
Climate Change Effect : हवामान बदलामुळे कृषी तसेच फलोत्पादन (Horticulture) क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित होत असताना कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा (Hapus Mango) यातून कसा सुटणार? मागच्या वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने कोकणात कहर केला होता.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनावर विपरीत परिणाम झाला होता, उत्पादन घटून ३२ ते ३४ टक्क्यांवर आले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी अवकाळी पाऊस वा अतिवृष्टी सुदैवाने जानेवारीपर्यंत तरी नव्हती.
अर्थात, या वर्षी थंडीचा अनियमितपणा व वारंवार निर्माण होणाऱ्या अभ्राच्छादित वातावरणामुळे मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव आंब्यावर वाढला.
त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी कोकणातीत शेतकऱ्यांनी महागड्या रासायनिक कीडनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी केली. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
याच दरम्यान फेब्रुवारीपासून ५ ते १० टक्के शेतकऱ्यांचा आंबा विक्रीस बाजार समित्यांत दाखल होऊ लागला. अर्थात, मागच्या वर्षीच्या तुलनेने ही सुरुवात निश्चितच सुखद होती.
परंतु फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोकणात साधारणतः ३२ ते ३५ अंश सेल्सिअस असलेले तापमान अचानक ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. कोकणातील शेतकऱ्यांसाठी हे नवीनच संकट अनुभवास आले.
याचा दुष्परिणाम म्हणजे अति उष्णतेमुळे सुपारी एवढ्या आंब्यांचा खच बागांमध्ये पडला. दुसरीकडे अंड्याएवढे झालेले आंबे तडा जाऊन काळे पडून जमिनीवर पडले आणि शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.
कारण एकतर हा आंबा नोव्हेंबर-डिसेंबरच्या नियमित मोहरातील होता व मार्चमध्ये मोठा होऊन त्याचा हंगाम सुरू होणार होता. मात्र या प्रक्रियेला आता ब्रेक लागला आहे.
अशाही प्रतिकूल परिस्थितीत आंबा उत्पादकांनी हंगाम वाचविण्यासाठी पुन्हा मेहनत घेत कीडनाशकांचा मारा सुरू ठेवला. मात्र अपेक्षेप्रमाणे रिझल्ट मिळत नव्हता. कृषी विद्यापीठ व शासनाच्या कृषी विभागाने प्रमाणित केलेल्या सहा फवारण्या १० ते १२ पर्यंत पोहोचल्या.
एकीकडे कीडनाशके व मशागतीसाठी प्रचंड खर्च होत होता. मार्च महिन्यात जर आंबा विक्रीस गेला, तर शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे अधिक मिळतात.
मागील चार-पाच वर्षे सातत्याने आंबा उत्पादनात होणाऱ्या घटीला चालू वर्ष अपवाद ठरेल, असे वाटत असताना ती आशाही लवकरच मावळली.
साधारणतः आंब्याचा हंगाम १५ फेब्रुवारीनंतर दक्षिणेकडून सुरू होतो. प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्याचा म्हणजेच देवगड, वेंगुर्ला, मालवण, खारेपाटण, वैभववाडी येथील आंबा विक्रीयोग्य होऊन तो मंडईत येतो.
त्यानंतर १५ दिवसांनी रत्नागिरी जिल्ह्याचा हंगाम सुरू होतो. राजापूरपासून गणपतीपुळे ते पाली, देवरूख, चिपळूण परिसरांतील आंबा बाजार समित्यांत व अन्य ठिकाणी विक्रीस येतो. त्यानंतर १५ दिवसांनी रायगड जिल्ह्याचा हंगाम सुरू होतो.
मात्र या वेळी कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातून एकाच वेळी आंबे विक्री योग्य झाले व ते थेट मंडईत विक्रीसाठी आले देखील! परंतु मार्च महिना सुरू झाला व अवकाळीने १६ मार्चपर्यंत दोन-तीन वेळा कोकणाला झोडपून काढले.
दुर्दैवाने हा पाऊस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झोप उडवणारा ठरला. प्रत्येक वेळी अंड्याहून मोठे झालेले आंबे गळून पडले व आंबा उत्पादक हताश झाले. कारण एप्रिलपासून हे आंबे मार्केटमध्ये नियमित विक्रीस दाखल होणार होते.
अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने नुकसान वाढत होते. नुकसानाची दाहकता पाहता मागील पाच वर्षाप्रमाणेच हे वर्ष देखील आंबा उत्पादकासाठी निराशेचे वर्ष ठरत आहे.
यावर कळस म्हणजे आंब्याला ऑक्टोबर, नोव्हेंबर फार तर डिसेंबरमध्ये येणारी पालवी चार-पाच महिन्यांनंतर ती आज चुकीच्या हंगामात येत आहे.
अवेळी पालवी येण्यामुळे आज विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. पालवी ही आंब्यांचे शोषण करीत आहे. काहींचे म्हणणे, की अवकाळी पाऊस बरसल्यामुळे हे घडत आहे.
मात्र मागील वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात अतिवृष्टी झाली होती. परंतु पालवी फुटली नाही. यापूर्वी अशाप्रकारे झाडावर आंबे परिपूर्ण होत असताना पालवी आलेली कधीच आपण पाहिली नाही, असा उत्पादकांचा अनुभव आहे.
तापमान वाढीमुळे वातावरण बदलले आहे, ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब म्हणावी. पुढील वर्षीचा हंगाम सुरू होताना लगेचच त्याच झाडांना सहा-आठ महिन्यांनी पालवी फुटण्याची प्रक्रिया वेळेत सुरू होईल, याबाबत अनेकांना शंका वाटत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्याचा विचार करता कोकणाचे सध्याचे तापमान कमी आहे.
मात्र एप्रिल, मेमध्ये ते वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने देखील हा अंदाज व्यक्त केला आहे. अति उष्णता हापूसला चालत नाही. साहजिकच याचा हापूसच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.
एका बाजूला बाजार समित्या व अन्य मंडईत कोकणातून काही प्रमाणात आंबा विक्रीसाठी येत आहे. मात्र खरा हंगाम हा एप्रिल पासून सुरू होतो. शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा बाजार समित्यांतील दलाल-व्यापारीही उठवत आहेत.
सध्या अवकाळीमुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे तसेच या परिस्थितीत छोटे आंबे वाचविण्यासाठी शेतकरी फवारण्या घेतच आहेत.
याचा अर्थ हा आंबा मे महिन्यावर जाईल. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अनेक जातींचे गावठी आंबे मार्केटमध्ये येतील. प्रत्यक्षात हापूसचे उत्पादन अत्यल्प असून देखील अपेक्षित दर मिळणार नाही. ही चिंता हापूस उत्पादकांना भेडसावत आहे.
मार्गदर्शनाची गरज
एकाच वेळी झाडावर अंड्याहून मोठी फळे, त्याच झाडावर मोहर येणे व परत पालवी फुटणे, म्हणजे वातावरणात होणारा हा बदल आहे. याची दखल कृषी विद्यापीठांनी घ्यावयास हवी. शास्त्रज्ञांनी आपला मोर्चा वातावरण बदलाशी निगडित संशोधनाकडे वळवावा व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे.
दुसरीकडे रासायनिक खतांच्या व कीडनाशकांच्या अति वापरामुळे जमिनी नापीक बनू लागल्या आहेत. यामुळे सेंद्रिय व जैविक कीडनाशकांवर शेतकऱ्यांनी भर द्यायला हवा. यासाठी राज्य व केंद्र शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यादृष्टीने महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने जनजागृती सुरू केली आहे.
मागील वर्षापासून आंबा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या सेंद्रिय उत्पादनांचे नमुने वाटप करण्याचा संकल्प सोडला आहे. कृषी, फलोत्पादन परिषदा व मेळाव्यांमार्फत ते शेतकऱ्यांना वाटले जात आहेत. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास नक्कीच मदत होईल. लवकर आंबे येण्यासाठी कल्टार वापरले जात आहे.
आर्थिक आधारही हवा
या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने आंबा उत्पादकांना भरीव आर्थिक मदत करावी. २०१४-१५ मध्ये राज्यात दुष्काळ होता. त्या वेळी राज्य शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत दिली होती. आंबा उत्पादक तब्बल नऊ वर्षांनी शासनाकडे मदत मागत आहेत.
त्यामुळे आता हेक्टरी कमीत कमी दीड लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. राज्य शासनाने यावर गांभीर्याने विचार करून पावले उचलावी.
(लेखक महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.