Kesar Mango : ‘केसर’चा वाढवा गोडवा

केसरला नोव्हेंबरमध्ये मोहोर आल्याने बाजारात फळे मार्च शेवटीच सुरू होतील. त्यामुळे दर चांगले मिळतील, असे संकेत सध्या तरी मिळताहेत.
Kesar Mango
Kesar MangoAgrowon

आंब्याच्या हंगामाची (Mango Season) सुरुवात हापूसने तर शेवट केसरने होतो, असा एक समज असून त्यात तथ्यही आहे. सर्वसाधारणपणे डिसेंबर-जानेवारीमध्ये केसरला मोहोर (Blossom) येतो आणि मेच्या शेवटी केसर बाजारात असतो. या वेळी हापूस (Hapus) बाजारातून संपत आलेला असतो. हंगामाच्या शेवटी केसर बाजारात येत असल्याने त्यास दर कमी मिळतो. याचवेळी गुजरातचा केसरही बाजारात आलेला असल्याने त्यासोबतही महाराष्ट्राच्या केसरला स्पर्धा करावी लागते. पुढे जून-जुलैमध्ये पाऊस पडताना राज्यात आंबा खाणे फारसे पसंत केले जात नाही.

Kesar Mango
Keasar Mango : यंदा केसर आंबा बाजारात लवकर येण्याचे संकेत

त्यामुळे मागणी आणि दरही कमीच असतात. मागील काही वर्षांपासून बदलत्या हवामानाने केसरला मोहोर दोन-तीन टप्प्यांत येत आहेत. त्यामुळे बाग व्यवस्थापनापासून ते फळे काढणीमध्ये सुद्धा अडचणी येतात. उशिराच्या आंब्याला मेमधील अति उष्णतेचा मारही बसतो. त्यामुळे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घटते. शिवाय मेमध्ये वादळेही सुटतात. त्यामुळे फळांचे नुकसान होते.

Kesar Mango
Kesar Mango : केसर आंब्याचे पीक व्यवस्थापन कसे कराल?

अर्थात, आंबा मोहोर प्रक्रिया तसेच फळांची काढणी लांबली तर उत्पादन आणि दर अशा दोन्ही पातळ्यांवर शेतकऱ्यांना फटका बसत आला आहे. मराठवाड्यातील केसर आंबा बागांचे या वेळचे चित्र मात्र थोडे वेगळे दिसते. महाकेसर आंबा बागायतदार संघातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील केसर आंबा बागायतदारांनी या वर्षी बागेत पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केल्यामुळे त्यांच्या बागा नियमित वेळापत्रकाच्या जवळपास एक महिना आधी मोहोरल्या आहेत. केसरला नोव्हेंबरमध्ये मोहोर आल्याने बाजारात फळे मार्च शेवटीच सुरू होतील. त्यामुळे दर चांगले मिळतील, असे संकेत सध्यातरी मिळताहेत.

आकार, रंग, गंध आणि स्वाद या गुणवैशिष्ट्यांनी केसर आंब्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हापूसच्या बरोबरीनेच केसर आंबासुद्धा देशांतर्गत तसेच जगभर ग्राहकांच्या पसंतीला उतरलेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे केसरला जीआय, अर्थात भौगोलिक मानांकनही मिळाले आहे. १९९० च्या दशकात गुजरातमधून आपल्या राज्यात दाखल झालेल्या केसर आंब्याचे क्षेत्र आज ४० हजार हेक्टरपर्यंत जाऊन पोहोचले आहे.

बांधावर आंब्याचे दोन-चार झाडे किंवा आमराया पाहिलेल्या शेतकऱ्यांना बाग लावून त्याचे शास्त्रीय व्यवस्थापन करावे लागते, हे पचनीच पडले नसल्यामुळे सुरुवातीला आंबा बागा फारशा यशस्वी झाल्‍या नाही. परंतु आता ‘महाकेसर’च्या माध्यमातून घन, अतिघन लागवडीबरोबर तंत्रज्ञानाचा वापर केसर आंबा बागेत होत आहे. त्यामुळे उत्पादन वाढून केसरच्या बागा उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरू लागल्या आहेत. लवकर मोहोर येऊन फळधारणेसाठी केसर आंबा बागेत पॅक्लोब्युट्राझोलचा वापर वाढला आहे. त्याची गोड फळे या हंगामात उत्पादकांना चाखायला मिळतील, अशी आशा आहे.

केसरला राज्यात राजाश्रय मिळाला तर बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारण्याबरोबर निर्यातीतून देशाला मोठे परकीय चलन मिळू शकते. राज्यातील शेतकऱ्यांनी घन, अतिघन बागा यशस्वी केल्या तरी कृषी विद्यापीठे अजूनही याची शिफारस करण्यास कचरतात. अधिक गंभीर बाब म्हणजे निर्यातीसाठी कशा प्रतीचा केसर आंबा पाहिजेत, त्याचे उत्पादन कसे घ्यायचे अथवा निर्यातीसाठीची ‘ए टू झेड’ प्रक्रिया काय? याबाबत उत्पादकांना आजही व्यवस्थित मार्गदर्शन होत नाही.

आखाती देश असो की युरोपीयन जगभरातून केसर निर्यातीला मोठा वाव आहे. ही आपल्यासाठी संधी असून पणन मंडळ, अपेडा, वाणिज्य, कृषी मंत्रालय यांनी केसरची निर्यात वाढविण्यावर भर द्यायला हवा. निर्यातदारांसह शेतकरी, त्यांचे गट, उत्पादक संघ, कंपन्या यांना केसर आंबा निर्यातीसाठी सर्व सेवासुविधांसह अनुदान द्यायला हवे. असे झाले तर उत्पादकांबरोबरच जगभरातील ग्राहकांनाही केसरचा गोडवा चाखता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com