवी.
टंचाईत चारा छावण्यांऐवजी चारा डेपोचा विचार करायला हवा. छावण्या करणे अपरिहार्य असल्यास त्यात लसीकरण केलेले पशुधनच येईल, शिवाय छावण्यांत बाधित जनावरांच्या योग्य दक्षतेची देखील सोय असली पाहिजेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.