Rabi Season : योग्य नियोजनातून ‘रब्बी’ करूया यशस्वी

Rabi Crops Management : रब्बी हंगामात पिकांचे योग्य नियोजन आणि काटेकोर व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केल्यास उत्पादनवाढीस हातभार लागणार आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon
Published on
Updated on

Rabi Farming : मॉन्सून काळात चांगला बरसलेला पाऊस, त्यास परतीच्या पावसाने दिलेली चांगली साथ यामुळे राज्यात यंदा रब्बी हंगामास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. जमिनीत भरपूर ओलावा आहे. बहुतांश जलाशये भरली आहेत. भूगर्भातील पाणी पातळी वाढवून विहिरी, बोअरवेल यांना चांगले पाणी आले आहे. त्यामुळे यावर्षी राज्यात सहा लाख हेक्टरने रब्बी पीकपेरा वाढण्याचे संकेत कृषी विभागाने दिलेले आहेत.

हंगाम खरीप असो की रब्बी पुरेशा निविष्ठांचे नियोजन आम्ही केले, असा दावा कृषी विभाग नेहमीच करीत असते. परंतु ठरावीक बियाणे, रासायनिक खते यांचा प्रामुख्याने तुटवडा राज्यात जाणवतोच. शिवाय निविष्ठांमध्ये बनावटपणा, भेसळ, लिंकिंग असे प्रकार राज्यात घडत असतातच. यावर आळा बसून शेतकऱ्यांना आवश्यक निविष्ठा पुरेशा प्रमाणात मिळतील, याची काळजी घ्यायला हवी. मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीत होणारे पिकांचे नुकसान, शेतीमालास मिळणाऱ्या कमी दरामुळे बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.

Rabi Season
Rabi Season 2024 : रब्बी हंगामासाठी बियाणे विक्रीसाठी सुरू

त्यामुळे पेरणी हंगामात उधारी उसनवारी शेतकऱ्यांना करावी लागते. अशावेळी अतिवृष्टीचे अनुदान तसेच खरीप पीकविमा विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून रब्बी पेरणीसाठी शेतकरी उभा राहील, हेही पाहावे लागेल. चालू रब्बी हंगामात गरजू शेतकऱ्यांना वेळेत पुरेसे पीककर्ज उपलब्ध करून दिल्यासही शेतकऱ्यांना पेरणीसाठी उधारी उसनवारी करण्याची गरज पडणार नाही. यावर्षी धरणे भरणे असली तरी त्यातील पाण्याचा शेतकऱ्यांना योग्य वापर होईल, अशा पद्धतीने आवर्तनाचे नियोजन जलसंपदा विभागाने करायला हवे. रब्बी हंगामात विजेचा पुरवठाही दिवसा, पूर्ण दाबाने आणि अखंडित होईल, याची दक्षता महावितरण ने घेतली पाहिजे.

शेतकरी आपल्याकडील उपलब्ध संसाधने (जमीन पाणी) कुटुंबाची अन्न आणि अर्थ सुरक्षा यानुसार पिकांचे नियोजन करीत असतो. यावर्षी रब्बी हंगामात त्यांनी आपल्या देशाच्या अन्न अन् पोषण सुरक्षेचा देखील विचार करायला हवा. डाळी आणि खाद्यतेलाची आयात कमी करण्यासाठी कडधान्य आणि तेलबिया पिकांचा पेरा वाढविण्याचे प्रयत्न करायला हवेत. रब्बीमध्ये हरभरा वगळता फारसे कडधान्यांचे पर्याय नाहीत. त्यामुळे राज्यात हरभऱ्याचा पेरा बऱ्यापैकी होतो.

Rabi Season
Rabi Season 2024 : दमदार पाऊसमानामुळे ‘रब्बी’वर बळीराजाचा भर

परंतु तेलबियांमध्ये करडई, तीळ, जवस, सूर्यफूल, भुईमूग, मोहरी असे अनेक पर्याय शेतकऱ्यांसमोर आहेत. अशावेळी ज्वारी, गहू, मका या तृणधान्यांबरोबर तेलबियांच्या पेऱ्यावरही शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे. याशिवाय ऊस, केळी, कांद्यासह इतर भाजीपाला या बागायती पिकांचे नियोजन शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यासह इतर संसाधनाचा वापर करून करायला हवे. रब्बी हंगामातील जिरायती तशीच बागायती पिकांची पेरणी उपलब्ध ओलाव्यावर शक्य तेवढ्या लवकर होईल, ही काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी.

पीक पेरणीमध्ये फेरपालट तसेच आंतरपीक पद्धतीचा योग्य वापर करायला हवा. असे केल्यास उत्तम बेवडाचा फायदा पिकांना होण्याबरोबर उपलब्ध जमीन तसेच इतर निविष्ठांचा देखील कार्यक्षम वापर होण्यास हातभार लागतो. आंतरपीक पद्धतीने जोखीम कमी होऊन उत्पन्नाची शाश्वती मिळते. अशावेळी तज्ज्ञांच्या सल्ल्याने अथवा आपल्या अनुभवावर आधारित शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बीत आंतरपीक पद्धतीवर भर द्यायला हवा.

पाण्याची उपलब्धता अधिक असली तरी शेतकऱ्यांनी मोजून मापूनच पाण्याचा वापर करायला हवा. असे केल्यास उन्हाळी हंगामात पाणीटंचाई जाणवणार नाही. रब्बीत काटेकोर पीक व्यवस्थापनावर भर दिल्यास उत्पादन वाढीस हातभार लागू शकतो. सरकारने सुद्धा खरिपासह रब्बीतील शेतीमालाची योग्य दरात खरेदी होईल, शेतीमाल खरेदी-विक्रीत शेतकऱ्यांचे शोषण, लूट होणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे. असे झाले तर या वर्षीचा रब्बी हंगाम यशस्वी पार पडेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com