Fodder Management : दुष्काळाचा फेरा आधी चारा पेरा

Fodder Production : चारा निर्मितीसाठी तीन ते चार महिने लागतात. त्यामुळे दुष्काळ पडल्यावर नाही तर दुष्काळाची चाहूल लागताच चारा नियोजन करायला हवे.
Fodder Management
Fodder ManagementAgrowon
Published on
Updated on

Fodder Crop : पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले आहेत. आता फक्त शेवटचा एक महिना उरला आहे. मागील तीन महिन्यांत राज्याच्या बहुतांश भागात पुरेसा पाऊस पडला नाही. आता उर्वरित एका महिन्यातही चांगल्या पावसाची शक्यता कमीच आहे. परतीचा पाऊस अनेक वेळा हुलकावणी देतो. पडला तरी तो सर्वदूर नसतो. त्यामुळे खरीप पिकांना पाण्याचा ताण वाढला आहे आणि पुढेही तीव्र चारा-पाणीटंचाईची सुस्पष्ट चिन्हे दिसत आहेत. मागील वर्षी पावसाळी हंगामात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडला होता. पावसाळ्यानंतरही अधूनमधून वर्षभर पाऊस पडत राहिला. असे असताना मागच्या उन्हाळ्यात ओल्या आणि सुक्या चाऱ्याची टंचाई जाणवत होती. कडब्याचे दरही वाढले होते.

या सर्व पार्श्वभुमीवर यंदाच्या उन्हाळ्यात चारा-पाणीटंचाईची परिस्थिती किती भिषण असेल याचा अंदाज आपल्याला यायला हवा. भविष्यातील चारा-पाणीटंचाई लक्षात घेऊन चारा डेपो सुरू करण्याबाबत तसेच फळबागा जगविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी राज्य शासनाकडे केली आहे. राज्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरू करण्यावर मर्यादा येणार आहेत. म्हणूनच चारा डेपोचा त्यांनी मांडलेला विचार रास्त वाटतो.

Fodder Management
Fodder Crop Management : एकदल हंगामी चारा पीकाच नियोजन कसं करावं?

भीषण दुष्काळात मनुष्यप्राण्यासाठी पाणी-धान्य कुठूनही आणून त्यांना जगविता येते. परंतु पशुधनासाठी चारा-पाणी वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही. अशावेळी पशुपालक दावणी मोकळ्या करून जनावरांना सोडून देतात, हे विसरून चालणार नाही. चारा निर्मितीसाठी तीन ते चार महिने लागतात. त्यामुळे दुष्काळ पडल्यावर नाही तर दुष्काळाची चाहूल लागताच चारा नियोजन करायला हवे. मागील काही वर्षांपासून चारा छावण्यांतील वाढते गैरप्रकार आणि त्यात होत असलेले जनावरांचे हाल पाहता चारा डेपोची मागणी वाढत आहे. टंचाईग्रस्त भागात चारा डेपो उभे करून त्याद्वारे ओला आणि सुका चारा पशुपालकांना अनुदानावर उपलब्ध करून देता येतो. त्यामुळे चारा डेपोसाठी देखील ओला, सुका चारा लागणारच आहे. खरे तर वर्षभर चारा नियोजन हे कृषी तसेच पशुसंवर्धन विभागांचे काम आहे. परंतु या दोन्ही विभागांत चारा नियोजनाचा कायम दुष्काळ आढळून येतो.

Fodder Management
Fodder Management : निकृष्ट चारा पौष्टिक कसा बनवाल?

यावर्षी कमी पाऊसमानाने खरीप पिकांचे उत्पादन घटेल, चाराही फारसा उपलब्ध होणार नाही. ह्या बाबी लक्षात घेऊन लेट खरीप आणि आगामी रब्बी हंगामात जिथे शक्य आहे तिथे चारा पिकांची पेरणी राज्यात व्हायला हवी. खासकरून सिंचनासाठी पाणी उपलब्ध असलेल्या भागातील शेतकरी चारापिके लागवडीचे नियोजन करू शकतात. शेतकऱ्यांकडे पशुधन नसले तरी त्यांनी चारा पिकांची विक्रीसाठी नगदी पिके म्हणून लागवड करावी. कारण टंचाई काळात ओल्या-सुक्या चाऱ्याला दर चांगले मिळतात, हा आजवरचा अनुभव आहे. कृषी, पशुसंवर्धन विभागाने तसे आवाहन शेतकऱ्यांना करायला हवे. हिरवा चारा विशिष्ट पद्धतीने मुरवून त्यापासून मुरघास करता येतो. असा मुरघास हिरवा चारा उपलब्ध नसताना जनावरांना देता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुरघास करण्यावर देखील भर द्यायला हवा. चाराटंचाईच्या काळात गव्हाचे काड किंवा भाताचे तूस अशा निकृष्ट चाऱ्यावर युरिया, मीठ व गूळ यांची प्रक्रिया करून तो अधिक रुचकर व पौष्टिक करता येतो. पशुखाद्याचे दर वाढत असताना घरच्या पशुधनासाठी अथवा विक्री करण्यासाठी धान्य, डाळी, पेंड, गूळ, क्षार मिश्रण, मीठ यांचा वापर करून कमी खर्चात घरगुती पद्धतीने पशुखाद्य तयार करता येते. या पद्धती पशुपालकांनी आता आत्मसात करण्याची गरज आहे. असे केल्यास आधीच वाढता उत्पादन खर्च आणि दुधाला मिळणाऱ्या कमी दरामुळे मेटाकुटीस आलेल्या पशुपालकांना टंचाईत अल्प का होईना पण दिलासा मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com