Hailstone : राज्यात गारपिटीचा मार

विभाग आणि जिल्हानिहाय नको, तर गाव तसेच ठरावीक वेळनिहाय वादळी पाऊस, गारपिटीचा अचूक अंदाज वर्तविण्यात यायला हवा.
Hail Rain
Hail RainAgrowon

Weather Update : सात, आठ मार्च दरम्यान राज्यात वादळी पाऊस, गारपिटीने रब्बी हंगामातील काढणीला आलेली हंगामी पिके भुईसपाट केली. द्राक्ष, डाळिंब, संत्रा, आंबा, केळी, काजू या फळपिकांसह भाजीपाला पिकांना मोठा तडाखा बसला.

त्या वेळी २० हजार हेक्टरहून अधिक पिकांना याचा फटका बसला. त्यानंतर नऊ मार्चदरम्यान वादळी पावसाचे वातावरण निवळेल, असे वाटत असताना राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले.

हवामान खात्याने १३ मार्चपासून वादळी पावसाचा अंदाज वर्तविला. पुढे गारपिटीचा इशाराही देण्यात आला. या अंदाजाप्रमाणे राज्यभर अनेक ठिकाणी दोन दिवसांपासून वादळी वारे, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे.

नांदेड, जालना, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांत काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे पुन्हा एकदा रब्बी पिके, फळे-भाजीपाला अशा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने नुकसानीत वाढच संभवते.

महाराष्ट्रात १ जून ते ३० सप्टेंबर या काळात मॉन्सूनचा ८० ते ८५ टक्के पाऊस पडतो. उर्वरित १५ ते २० टक्के पाऊस ऑक्टोबर ते मे या काळात पडत असतो. त्यामुळे सध्याचा वादळी पाऊस असामान्य, अनपेक्षित असे काही नसून तो वर्षानुवर्षे हवामान प्रक्रियेचाच एक भाग आहे.

Hail Rain
Crop Insurance : अवेळी पाऊस, गारपीट नुकसानीपासून विमा संरक्षण

विशेष म्हणजे यांस आपली भौगोलिक परिस्थितीच जबाबदार आहे. महाराष्ट्र भारतीय द्वीपकल्पाचा एक मोठा भाग आहे. या द्वीपकल्पाच्या पश्‍चिमेस अरबी समुद्र आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे. मॉन्सून प्रक्रियेत या दोन्ही समुद्रांचे मोठे महत्त्व आहे.

कधी कधी अन्य ऋतूंमध्येही अशी काही वातावरणीय परिस्थिती निर्माण होते, की या समुद्रावरचे वारे महाराष्ट्रावर बाष्प घेऊन येतात आणि ते उत्तरेकडून येणाऱ्या थंड-कोरड्या वाऱ्यांना भिडतात. त्यामुळे राज्यात पाऊस पडतो.

सध्या अशीच स्थिती निर्माण होऊन पाऊस पडत आहे. पूर्वी वादळी पावसाचे प्रमाण कमी होते. पारंपरिक पिकांमध्ये, त्यांच्या काही वाणांमध्ये ऑक्टोबर ते मे दरम्यानच्या वादळी पावसास प्रतिकार करण्याची क्षमता होती. त्यामुळे नुकसान कमी होत होते.

आता एकतर वादळी पावसांचे प्रमाण वाढले आहे. शेतीसाठी सर्वत्र सिंचनाच्या सोयी वाढल्याने फळे-भाजीपाल्यासह अनेक नगदी पिके पीक पद्धतीत आली आहेत. त्यामुळे वादळी पावसात शेतीचे नुकसान वाढले आहे.

गंभीर बाब म्हणजे २०१४ मध्ये राज्यात दीड महिना गारपीट सुरू होती. त्या वेळी गारपिटीच्या अभ्यासाच्या घोषणा खूप झाल्या. विशेष म्हणजे २०१४ पासून दरवर्षी फेब्रुवारी ते मे दरम्यान गारपीट होतेय. पूर्वी गारपीट ही दुर्मीळ होणारी घटना होती, आता ती नियमित झाली आहे.

Hail Rain
Pomegranate Crop Protection : डाळिंब बागांना मिळणार गारपीट संरक्षण जाळ्या

दरवर्षी होणारी ही गारपीट पिकांसह इतरही मालमत्तेचे नुकसान वाढवतच आहे. परंतु गारपिटीचा अभ्यास काही पुढे सरकला नाही. आताचा पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असला, तरी पुन्हा एकदा त्यात नेमकेपणाचा अभाव होता.

विभाग आणि जिल्हानिहाय नको तर गाव तसेच ठरावीक वेळनिहाय वादळी पाऊस, गारपिटीचा अचूक अंदाज वर्तविण्यात यायला हवा. हा अंदाज तत्काळ संबंधित गावातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवा. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हे काही अवघड नाही.

परंतु तसे होताना दिसत नाही. प्रगत देशात अशाप्रकारची अचूक अंदाजाची यंत्रणा आहे. एवढेच नव्हे तर मोठ्या गारांचे रूपांतर लहान गारांत तसेच लहान गारांचे रूपांतर पावसात करून शेतीसह इतरही मालमत्तेचे होणारे नुकसान कमी केले जाते.

अशी यंत्रणा निर्माण करण्यावर भारतीय हवामान विभागाने काम केले पाहिजेत. असे होत नाही, तोपर्यंत गारपिटीचा मार शेतकऱ्यांना खावा लागेल, हे हवामान विभागाने लक्षात घेतले पाहिजे.

दुसरे म्हणजे वादळी वारे, गारपिटीत झालेल्या नुकसानीचे पाहणी, पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करायला पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com