सुनील चावकेElection Surveys: नव्वदीच्या दशकात प्रस्थापित सामाजिक संशोधन संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी एकमेकांशी हातमिळवणी करीत ओपिनियन आणि एक्झिट पोलबाबत सर्वसामान्यांची राजकारणाविषयीची उत्सुकता चाळवली. यथावकाश निवडणूकपूर्व सर्व्हेक्षण, जनमत चाचणी आणि एक्झिट पोल ही राजकारणाच्या रणांगणातील महत्त्वाची शस्त्रे ठरली. .निवडणुकांमधील एक्झिट पोल आणि अॅथलेटिक्समधील पोल वॉल्ट (बांबू उडी) यांच्यात एक ठळक साधर्म्य आहे. अॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर दूर अंतरावर उंच पोलवरील आडवा बार अलगद उडी मारून पार करण्यासाठी हातात बांबू घेऊन धावत सुटणारा अॅथलिट आणि मतदारांचा कल समजून घेत त्याआधारे संख्याबळाचा निष्कर्ष काढणारे निवडणूक तज्ज्ञ यांचे काम अतिशय कौशल्याचे आणि तेवढेच जोखमीचे असते. .Social Awareness: वैज्ञानिक दृष्टिकोन हरवला तर लोकशाहीला धोका : जयदेव डोळे.निश्चित केलेली उंची पार करण्यासाठी ॲथलिटला अंगी भौतिकशास्त्र भिनवावे लागते, तर समूहाच्या मानसशास्त्राचे आकड्यात रूपांतर करण्यासाठी निवडणूक तज्ज्ञाला अनुभव आणि कसब पणाला लावावे लागते. उंच पोलवरील आडवा बांबू ओलांडणारा अॅथलिट कौतुकाला पात्र ठरतो, तसाच निवडणूक निकालाचे अचूक भाकीत वर्तविणारा तज्ज्ञही राजकीय वर्तुळात प्रतिष्ठा मिळवितो. पण पोलवर लागलेला आडवा बांबू धक्का लागून पडताच प्रेक्षकांचे त्या ॲथलिटविषयीचे स्वारस्य संपुष्टात येते. अंदाज वर्तविल्याप्रमाणे निकाल लागला नाही, की निवडणूक तज्ज्ञाचीही अपयशी ॲथलिटसारखीच अवस्था होते. दोघांमध्ये फरक एवढाच, की अॅथलिटचे यशापयश निर्भेळ मानले जाते. पण एक्झिट पोलमध्ये निवडणूक तज्ज्ञाचे निष्कर्ष चुकले की त्या अंदाजामागच्या राजकीय हेतूंविषयी शंका उपस्थित होतात..नव्वदीच्या दशकात प्रस्थापित सामाजिक संशोधन संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी हातमिळवणी करीत ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलनी देशातील सर्वसामान्य वाचकांची राजकारणाविषयीची उत्सुकता चाळवली. त्या वेळी अंदाजात अचूकता नसली तरी सर्वेक्षण करणाऱ्या बहुतांश संस्थांची विश्वासार्हता होती. पण यथावकाश निवडणूकपूर्व सर्व्हेक्षण, जनमत चाचणी आणि एक्झिट पोल ही राजकारणाच्या रणांगणातील महत्त्वाची शस्त्रे ठरली. पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्यासाठी अंतर्गत निवडणूकपूर्व सर्व्हेक्षण, मतदानापूर्वी जनमानस प्रभावित करण्यासाठी जनमत चाचणी आणि मतदान आटोपून निकाल लागण्यापूर्वी शेअर बाजारासह सर्व प्रकारच्या सट्टेबाजीला प्रभावित करण्यासाठी एक्झिट पोलचे निष्कर्ष कमालीचे उपयुक्त ठरू लागले. .अनेक वेळा एक्झिट पोलचे अंदाज अचूक ठरले, तर अनेकदा सपशेल चुकलेही. त्यामुळे अनेक निवडणूक तज्ज्ञांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागत राहिले. अनेकांनी आपली विश्वासार्हता जपण्यासाठी निवडणूक तज्ज्ञाच्या जोखमीच्या व्यवसायातून निवृत्ती पत्करणे पसंत केले. अचूक निष्कर्षांच्या शाश्वतीअभावी एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या वृत्तवाहिन्याही सावधपणे दूर झाल्या. पण लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा अविभाज्य अंग बनलेला एक्झिट पोलचा खेळ मात्र सुरूच राहिला. तीन-चार दशकांपूर्वी जनमानसाचा कौल जाणून घेण्यासाठी अवलंबिल्या जाणाऱ्या खर्चिक आणि वेळखाऊ शास्त्रीय पद्धतींना आता झटपट निष्कर्षांवर पोहोचण्याच्या ‘डेटा ड्रिव्हन’ जमान्यात फारसे महत्त्व दिले जात नाही. .Sunetra Pawar: यशवंतरावांचे विचारच आमचा वारसा : सुनेत्रा पवार.निवडणूकपूर्व सर्वेक्षण, ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल करताना कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब केला, अशा संस्थांना लागणारा कोट्यवधींचा निधी कोणी उपलब्ध करून दिला, याचाही तपशील गुलदस्तात ठेवला जाऊ लागला. विश्वासार्हता शाबूत असलेल्या संस्थांनी या व्यवसायाकडे पाठ फिरविल्यामुळे निवडणुकांच्या काळात एक्झिट पोलचा अंदाज वर्तविण्यासाठी भूछत्राप्रमाणे उगवलेल्या अनेक सर्व्हेक्षण संस्थांना आपसूकच संधी मिळाली. त्यामुळे अंदाज आणि निष्कर्षांचा दर्जा खालावला..अंदाजाचा जुगारपश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल काय लागतील याचे अंदाज वर्तविण्यापासून सीएसडीएस, सी-व्होटर आणि पश्चिम बंगालच्या बाबतीत अॅक्सिस माय इंडिया या प्रस्थापित सर्व्हेक्षण संस्थांनी दूर राहणे पसंत केले. बंगाली मतदारांचा कल जाणून घेणे अवघड ठरल्यामुळे एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर करता आले नाहीत, अशी अॅक्सिस माय इंडियाचे प्रदीप गुप्ता यांनी दिलेली अधिकृत सबब राजकीय वर्तुळाच्या पचनी पडलेली नाही..कारण पश्चिम बंगालविषयी कमालीचा सावधपणा बाळगणाऱ्या या संस्थेने तमिळनाडूमध्ये अभिनेत्या विजयचा टीव्हीके पक्ष पूर्ण बहुमतासह सत्तेत येणार असे कोणीही वर्तविले नाही, अशा अंदाजाचा जुगार खेळला आहे. २०१५च्या बिहार विधानसभा निवडणुकीसह लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये वर्तविलेल्या बऱ्यापैकी अचूक अंदाजांमुळे गुप्ता यांच्या विश्वासार्हतेने नवी उंची गाठली. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गुप्ता यांनी मोदी सरकारचा स्कोअर ‘चारसौ’ पार नेऊन ठेवला होता. यामुळे निकाल लागण्याआधीच भारतीय शेअर बाजाराला तेजीचे उधाण आले. पण निकालाच्या दिवशी गुप्ता यांचे अंदाज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आणि सोबत शेअर बाजारही. त्या चार-पाच तासांत गुप्ता यांची विश्वासार्हता अशी काही मातीमोल झाली की ते वृत्तवाहिनीवरील थेट प्रक्षेपणादरम्यान ढसाढसा रडले.अब्जावधींच्या उलाढालीनिवडणूक अंदाजाच्या बाजारात नामांकित सर्व्हेक्षण संस्थांची जागा फारशी विश्वासार्हता नसलेल्या कंपन्यांनी घेतली आहे. केंद्रात सत्तेत असलेला भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत सर्वच निवडणुकांमध्ये विजयी होणार असे एक्झिट पोलच्या माध्यमातून हमखास खरे ठरणारे भाकीत वर्तविणे फारसे अवघड नसते. २०१४ पासून ज्या राज्यात भाजपविरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत असेल तिथे भाजपचा विजय निश्चित असतो. पण ज्या राज्यांमध्ये भाजपच्या विरोधात प्रादेशिक पक्ष मैदानात असतात तिथे विजयाचा नेमका अंदाज वर्तविणे जोखमीचे ठरते. .अटीतटीच्या ठरलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीविषयी अल्पजीवी भाकीत वर्तविणे हा न परवडणारा व्यवसाय असल्यामुळे कदाचित यंदा अग्रगण्य सर्व्हेक्षण संस्थांनी दूर राहणे पसंत केलेले दिसते. या संधीचा फायदा घेऊन राजकीय पाठबळाच्या जोरावर उड्या मारणाऱ्यांपैकी काही सर्व्हेक्षण संस्थांचे अंदाज खरे ठरणार तर काहींचे चुकणार. ज्यांचे अंदाज खरे ठरले ते ‘जो जिता वही सिकंदर’च्या थाटात वावरतील. ज्यांचे अंदाज आज चुकले ते पुढचा अंदाज खरा ठरेपर्यंत तग धरून राहण्याचा प्रयत्न करतील किंवा काळाच्या ओघात त्यांनाही ‘एक्झिट’ घ्यावी लागेल. पण निवडणूक निकालांवरून ‘प्रेडिक्शन मार्केट’मध्ये चालणाऱ्या अब्जावधींच्या उलाढाली मात्र सुरूच राहतील.(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.