Weather News : गरमीचा मारा अन् पावसाचा शिडकावा

Rain Update : सूर्य आग ओकतोय, गरमीचा दाह सर्वांच्याच नाकीनऊ आणत आहे. सर्वांच्या नजरा आभाळाकडे जात आहेत. त्यातच अधूनमधून पावसाचे शिडकावे सुरूही आहेत.
Weather Forecast
Weather ForecastAgrowon

Weather Forecast : सध्या तापमानाचा कहर वाढलेला आहे. या उन्हाळ्यात ४९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. एरवी आपण सर्व जण ४० अंश सेल्सिअस तापमानाला घाबरून जायचो. आता तर ४९ अंश सेल्सिअस तापमान आपण अनुभवत आहोत. या तापमानाने पाण्याचा प्रश्‍न तीव्र तर झालाच, त्याचबरोबर गरमीचा कहर सध्या सुरू आहे. त्यामुळे वाढत्या तापमानात सर्वांनाच पावसाची ओढ लागलेली आहे.

अशातच मॉन्सूनचा सांगावा आला आहे. यंदा पाऊस धो-धो बरसणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. वाढत्या उष्णतामानाने पावसाचा एखादा शिडकावा आला तर बरे होईल, असे वाटत असताना राज्यात अधूनमधून पावसाचे शिडकावे मागील १५ दिवसांपासून सुरू आहेत. खरे तर पहिल्यासारखा नैसर्गिकपणे पडणारा पाऊस कधीही चांगला. पण आता नको त्या वेळी आणि खरीप पिकांची काढणी किंवा मळणी चालू असताना अचानक पाऊस येतो आणि शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते होते.

Weather Forecast
Monsoon 2024 : मॉन्सूनचा सांगावा

शेतकऱ्यांना मृग नक्षत्राच्या अगोदर रोहिणी नक्षत्रात उन्हाळा संपताना आणि पावसाळ्याच्या तोंडावर पडणारा पाऊस हवाहवासा वाटायचा. नांगरट केलेल्या शेतात ढेकळं विरघळण्यासाठी आणि बैलांना मशागत करण्यास हा पाऊस महत्त्वाचा होता. पण आता उन्हाळभरही कुठे ना कुठे पाऊस सुरूच आहे. ट्रॅक्टरने सर्व मशागतीची कामे सोपी झालेली आहेत.

त्यामुळे की काय, पाऊसही हा झालेला बदल लक्षात घेऊन पूर्वीसारखा पडेना. तुरळकच नांगरटीची आणि वखर पाळ्यांची कामे बैलाने होत आहेत. त्यातच शेतकऱ्यांना मृग नक्षत्राच्या पूर्वी पडणारा हंगामपूर्व पाऊस परका झालेला आहे. आता नको त्या वेळी पाऊस पडत असल्याने पुढे गरजेच्या वेळी पाऊस पडणार नाही, अशी चिंताही शेतकऱ्यांना सतावत आहे.

माणसांप्रमाणे सर्व सजीवांना या तापमानाचा फटका बसत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे जनावरांना हिरवा चारा मुबलक प्रमाणात मिळत नाही. पाणी पिण्याचे वांधे आहेत. प्राणिमात्रांना सुद्धा जीवदान देणारा पावसाचा शिडकावा हवाहवासा वाटणारा आहे. या वर्षी पावसाच्या संदर्भाने केलेली भाकिते तंतोतंत खरी ठरली तर उत्तमच आहे. कारण पाणी जेवढे पडेल तेवढे चांगलेच.

हे संजीवक सर्वांनाच पाहिजे. या वर्षी मॉन्सून नियोजित वेळेत केरळमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर आपल्याइकडे त्याचे आगमन होणार आहे. मृग नक्षत्राला जून महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे, तसा अंदाजही आहे. त्यामुळे मृगात पेरण्या होतील अशी आशा आहे. मृग नक्षत्रात झालेली अनेक पिकांची पेरणी पुढे काढणीलाही वेळेवर येते आणि उताराही चांगला देते.

Weather Forecast
Monsoon Update : अरबी समुद्रातून मॉन्सूनची वाटचाल सुरू

आता शेतकरी पेरणीपूर्वी जमिनीची मशागत आणि बियाणे व खते या तयारीला लागलेले आहेत. अनेकांची ही कामे उरकलेली आहेत. आता पावसाचा शिडकावा कधी येतो, याच आशेने सर्व जण आतुरलेले आहेत. वळवाचा पाऊस आणि त्यामुळे मातीचा सुटलेला गंध सर्वांनाच आवडतो. सुरुवातीलाच पावसाचा शिडकावा झाला तर नंतर महामूर पाऊस पडेल असे सर्वांनाच वाटते.

पाऊस पडण्याचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. झाडांची कमी झालेली संख्या, जागतिक पातळीवर वातावरणात झालेला परिणाम आता आपल्या इकडेही अनुभवास येत आहे. त्यामुळे तापमानाचे उच्चांक वाढत आहेत. हे निश्‍चितच काळजी वाढविणारे आणि झाडांची वाढ करा, याचे सूचक आहेत.

जर पावसाच्या शिडकाव्याची आपल्याला गरज वाटत असेल, तर पाऊस किती महत्त्वाचा आहे? याचा विचार सर्वांनी करण्याची गरज आहे. पडणारा पाऊस, उपलब्ध पाणी आणि त्याचे काळानुरूप आणि पिकांनुरूप नियोजन करून सर्वांनीच वापर करणे गरजेचे आहे. वाढत्या तापमानाला निसर्गापेक्षा मानवाचा बेजबाबदारपणा महत्त्वाचा ठरतोय. हा बेजबाबदारपणा टाळून झाडे लावण्याचे आणि संवर्धनाचे काम सातत्याने करणे काळाची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com