
Climate Change Effects On Agriculture : या वर्षीच्या जूनमध्ये महाराष्ट्रासह देशभर पाऊस कमी राहिला, अजूनही तो कमीच आहे. त्यामुळे खरीप पेरण्या तर खोळंबल्याच परंतु एकंदरीतच पिकांचे नियोजन बिघडले आहे. त्यातच नासा आणि नोआ या संस्थांच्या मते यंदाचा जून गेल्या १७४ वर्षांतील सर्वाधिक उष्ण महिना ठरला आहे.
त्याचबरोबर २०२३ हे दहा वर्षांतील सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद होण्याची शक्यता ९९ टक्के आहे, तर पाच वर्षांतील सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद होण्याची शक्यता ९७ टक्के असल्याचा नोआचा दावा आहे.
चालू वर्ष हे एल-निनोचे आहे. एल-निनोच्या वर्षात सर्वसाधारणपणे पाऊस कमी असतो आणि ते वर्ष उष्णही असते. परंतु हे असे नेहमीच घडत असल्याचेही दिसून येत नाही. असे असले तरी जागतिक तापमानवाढीला एल-निनो १६ ते २० टक्के कारणीभूत असल्याचे एक अभ्यास सांगतो. जागतिक तापमान वाढ, त्यामुळे बदलत असलेले हवामान आणि त्याचे मनुष्य-प्राणी-शेतीसह सजीव सृष्टीवर होणाऱ्या परिणामांची जगभर चर्चा मागील अडीच तीन दशकांपासून चालू आहे. वाहतुकीसाठी पेट्रोल, डिझेलचा वापर वाढत आहे.
वीज निर्मितीसाठी कोळसा जाळला जातोय. औद्योगिक विकासात कारखान्यांची संख्या वाढली आहे. यासह इतरही काही कारणांमुळे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन वाढून पृथ्वीचे तापमानही वाढत आहे. १९६० दरम्यान ३१५ पीपीएम असलेले वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण आता ४१२ पीपीएमच्या पुढे गेले आहे. औद्योगिक क्रांतीच्या या काळात पृथ्वीचे सरासरी तापमान १.१ अंश सेल्सिअसने वाढले असून, ही वाढ सातत्याने चालूच आहे.
वर्ष २०१५ पर्यंत पृथ्वीचे सरासरी वार्षिक तापमान काही वर्षी वाढले तर काही वर्षी ते कमी झाल्याच्या नोंदी देखील आहेत. परंतु २०१५ पासून ते २०२२ पर्यंत दर वर्षीच पृथ्वीचे तापमान वाढत असून, चालू वर्ष २०२३ हेही सर्वाधिक उष्ण ठरण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
हवामान बदलाच्या या काळात चक्रीवादळे, अतिवृष्टी, भूस्खलन, महापूर, विजा कोसळणे, अनावृष्टी, दुष्काळ अशा आपत्तीने शेतीचे नुकसान वाढले, मनुष्यप्राण्यांवर रोगराईचे प्रमाण वाढले आहे. यातून जीवित-वित्तहानीही बरीच होतेय. यातून जगभराची अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे.
पाणीटंचाई सुद्धा अनेक देशात उग्र रूप धारण करतेय. भारतासह संपूर्ण आशियायी देशांत आपत्ती निवारणाच्या खर्चातही वाढ होतेय. हवामान बदल हा भविष्यामधील धोका राहिला नसून, संपूर्ण जग सध्या त्याचे दुष्परिणाम भोगत आहे.
त्यामुळे यावरील उपाययोजनेसाठी आता अधिक काळ आपण थांबू शकत नाही, असा चर्चेचा सूर जगभरातील तज्ज्ञांकडून उमटतोय. हवामान बदलाची आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना यांचीही चर्चा जगभर असून, त्यात सकारात्मक फारसे काही दिसत नाही.
कार्बन डायऑक्साइड वायू उत्सर्जनात चीन, अमेरिका, रशिया देशांच्या वाटा अधिक असून, त्यांच्याकडून सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या देशाच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास कार्बन उत्सर्जन कमी करून हळूहळू सौर, पवन, जल अशा अक्षय ऊर्जेकडे वळावे लागेल.
तेलांवरील वाहनांऐवजी विजेवरील वाहने आणावी लागतील. जिथे शक्य आहे तिथे वृक्ष लागवड, संवर्धन अशा मोहिमा आखून त्या यशस्वी कराव्या लागतील. शेतकऱ्यांनी हवामान बदलास पूरक पीकपद्धतीबरोबर एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करायला हवा. असे झाले तर तापमानवाढ आणि त्या आनुषंगिक हवामान बदलाच्या शेतकऱ्यांना बसणाऱ्या झळा कमी होतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.