Marathwada Water Issue : कशी भागेल मराठवाड्याची तहान?

Marathwada Water Crisis : ‘तहान’ हा मराठवाड्याचा यक्षप्रश्न असून तो सोडविण्यासाठी आतापर्यंत कोणत्याही सरकारने योग्य मार्गांचा अवलंब केला नाही अथवा तशी राजकीय इच्छाशक्ती देखील कोणी दाखवली नाही.
Marathwada Water Issue
Marathwada Water IssueAgrowon
Published on
Updated on

Marathwada Water Update : सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दुष्काळमुक्त मराठवाड्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी आग्रहाची भूमिका मराठवाडा पाणी परिषदेने मांडली आहे. ही मागणी करताना राजकीय पक्षांनी मराठवाडा पाणी प्रश्न गांभीर्याने घेतला नाही तर मराठा आरक्षण आंदोलनासारखे पाणी प्रश्नावर दुसरे मोठे आंदोलन उभे राहील, असा इशाराही दिला आहे.

‘तहान’ हा मराठवाड्याचा यक्षप्रश्न असून, तो सोडविण्यासाठी आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने योग्य मार्गांचा अवलंब केला नाही अथवा तशी राजकीय इच्छाशक्ती देखील कोणी दाखवली नाही. याबाबत घोषणा मात्र बऱ्याच झाल्या. मराठवाडा दुष्काळमुक्त करू, मराठवाडा जलयुक्त करू, अशा त्या घोषणा असून त्याकरिता नदीजोड, वॉटर ग्रीड, असे महाकाय प्रकल्पाची दिवास्वप्ने मराठवाड्यातील जनतेला दाखविण्यात येत आहेत. हे सर्व पाहून एक कथा आठवते.

Marathwada Water Issue
Marathwada Water Shortage : मराठवाड्यातील अनेक प्रकल्पांची तहान कायम

सिंह जंगलातून चालला असताना झुडपापाशी एक उंदीर चिंताग्रस्त होऊन बसला होता. सिंहाने विचारले, ‘‘काय झाले रे.’’ उंदीर म्हणाला, ‘‘मी इतका लहान आहे की जंगलातील प्राणी माझी दखल घेत नाहीत.’’ सिंह म्हणाला, ‘‘एक उपाय आहे, तू सिंह हो.’’ उंदराला आनंद झाला मग त्याने विचारले, ‘‘मी उंदराचा सिंह कसा होणार.’’ सिंह म्हणाला, ते मला माहीत नाही, मी फक्त उपाय सांगू शकतो.’’

अशाच प्रकारच्या उपायांच्या घोषणा मराठवाड्याच्या पाणी प्रश्नांवर राज्यकर्त्यांकडून आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. त्या घोषणा प्रत्यक्षात कशा उतरवायच्या, ते कोणालाही माहीत नाही. पाणीटंचाई दूर करायची म्हणजे विभाग अथवा राज्य जलमय करायचे, असाच विचार राज्यकर्त्यांकडून होतो. अशा घोषणा जनतेलाही आवडतात. वर्षानुवर्षे अशा घोषणा प्रत्यक्षात उतरल्या नाही तरी त्याचे राज्यकर्त्यांना काही वाटत नाही. जनतेचे मात्र हात होत राहतात.

Marathwada Water Issue
Water Management : सुदूर संवेदन माहितीसाठ्याचा प्रत्यक्ष उपयोग

प्रकल्प नदीजोड असो की वॉटर ग्रीड, त्याला विरोध करण्याचे कारण नाही. परंतु असे प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत की नाहीत, त्यासाठीचा खर्च किती येणार, खर्चाचे नियोजन कसे करायचे, प्रकल्प कसे पूर्ण होणार, अशा प्रश्नांकडे सोईस्कररीत्या कानाडोळा केला जातो. त्यामुळे असे प्रकल्प फसतात. मराठवाडा हा मुळातच कमी पर्जन्यमानाचा प्रदेश आहे.

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली हे जिल्हे सोडले तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत पाऊस खूपच कमी पडतो. या भागात बारमाही वाहतील अशा नद्या नाहीत. भूगर्भ पाणी पातळी खूप खोल आहे. धरणे तुटीच्या खोऱ्यात आहे. चांगला पाऊस झाला तरी धरणे अंशतः भरतात. कित्येक वेळा सर्व धरणांच्या पाण्याची बेरीज केली तरी ग्रीडपुरते पाणी देखील उपलब्ध होत नाही.

अशा परिस्थितीमध्ये नद्या जोडून अथवा ग्रीड करून काय साध्य होणार, याचा विचार झाला पाहिजे. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाचे नेमके स्वरूप काय आहे, स्थानिक पातळीवर तसेच त्या त्या नदीखोऱ्याच्या अंतर्गत पाणी प्रश्न सोडविण्याचे सुलभ व स्वस्त काही उपाय आहेत का, मराठवाड्यासाठी लांबून पाणी आणणे एवढाच एक पर्याय शिल्लक राहिला आहे का, या प्रश्नांचा थोडा खोलात जाऊन विचार केला तरी मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्याचे साधे, सोपे, प्रत्यक्षात उतरणारे उपाय सापडतील.

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा खरा मार्ग गावनिहाय मृद जलसंधारणाचे शास्त्रशुद्ध उपाय, पावसाच्या पाण्याचा गावापुरता जलसंचय, पीक पद्धतीत बदल, लहान मोठे सिंचन प्रकल्प शिवाय भूगर्भातील पाण्याचा कार्यक्षम वापर, समन्यायी पाणी वाटप अशा उपाययोजनांतून जातो. जलसमृद्ध गावांतून मराठवाडाच काय तर राज्य जलयुक्त होण्यास वेळ लागणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com