Financial Stability in Agriculture : केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने मध्य भारतातील कोरडवाहू शेतीसाठी एक हेक्टरचे एकात्मिक शेतीचे मॉडेल विकसित केले आहे. त्यांच्या या मॉडेलला ‘आयसीएआर’ने देखील मान्यता दिली आहे. एक हेक्टरची तीन भागांत विभागणी करून एका हेक्टरमध्ये कापूस + तूर आंतरपीक, दुसऱ्या एका एकरमध्ये खरिपात सोयाबीन तर रब्बी हंगामात हरभरा + मोहरीचे आंतरपीक, तर उर्वरित अर्ध्या एकरात शेततळे, चारा पिके, शेळीपालन, परसातील कुक्कुटपालन काही क्षेत्रात फळपिके त्यात भाजीपाला आंतरपिके असे हे एकात्मिक शेतीचे मॉडेल असून, प्रत्येक घटकांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळेबंदसुद्धा दिला आहे.
खरे तर अशा प्रकारच्या एकात्मिक शेतीचे विभागनिहाय मॉडेल्स राज्यातील कृषी विद्यापीठांनी देखील विकसित केले आहेत. परंतु ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष अवलंब शेतकऱ्यांकडून होताना दिसत नाही. काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्या अनुभव आणि कौशल्यातून गरजेनुसार एकात्मिक शेतीचे मॉडेल्स विकसित केले असून, त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध देखील झाल्या आहेत.
शेतीतील आजच्या समस्यांवर नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल, की कुटुंबातील शेती लहान लहान तुकड्यांत विभागली जात आहे. अशा शेतीत नव तंत्रज्ञान, यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यास अनंत अडचणी येतात. गुंतवणुकीअभावी शेतीत मूलभूत सुविधा निर्माण करता न आल्याने हंगामनिहाय एक-दोन पारंपरिक पिके शेतकऱ्यांना घ्यावी लागतात. वाढत्या नैसर्गिक आपत्तीने शेतीतील जोखीमही वाढली आहे.
निविष्ठांबाबत शेती पूर्णपणे परावलंबी झाली आहे. पर्यायी रोजगाराची साधने नसल्याने कुटुंबातील व्यक्तींचा शेतीवरील भार वाढत चालला आहे. अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये शेतीचा खर्च अधिक आणि उत्पन्न कमी होऊन शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढतोय. मराठवाडा, विदर्भासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे होत आहेत, हे आता काही लपून राहिलेले नाही. शेतकरी आत्महत्यांचे हे दुष्टचक्र भेदायचे असेल तर वैविध्यपूर्ण पीक पद्धतीचा अवलंब आणि त्यास एखाद-दुसऱ्या पूरक व्यवसायाची जोड अशा एकात्मिक शेतीचा अंगीकार शेतकऱ्यांनी करायलाच हवा.
शेतीतील सध्याच्या अनेक समस्यांचे समाधान करीत शेतकऱ्यांचे थेट उत्पन्न वाढविणारे एकात्मिक शेतीचे मॉडेल्स शेतकऱ्यांपर्यंत न्यावे लागतील. पाणलोट आधारीत एकात्मिक शेतीने कोरडवाहू शेती शाश्वत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येक गावात किमान एका शेतकऱ्याच्या शेतावर एकात्मिक शेतीचे आदर्शवत मॉडेल उभे करून त्या गावातील इतर शेतकऱ्यांना त्याचे फायदे पटवून द्यावे लागतील. विशेष म्हणजे शेतकरीनिहाय त्यात काही बदल गरजेचे असतील तर ते त्यांना सांगावे लागेल.
शेळी-मेंढी-वराह-कोंबडी-मधुमक्षिका-मासेपालन, दुग्धोत्पादन, रेशीम शेती हे पूरक व्यवसाय फायदेशीर आहेत, हे शेतकऱ्यांना पण माहीत आहे. परंतु त्यातील एखादा व्यवसाय सुरू करून शास्त्रीय पद्धतीने करायचा म्हटलं तर शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येतात. त्या दूर करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. परिणामी, शेतकरी अशा व्यवसायापासून वंचित राहतो, अशी अनेक उदाहरणे गावोगाव पाहावयास मिळतील. शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यायची म्हटले तर दुसरी महत्त्वाची अडचण भांडवलाची असते. अनेक पूरक व्यवसाय अत्यंत कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात. परंतु मुळातच आर्थिक संकटात असलेले बहुतांश शेतकरी तेवढीही गुंतवणूक करू शकत नाहीत.
अशावेळी एकात्मिक शेतीच्या विविध मॉडेल्सनुसार अर्थसाह्याचे शासनाचे धोरण हवे. हा अर्थपुरवठा इच्छुक शेतकऱ्यांना तत्काळ व्हायला हवा. असे झाले तरच एकात्मिक शेतीचा राज्यात झपाट्याने विस्तार होईल. एकात्मिक शेतीतील विविध पिकांच्या, पीक पद्धतीच्या अवलंबनाने नैसर्गिक आपत्तीतील जोखीम कमी होते. पूरक व्यवसायांतून नियमित आर्थिक मिळकत होत राहते. अर्थात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी त्यांनी एकात्मिक शेतीचा अवलंब अवश्य करायला हवा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.