Grass Cultivation : गावनिहाय गवत लागवडीवर विचार व्हावा

Gavat Cultivation : डोंगरावर जास्तीत जास्त गवत लावणे, त्याचे संगोपन करणे हाच माती आणि पाणी वाचविण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.
Grass Cultivation
Grass Cultivation Agrowon
Published on
Updated on

Monsoon Update : या वर्षीच्या मॉन्सूनचा पाऊस देशात सर्वसाधारण पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात मात्र कमी पावसाचे संकेत आहेत. कमी पाऊस म्हणजे अवर्षण! यंदाच्या पाऊसमान अंदाजात दुष्काळाची शक्यताही २० टक्क्यांपर्यंत वर्तविण्यात आली आहे.

संभाव्य दुष्काळावर मात करण्यासाठी मृद्-जलसंधारणाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे असे उपाय सांगितले जातात. मृद्-जलसंधारणासाठी वैयक्तिक पातळीवर शेताची बांध-बंदिस्तीपासून ते सामुहिक स्तरावरील जलस्रोतांच्या दुरुस्तीपासून पाण्याची गळती कमी करण्यापर्यंतचे उपाय आहेत.

यामध्ये गवत लागवड, संवर्धनातून जलनियोजन हा भाग मात्र सर्वत्र दुर्लक्षित राहतो. यावरच बोट ठेवण्याचे काम जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले आहे. यापुढील काळात दुष्काळाला दूर ठेवायचे असेल, तर सर्वांनी डोंगर उतारावर गवत लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अलीकडच्या काळात आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून जंगले नष्ट करण्यात येत आहेत. पूर्वी गावापरत गायरान जमिनी होत्या. गवताळ कुरणे राखली जायची. आता गायरान जमिनी, गवत कुरणांवरही शेतीने अतिक्रमण केले आहे.

त्यामुळे पावसाच्या पाण्याने मातीची धूप मोठ्या प्रमाणात होते. पडलेले पाणी सरळ वाहून जात आहे. अशावेळी डोंगरावर जास्तीत जास्त गवत लावणे, त्याचे संगोपन करणे हाच माती आणि पाणी वाचविण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.

नैसर्गिकरीत्या वाढलेले गवत काढून टाकले, तर मातीची खूप मोठ्या प्रमाणात धूप होते, त्याचा विपरीत परिणाम जलसंवर्धनावरही होतो, असे जगातील सर्वच माती-पाणी तज्ज्ञ सांगतात. अर्थात, याबाबत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पेरू यांसारखी राष्ट्रे जागृत झाली.

Grass Cultivation
Forest Fire : गवत वणवे अन् भूजलचा काय संबंध?

या देशांनी जमिनीच्या धूप झालेल्या भागात शेती करण्याचे थांबवून त्याचे रूपांतर कुरणांत केले. वने-जंगलामुळे पाऊस पडतो, असे म्हटले जात असले, तरी गवताळ वनांचे मुख्य काम पावसाचे पाणी टिकवून ठेवणे हे आहे. गवताळ कुरणे, वने पाऊस मुरवतात.

गवताच्या नैसर्गिक आच्छादनामुळे मातीचेही संरक्षण होते. आपल्याकडे मुसळधार पावसाचे प्रमाण वाढत आहे. मुसळधार पाऊस जमिनीचा पृष्ठभाग खरवडून टाकण्याचे काम करतो. अशावेळी गवताळ वने-जंगले माती-पाणी संवर्धनाचे मोठे काम करतात.

गवताळ कुरणांमुळे चाऱ्याचे प्रमाणही वाढते. त्याचा थेट लाभ शेळी-मेंढी, गाई-म्हशी पालनासाठी होऊ शकतो. अलीकडे ओल्या-सुक्या चाऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राज्याचा पशुपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. हा व्यवसाय वाचविण्याचे काम पण गवताळ कुरणांद्वारे होऊ शकते.

गवताळ कुरणांमध्ये स्थानिकांनी गुरे चारली, तर गवताचे प्रमाण आटोक्यात राहील, वणव्याला आळा बसेल. परंतु यात अतिचराई होणार नाही, ही काळजी मात्र घ्यावी लागेल. गवत लागवडीचे हे सर्व फायदे पाहता, यंदाच्या खरीप नियोजनात गावनिहाय गवत लागवडीवरही विचार व्हायला हवा.

कुठे, कोणते गवत कसे लावायचे, त्याचे संगोपन कसे करायचे याबाबत कृषी विभागाने मातीचा अभ्यास करून मार्गदर्शन करायला हवे.

Grass Cultivation
Agriculture Technology : गवत नियंत्रण करणार मशिन कसं काम करतं ? शेतकऱ्यांना होणार फायदा ?

शिवाय वनविभागाने वन-डोंगरे, तर ग्रामपंचायतीने गायरान, गावातील पडीक जमिनी गवत लागवडीसाठी खुल्या करून द्यायला हव्यात. असे झाल्यास गावपरिसरात गवत लागवड वाढेल. शेतातील गवत अथवा तण ही बहुतांश शेतकऱ्यांची डोकेदुखी झाली आहे. अशावेळी तण नियंत्रणापेक्षा व्यवस्थापन तंत्राचा अवलंब शेतकऱ्यांनी करायला हवा.

शून्य मशागत तंत्रात गवताला जागेवरच कुजवले जाते. याद्वारे सुद्धा जमिनीची धूप कमी होते, शेतात मृद्-जलसंधारण होते, मातीचा पोत वाढण्यास हातभार लागतो. अर्थात गवत लागवडीचा विचार शेतीत क्रांती घडवून आणणारा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com