Banana Cucumber Mosaic : दुष्टचक्र ‘सीएमव्ही’चे

विषाणूजन्य रोग येऊ न देण्यासाठी घेतलेली काळजीच कधीही बरी, याचा प्रत्यय आपल्याला मानवात कोरोना, पशुधनामध्ये लम्पी स्कीन आणि पिकांमध्ये केळीत सीएमव्ही या रोगामुळे आला आहे.
Banana Cucumber Mosaic
Banana Cucumber Mosaic Agrowon

केळीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात केळी बागांवर कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर जामनेर आणि नंदूरबार जिल्ह्यातील शहादा या तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी प्रादुर्भावग्रस्त केळीच्या बागा काढून टाकत आहेत.

नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural calamity) केळी पिकाचे सातत्याने नुकसान (Banana Crop Damage) होत असते. २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे (Coroan Pandemic) केळीला मोठा (Banana Damage) फटका बसला. दराच्या बाबतीतही व्यापारी केळी उत्पादकांची नेहमी कोंडी करीत असतात. या सर्व आपत्तींमधून सावरण्याचा प्रयत्न केळी उत्पादक करीत असताना या वर्षी सीएमव्हीच्या (CMV Outbreak On Banana) दुष्टचक्रात या भागातील केळी उत्पादक अडकला आहे. सीएमव्हीमुळे जळगाव जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टरवरील केळी बागा शेतकऱ्यांना काढून टाकाव्या लागल्या आहेत.

Banana Cucumber Mosaic
Banana Market : केळी उत्पादकांना 'कुकुंबर मोझॅक व्हायरस'चा फटका

केळी लागवडीसाठी सुरुवातीलाच एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. प्रादुर्भावानंतर बाग काढून टाकण्यासाठी बसणारा भुर्दंड वेगळाच! त्यानंतर शेतीची मशागत आणि त्यात नव्या पिकाची लागवड हे कामही खर्चीक आणि कष्टदायक असते. त्यामुळे सीएमव्हीमुळे ज्या शेतकऱ्यांना केळी बागा काढून टाकाव्या लागत आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळायला पाहिजेत.

Banana Cucumber Mosaic
Banana Disease : केळी बागांमध्ये ‘कुकुंबर मोझॅक’ रोगाचे थैमान

विषाणूजन्य रोग येऊ न देण्यासाठी घेतलेली काळजीच कधीही बरी, याचा प्रत्यय आपल्याला मानवात कोरोना, पशुधनामध्ये लम्पी स्कीन आणि पिकांमध्ये केळीत सीएमव्ही या रोगामुळे आला आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात पसरत असलेला सीएमव्ही हा रोग जुलै-ऑगस्टमध्ये म्हणजे उशिरा लागवड केलेल्या केळी बागांमध्ये दिसून येत आहे. केळीच्या लागवडीची शास्त्रोक्त शिफारस ही फेब्रुवारी, मे-जून आणि ऑक्टोबर अशी आहे. परंतु बहुतांश केळी उत्पादक केळीची लागवड जुलै-ऑगस्टमध्ये करतात. या वेळी पाऊस जास्त असतो. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणही अधिक असते.

असे वातावरण सीएमव्हीच्या फैलावास पोषक असते. रावेर, यावल सीएमव्ही रोग पसरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एक पीकपद्धती आणि वर्षभर चालू असलेली केळीची लागवड हे देखील आहे. ‘केळी एके केळी’ अशा पीक पद्धतीमुळे या भागात वर्षभर वेगवेगळ्या अवस्थेतील केळी बागा आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे सीएमव्ही रोगाची साखळी तुटत नाही आणि प्रादुर्भाव वाढत जातो. सीएमव्ही या रोगाचा संसर्ग केळीमध्ये मावा या रसशोषक किडीमुळे होतो. माव्याची जवळपास ३०० यजमान पिके आहेत. केळी बागेला लागून कापूस, टोमॅटो, काकडीवर्गीय पिके, मूग, उडीद आदी माव्याची यजमान पिके घेऊ नयेत असे सांगितले जाते. परंतु जळगाव भागात खरिपात कापूस, मूग, उडीद ही पिके घेतली जातात. काही शेतकरी तर केळीत काकडीवर्गीय तसेच मूग, उडीद केळीत आंतरपीक म्हणूनही घेतात. त्यामुळे देखील सीएमव्हीचा संसर्ग आणि फैलाव होण्यास पोषक वातावरण मिळते.

केळी पिकावर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नसेल, तर शेतकऱ्यांनी शिफारशीत वेळेतच केळीची लागवड करावी. पावसाळ्यात उशिरा जुलै-ऑगस्टमध्ये केळी लागवड करू नये. केळी लागवडीत पीकफेरपालट पद्धतीचा अवलंब करावा. माव्याला बळी पडणारी पिके केळी बागेजवळ अथवा आंतरपीक म्हणून घेऊ नयेत. केळीत नेहमी एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन पद्धतीचा वापर करायला हवा. जळगाव भागात केळीवर सीएमव्हीच्या प्रादुर्भावाचे हे चौथे वर्षे आहे. त्यामुळे याच्या प्रतिबंधात्मक उपायांबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन वाढवावे लागेल. या समस्येबाबत त्रिची (तमिळनाडू) येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राला कळविण्यात थोडा उशीरच झाला आहे. आता या संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी जळगाव भागातील प्रादुर्भावग्रस्त केळी बागांना तत्काळ भेट देऊन शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगायला हव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com