M S Swaminathan
M S SwaminathanAgrowon

Dr. Swaminathan : ‘सदाहरित क्रांती’ चा जनक

Green Revolution : भारतीय शेती आज आधुनिक, पुरोगामी असली तरी ती अधिक क्लिष्टदेखील झाली आहे. शेतकऱ्यांना केवळ सल्ल्याची गरज नाही, तर त्‍यांना आधार हवा आहे. दिवंगत डॉ. स्वामिनाथन यांनी घातलेला पाया, आम्हाला भारतीय शेती शाश्‍वत ठेवण्यासाठी पुरेसा आहे.
Published on

डॉ. सी. डी. मायी

Agriculture Scientist : भारतीय शेती आज आधुनिक, पुरोगामी असली तरी ती अधिक क्लिष्टदेखील झाली आहे. शेतकऱ्यांना केवळ सल्ल्याची गरज नाही, तर त्‍यांना आधार हवा आहे. दिवंगत डॉ. स्वामिनाथन यांनी घातलेला पाया, आम्हाला भारतीय शेती शाश्‍वत ठेवण्यासाठी पुरेसा आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे भारतातील हरितक्रांतीचे जनक व थोर कृषी शास्‍त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांची पुण्यतिथी म्हणून २८ सप्टेंबर २०२३ हा दिवस यापुढे कायम स्मरणात राहील. जगभरातील कृषी विद्यार्थ्‍यांबरोबर संशोधन करून नैसर्गिक साधनसंपत्‍तीचे जतन करण्‍याचा विडा उचललेला देशाचा हा लाडका भूमिपुत्र वयाच्‍या ९८ व्या वर्षी याच भूमीत विलीन झाला.

साठच्या दशकात अन्नधान्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहणाऱ्या भारताला हरितक्रांतीच्‍या माध्‍यमातून आत्मनिर्भरता या महान पुत्राने मिळवून दिली. याच काळात भारताने उपासमारीमुळे प्रभावित जनतेच्‍या उदरभरणासाठी अमेरिकेतून अन्नधान्य आयात केले होते. तो काळ आणि आताचा काळ यात आज जमीन-अस्मानाचे अंतर आहे. आज भारताच्‍या इतिहासातील सर्वाधिक उज्‍ज्‍वल असा काळ आहे. आजमितीस गव्हाचे उत्पादन ११० मिलियन मेट्रिक टनाच्‍या कमाल मर्यादेला स्पर्श करू लागले आहे, हे अमेरिकेतील उत्‍पादनाच्‍या दुपटीहून अधिक आहे.

डॉ. स्वामिनाथन हे जेनेटिक्स अँड प्‍लांट ब्रीडिंग विभागाचे प्रमुख असताना डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनी १९६३ मध्ये नवी दिल्लीतील पुसा इन्स्टिट्यूट येथे पहिल्यांदा भेट दिली. डॉ. बोरलॉग यांनी मेक्सिकोमधील आंतरराष्ट्रीय संस्थेत पहिल्‍यांदाच अर्धदुष्‍काळी गव्हाचे वाण विकसित केले होते. नॉरिन-१० पासून प्राप्त झालेल्या आरएचटी-बी१बी आणि आरएचटी-डी१बी जनुकांचा वापर त्‍यांनी केला होता, हे कदाचित लोकांना माहिती नसेल.

हे वाण जपानमधील अर्धदुष्‍काळी गव्हाच्या प्रकारात मोडणारे होते आणि ते १९३५ मध्ये ते प्रसारित करण्यात आले होते. डॉ. बोरलॉग यांनी अमेरिकेतील ब्रेव्‍हर गव्हाच्या वाणाशी नॉरिन-१० चा संकर करून नवीन वाण तयार केले. त्‍यातून नंतर भरघोस उत्पन्न देणाऱ्या, खाली न वाकणाऱ्या पोषक आणि रोगप्रतिरोधक सोनोरा ६३, सोनोरा ६४, मायो ६४ आणि लर्मा रोजो सारख्या वाणांची मालिका विकसित केली.

M S Swaminathan
Dr. M. S. Swaminathan : कृषक समाज पदाधिकाऱ्यांनी घेतली डॉ. स्वामिनाथन यांची भेट

डॉ. बोरलॉग यांची भारत भेट आयोजित करणे, मेक्सिकन अर्धदुष्‍काळी गव्‍हाची क्षमता जोखणे, भारतीय शेतकऱ्यांच्या शेतावर चाचणी करणे आणि पुसा इन्स्टिट्यूटसह पंजाब, हरियाना, पंतनगर विद्यापीठांमधील वैज्ञानिकांच्‍या माध्‍यमातून गहू उत्‍पादकांच्‍या स्‍थानानुसार विशिष्ट प्रकारच्‍या गव्‍हाच्‍या जाती विकसित करण्यास प्रवृत्त करणे, यात डॉ. स्वामिनाथन यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्‍यांनी ‘बोरलॉग वाण’ शेतकऱ्यांपर्यंत नेले.

त्यांनी राष्ट्रीयस्‍तरावर प्रात्यक्षिकांचे आयोजन करून थेट शेतकऱ्यांच्या शेतांमध्‍ये जाऊन नवीन वाणांच्‍या उत्पन्नाची क्षमता किती आहे, हे सिद्ध करून दाखवले. तोपर्यंत ही संकल्‍पना अस्तित्‍वातच नव्‍हती.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याचे श्रेय डॉ. स्वामिनाथन यांना जाते. तंत्रज्ञान निर्मिती आणि शेतकऱ्यांच्‍या शेतात त्‍यांची अंमलबजावणी, यामधली दरी, ज्‍याला ‘लॅब टू लँड’ असेही संबोधले जाते, या संकल्‍पनेची डॉ. स्वामिनाथन यांनी जगभरातील कृषी शास्त्रज्ञांना ओळख करून दिली. त्यांना हे ठाऊक होते, की संशोधनाच्‍या मर्यादा या शोधनिबंध प्रकाशनाच्याही कितीतरी पलीकडे आहेत, संशोधन-तंत्रज्ञान-स्‍वीकार यांचे कृषी विज्ञानात अनन्‍यसाधारण महत्त्व आहे.

M S Swaminathan
M. S. Swaminathan : स्वामिनाथन यांचे काम म्हणजे क्रांतिकार्यच...

डॉ. स्वामिनाथन यांनी दोन मेक्सिकन जातींचे १८ हजार २५० टन गहू बियाणे आयात करून थेट शेतकऱ्यांच्या शेतात या वाणांचा प्रयोग करण्याचे ठरवले, तेव्हा त्यांना विरोध झाला नाही, असे नाही. तथापि, डॉ. स्वामिनाथन यांची नियोजकांना, राजकारणी लोकांना त्‍याचे महत्‍त्‍व पटवून देण्याची क्षमता, ही अपवादात्मक आणि कौतुकास्पद होती. त्‍यामुळेच ते देशाच्या पहिल्या हरितक्रांतीला चालना देण्यासाठी आलेल्‍या प्रत्‍येक अडथळ्यावर ते यशस्वीरीत्या मात करू शकले.

पुसा इन्स्टिट्यूटमध्ये एक उत्‍कृष्‍ट अध्‍यापक म्‍हणून कार्यरत असताना डॉ. स्वामिनाथन यांच्‍यामध्‍ये ही क्षमता विकसित झाली होती. आमच्यासारखे अनेक विद्यार्थी, जेनेटिक्‍सच्‍या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करू शकले नव्‍हते, ते बाहेर खिडकीत उभे राहून त्यांचे शिकवणे ऐकत असू. जेनेटिक लॉ, जेनेटिक कोड, डीएनए रिप्लिकेशन आणि विज्ञानाच्या बऱ्याच बारीकसारीक गोष्टी समजावून सांगण्‍याची त्‍यांची पद्धत अतुलनीय होती.

डॉ. स्वामिनाथन यांनी हरितक्रांतीला चालना दिली असली, तरी त्यांनी शेतीचा विकास साधायचा असेल तर पाणी, पोषकतत्त्व, रसायने यांचा सावधगिरीने वापर केला पाहिजे, यावर अधिक भर दिला होता. त्यांचे म्‍हणणे होते, आपण जर त्यांचा अनिर्बंध वापर केला तर निसर्ग आपल्याला कधीच माफ करणार नाही आणि म्हणूनच त्यांनी नेहमीच ‘सदाहरित क्रांती’वर भर दिला. त्यांचा सल्ला न ऐकल्‍यामुळे झालेल्‍या दुष्परिणामांचे आपण साक्षीदार आहोत. आज मातीचा पोत खराब झालेला आहे, पाण्‍याचे दुर्भिक्ष जाणवते आहे, जल आणि पर्यावरण प्रदूषण दरवाजा ठोठावत आहे आणि सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे हवामानातील बदल वास्‍तवात उतरत आहे. म्हणूनच, प्रगतीच्या रथावर स्‍वार होताना आपण निसर्गाशी आणि एकमेकांशी सुसंवादाने राहण्‍याचा त्‍यांनी दिलेला सल्‍ला आज सुसंगत वाटतो.

२०१४ मध्‍ये जेव्हा भारत सरकारने कृषी आयोग स्‍थापन करण्‍याची पहिल्‍यांदा संकल्‍पना मांडली, तेव्‍हा कृषी आयुक्त या नात्‍याने मला आठवते, की तत्कालीन अन्न व कृषिमंत्री शरद पवार यांनी डॉ. स्वामिनाथन यांची ताबडतोब आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड केली होती. किमान आधारभूत किंमतीच्या (एमएसपी) शिफारशींवर आयोगाचा अहवाल शेतकऱ्यांच्‍या हिताचा आहे. आज देशभरातील शेतकरी एमएसपी निश्‍चित करण्यासाठी, त्यांनी दिलेल्‍या सूत्राच्या अंमलबजावणीची मागणी करीत आहेत. लागवडीच्या किमतीपेक्षा ५० टक्के जास्त अधिक सी-२ च्‍या आधारे ‘एमएसपी’चे निश्‍चितीकरण करण्याच्या त्यांच्या शिफारशीतून त्‍यांचे शेतकऱ्यांप्रती प्रेम आणि समर्पण दिसून येते.

डॉ. स्वामिनाथन यांना विदर्भातील शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या आत्महत्यांबद्दल जेव्‍हा कळले, तेव्हा ते खूप व्‍यथित झाले होते. चेन्नईतील आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना तांत्रिक आणि आर्थिक मदत देणे सुरू केले आणि वर्धा येथे एक मदत केंद्र स्थापन केले. शेतकऱ्यांमध्‍ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याकरिता त्‍यांनी या परिसराला वारंवार भेटी दिल्या.

भारतीय शेती आज आधुनिक, पुरोगामी असली तरी ती अधिक क्लिष्टदेखील झाली आहे. शेतकऱ्यांना केवळ सल्ल्याची गरज नाही, तर त्‍यांना आधार हवा आहे. दिवंगत डॉ. स्वामिनाथन यांनी घातलेला पाया, आम्हाला भारतीय शेती शाश्‍वत ठेवण्यासाठी पुरेसा आहे. त्यांनी कृषीतील आत्‍मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आहे. सध्याच्या जागतिक अशांततेच्या काळात, ‘Peace can be achieved not by guns but grains’ हे त्यांचे शेवटचे शब्द आम्‍हाला आठवतात. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. स्वामिनाथन यांना ‘शेतकऱ्यांचे खरे वैज्ञानिक’असे संबोधले असावे. त्यांचे कार्य कृषी वैज्ञानिक समुदायासाठी संकटकाळात नेहमीच मार्गदर्शक ठरत राहील.

(दक्षिण आशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, जोधपूर, नवी दिल्ली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com