Crop Damage : ‘पिकं गेली माझी बुडी’

आता झालेल्या नुकसानीची मदत चार-आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या पदरात पडली, तरच त्यांची दिवाळी साजरी होईल, हे शासनाने लक्षात घ्यायला हवे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

या वर्षीच्या खरीप हंगामाच्या (Kharif Season) तोंडावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे पैसाच नव्हता. त्यातच मेमध्ये मॉन्सूनच्या (Monsoon) चांगल्या पावसाच्या अंदाजाने बळीराजा सुखावला. राज्यातील ८० टक्क्यांहून अधिक जिरायती शेतीच्या दृष्टीने खरीप हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पूर्वमशागतीपासून ते आता काढणीला येईपर्यंत पदरमोड, उधारी-उसनवारी करून शेतकऱ्यांनी पिके जोपासली.

यात त्यांनी केलेल्या मेहनतीचे तर मोलच होऊ शकत नाही. असे असताना मूग, उडीद ही पिके ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीने (Heavy Rain) बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती लागली नाहीत. तर आता ऑक्टोबरमध्ये मागील १० दिवसांपासून पडत असलेला अवकाळी पाऊस सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton), मका, भात (Paddy), भुईमूग अशा पिकांची अक्षरशः माती करण्याचे काम करीत आहे.

Crop Damage
Crop Damage : अकोट, तेल्हारा तालुक्यांत अतिवृष्टी, पुरामुळे मोठे नुकसान

अरे पावसा पावसा, तुझं येणं अवकाळी

किती घातला धिंगाणा, पिकं गेली माझी बुडी

या प्रा. बी. एन. चौधरी यांच्या कवितेच्या ओळी सध्याच्या शेती-शेतकऱ्यांच्या भीषण वास्तवाचे समर्पक वर्णन करतात. कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पहिल्या वेचणीच्याच कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागत आहे. अशावेळी कापसाचे हे मुख्य उत्पादन शेतातच भिजले. जास्त भिजलेल्या कापसाच्या वाती होऊन त्या झाडावरच लटकत आहेत, तर कमी भिजलेल्या कापसाचे वजन आणि प्रतही खालावते.

काढणीला आलेले सोयाबीन कुठे शेतात उभे आहे, कुठे कापणी करून रानातच पडून आहे, तर कुठे गंजी (बनीम) लावून आहे. सध्या पडत असलेल्या पावसाने या तिन्ही अवस्थांतील सोयाबीनचे अतोनात नुकसान केले आहे. शेतात उभे आणि कापणी करून पडून असलेल्या सोयाबीनला अनेक ठिकाणी शेंगातच कोंब फुटत आहेत. सोयाबीनचे हे १०० टक्के नुकसान आहे.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीसदृश पावसामुळे पिके मातीमोल

हाती येणाऱ्या सोयाबीनचे देखील उत्पादन आणि प्रत घटेल. अशीच काहीशी गत कमी-अधिक प्रमाणात भात, मका, बाजरी, ज्वारी या हंगामी पिकांसह फळे-भाजीपाल्याची आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे हाती आलेला शेतीमाल बाजारात येण्याआधीच भाव पाडून ठेवण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे.

ज्या खरीप हंगामावर शेतकऱ्यांची सर्व भिस्त असते, वर्षभर घर-संसाराचा गाडा चालविण्याचे नियोजन असते, तोच हंगाम हातचा गेला तर त्यांनी करायचे काय? नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीत शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर त्यांना प्राधान्यक्रमाने सरकारी मदतीची गरज असते. परंतु राज्यात सरकारी मदत कधीच वेळेवर मिळत नाही. त्यातून अनेक नुकसानग्रस्त शेतकरी सुटतात सुद्धा!

या वेळेस तर खरीप हंगामाच्या तोंडावर सुरू झालेला सत्ता संघर्ष अजूनही मिटलेला नाही. शेतकरी अवकाळी पावसाच्या नुकसानीने हवालदिल झालेला आहे. त्याचवेळी राज्यात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून खरे निष्ठावान कोण? कोणात्या पक्षाला कोणते नाव, कोणते चिन्ह मिळाले आणि त्यावरून एकमेकांवरच्या आरोप-प्रत्यारोपात राज्यकर्ते मश्गूल आहेत. या सत्तासंघर्षाचा अत्यंत हिडीसवाणा खेळ राज्यातील अत्यंत बिकट परिस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांना-जनतेला पाहावा लागत आहे.

देणाऱ्यानंच लुटलं, मागू कुठं दाद बापा?

सरकारबी झोपलं, घालू किती रोज खेपा?

अशी सध्याच्या सरकारची अवस्था आहे. सरकारला शेतकऱ्यांप्रती खरेच संवेदना असेल तर त्यांनी सध्याच्या नुकसानीची तत्काळ पाहणी-पंचनामे करून मदत जाहीर करावी. ही मदत लवकरच शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल हे पाहावे. या अनुषंगानेच हिंगोली जिल्ह्यातील सहाव्या वर्गातील प्रताप कावरखे या लहान मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले अत्यंत भावनिक पत्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचे विदारक वास्तव उभे करते.

खरीप हंगामातील शेतीमाल विकून उधारी-उसणवारी फेडून दसरा-दिवाळी साजरी करण्याचे देखील शेतकऱ्यांचे नियोजन असते. आता झालेल्या नुकसानीची मदत चार-आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या पदरात पडली तरच त्यांची दिवाळी साजरी होणार आहे. केवळ दसरा-दिवाळीच नाही तर आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना उभेही करावे लागणार आहे, हेही केंद्र-राज्य सरकारने लक्षात घ्यायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com