Political Debate: काटकसर करण्यासाठी खर्च करून दिखाऊगिरी करण्याची स्टंटबाजी सध्या जोरात सुरू आहे. सगळे काही करायचे ते वाजत गाजत करायचे असा चंग बहुधा सरकारने बांधला आहे. हे म्हणजे ‘जखम मांडीला अन् मलम शेंडीला’ असा प्रकार म्हणावा लागेल. .पश्चिम बंगालसह इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेतून देशापुढील आर्थिक संकटाची जाहीर वाच्यता केली. मध्य पूर्वेतील अमेरिका-ईस्राइल आणि इराण युद्धामुळे झालेल्या गंभीर, परिणामांची त्यांनी कल्पना देत नागरिकांनी स्वतःवर काही बंधने घालून घेण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केल्यानंतर देशभरामध्ये स्टंटबाजीला ऊत आला आहे. एका बाजूला काटकसरीसाठी आपण किती प्रयत्नशील आहोत, हे दाखविण्यासाठी काही जण प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे सरकारमधील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी व्यक्तींना अंगवळणी पडलेल्या सवयी सोडणे इतके सोपे नाही. .Indian Economic Crisis: भारतीय अर्थव्यवस्था संकटांच्या भोवऱ्यात.राजकारणाने इतका वेग पकडला आहे, की त्या वेगाबरोबर राहण्यासाठी तेवढ्याच वेगाची वाहन वापरावी लागत आहेत. सरकार म्हटले, की सर्व लवाजमा सोबत असतो. अधिकाधिक लवाजमा सोबत असणे हे बलदंड राजकारण्याचे लक्षण मानले जात आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे देशांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि तो झाला होता, तरीही त्याबाबत प्रशासकीय पातळीवरती कुणीही वाच्यता आतापर्यंत केली नव्हती. ज्या वेळी इंधनाचा तुटवडा जाणवत आहे अशी ओरड विरोधी पक्ष करत होते, त्या वेळी सत्ताधारी पक्ष त्यांची खिल्ली उडवत होते. आता खुद्द पंतप्रधान मोदी यांनी याबाबत वाच्यता केल्याने आपण बचतीमध्ये कसे आघाडीवर आहोत, हे दाखविण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने बचतीसाठी काढलेले परिपत्रक बारकाईने वाचल्यानंतर महाराष्ट्र कोणत्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे हे समजते..सरकारी अनास्थाएका बाजूला आधुनिकीकरणाचा ध्यास घेतलेल्या आपल्या देशाने पुन्हा एकदा मागे वळून पाहण्यास सुरुवात केली आहे. कोरोना काळामध्ये नाइलाजाने अनेकांना घरी बसावे लागले होते. लहान, मोठे उद्योग मोडून पडले होते. छोट्या उद्योजकांचे जे काही हाल झाले ते शब्दातीत होते. आता पंतप्रधान मोदी यांनी एका जाहीर सभेमध्ये देशापुढील संकट काय आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केल्याने त्याचे गांभीर्य फारसे जाणवत नाही. मात्र ते किती गंभीर आहेत, याचे दृश्य परिणाम आता दिसू लागतील. गॅस तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय बंद झाला आहे..दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे उद्योगांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये मोठा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. शेतीचे यांत्रिकीकरण झाल्यामुळे डिझेलची मागणीही मोठी आहे. यंदा खरिपाच्या तोंडावर केंद्र आणि राज्य सरकार मधील मंत्री शेतकऱ्यांना काटकसरीचे आवाहन करत रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते वापरावीत, असे सांगत आहेत. मात्र डिझेलच्या पुरवठ्याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. मागील खरीप हंगामामध्ये पावसाने हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठी पडझड झाली होती. राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये १० ते १२ टक्क्यांपर्यंत वाटा उचलणाऱ्या कृषी क्षेत्राची चार टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. कोरोना काळामध्ये ज्या कृषी क्षेत्राने राज्याला तारले होते, त्या क्षेत्राची पडझड होणे ही मोठी चिंताजनक बाब आहे. ही पडझड सरकारी अनास्थेची आहे..शक्तिपीठ महामार्गासाठीचा खर्च ८६ हजार कोटींवरून एक लाख पाच हजार कोटींवर गेल्याची चर्चा आहे. मात्र त्याबाबत अधिकृत कोणीही सांगण्यास तयार नाही. राज्यातील देवस्थानांना जोडणारा हा रस्ता आता आमदारांच्या सोईसाठी अनेक ठिकाणावरून वळविण्याचा घाट घातला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका वगळून सांगलीतून हा रस्ता पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि तिथून पुन्हा चंदगड तालुक्यात नेण्यात येणार आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातून हा रस्ता जाणार आहे. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या आग्रहासाठी हा रस्ता वाईवरून साताऱ्याला नेला जात आहे. .Agriculture Crisis: उत्तर महाराष्ट्रातील शेती संकटात.एका बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकार खर्च करत असताना काही स्टंटबाजी करून काटकसर करण्याचे सल्ले सामान्य नागरिकांना देत आहे. दुसरीकडे मंत्री विमानाने राज्यांतर्गत प्रवास करत आहेत. ज्याप्रमाणे गीग कामगार डिलिव्हरी देण्यासाठी धावत असतात त्याप्रमाणे राजकारणी सध्या धावत आहेत. त्यांनी आपली वर्गवारी गीग कामगारांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये केली आहे. कार्यकर्त्यांची मने राखायची, राजकीय अस्थिरता आणि आपण सर्वच ठिकाणी पोहोचले पाहिजे, अशी स्पर्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. राजकारणामध्ये पाडलेले पायंडे आणीबाणीच्या स्थितीमध्ये कसे मोडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ स्टंटबाजी करून या परिस्थितीला सामोरे जाता येणार नाही. यासाठी सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे..प्रवाशांची लूट, परिवहन विभाग चिडिचूपराज्यात सध्या सुट्ट्यांचा काळ सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत आहे. यासाठी एस. टी. महामंडळ विशेष नियोजन करत असते. मात्र सध्या राज्यभरातील एसटीचे अधिकारी केवळ हप्तेखोरी करण्यात मग्न आहेत की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पत्रकार, विधिमंडळ सदस्य आणि खेळाडू अशा प्रकारांमधील प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. यासाठी आधार कार्ड किंवा एसटी महामंडळाने दिलेले ओळखपत्र ग्राह्य मानले जात होते..मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक इतके वेगात परिवहन विभागाचे परिवर्तन करत आहेत की त्यांना एका खासगी कंपनीचा आधार घेऊन या प्रवाशांना डिजिटल कार्ड देण्याची कल्पना सुचली. यासाठी सध्या राज्यभरामध्ये मोहीम सुरू असून १९९ रुपये दिल्यानंतर कार्ड दिले जाते. हे कार्ड असेल तरच सवलत दिली जाईल, असा फतवाही काढला आहे. त्यामुळे खेडोपाड्यातील लोक उन्हातान्हात रांगा लावून ही कार्ड काढत आहेत. ‘प्रवाशांच्या सोईसाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाने सध्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे केले असून त्यांच्याकडून संबंधित कंपनी १९९ ऐवजी अडीचशे रुपये वसूल करत आहे..दुसरीकडे राज्यामध्ये खासगी बस वाहतूकदारांनी आपले जाळे विणले आहे. हे जाळे विणण्यासाठी एसटी महामंडळाचे अधिकारी जीव तोड मेहनत करत आहेत. एका बाजूला एसटीची मागणी असताना सुद्धा ती सुरू केली जात नाही. यासाठी प्रवासी नसल्याचे कारण दिले जाते. त्याचवेळी त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खाजगी बस वाहतूक सुरू आहे. याकडे लक्ष्य देण्यास जसा परिवहन मंत्र्यांना वेळ नाही त्याप्रमाणेच स्थानिक लोकप्रतिनिधींनाही नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये प्रवाशांची लूटमार होत आहे..परिवहन विभाग केवळ डिजिटल कार्ड, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आणि ॲप आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर निर्बंध आणण्यात मग्न आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याचे आवाहन करत आहे. मात्र राज्याच्या गावगाड्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे, हे त्यांच्या गावीही नाही.९२८४१६९६३४(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.