Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon

Crushing Season : गळीत हंगाम दिवाळीनंतरच फायद्याचा

Sugarcane Crushing Season : साखर कारखाने ऑक्टोबरमध्ये चालू करण्याची तीव्र स्पर्धा सोलापूर, पुणे या भागांत आहे. या उलट मराठवाडा तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा येथील कारखाने १५ नोव्हेंबर दरम्यान चालू होत असतात. परिणामी, त्यांचा ऊसदर आणि उतारा दोन्हीही जास्त आहे, हेही येथे ध्यानात घेणे गरजेचे आहे.
Published on

समीर सलगर

साखर कारखाने ऑक्टोबरमध्ये चालू करण्याची तीव्र स्पर्धा सोलापूर, पुणे या भागांत आहे. या उलट मराठवाडा तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा येथील कारखाने १५ नोव्हेंबर दरम्यान चालू होत असतात. परिणामी, त्यांचा ऊसदर आणि उतारा दोन्हीही जास्त आहे, हेही येथे ध्यानात घेणे गरजेचे आहे.

येणारा २०२३-२४ चा गळीत हंगाम तोंडावर आहे. दुष्काळाच्या सावटाखाली येणारा हंगाम आव्हानात्मक असणार आहे. दरवर्षी हंगामाचे अगोदर ऊस कारखानदारी विषयक विशेष मंत्री समितीची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होत असते. या बैठकीत पावसाचा आढावा, ऊस पीक उपलब्धतेचा आढावा, होणारे अंदाजे गाळप, अंदाजे साखर उत्पादन, हंगाम चालू करण्याची तारीख, मागील वर्षीचे शेतकऱ्यांचे देणे, मुख्यमंत्री सहायता निधी आदी बाबींवर सविस्तर चर्चा होऊन सर्वसमावेशक धोरण तयार केले जाते. सदरचे धोरण अर्थातच सहकारी आणि खासगी सर्व कारखान्यांना बंधनकारक असते. या वर्षीची मंत्री समितीची बैठक सप्टेंबर महिन्यात अपेक्षित आहे. या मंत्री समितीकडून हंगाम चालूची तारीख ही कळीचा मुद्दा ठरतो आहे.

ज्या वर्षी जास्त ऊस उपलब्ध असतो तेव्हा शक्यतो मंत्री समिती लवकर कारखाने चालू करण्यास प्राधान्य देतात. मागील काही वर्षांचा अभ्यास केल्यास एक ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरच्या दरम्यान कारखाने चालू करण्यास महाराष्ट्र शासन अनुकूल असते. परंतु १५ ऑक्टोबर ते अगदी २५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस महाराष्ट्रात रेंगाळताना आढळतो आणि त्याचा तांत्रिकदृष्ट्या विचार न करता कारखाने चालू करण्याच्या धोरणाचा पुनर्विचार होणे गरजेचे वाटते. अगदी पावसाळा बंद होण्याच्या अगोदर कारखानदारांची कारखाने चालू करण्याची तीव्र स्पर्धा लागलेली असते. कारखानदारच सरकारमध्ये असल्याने या निर्णयास शेतकरी अथवा सभासद फारसे विरोध करताना आढळत नाहीत.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Season : यंदाचा गळीत हंगाम दिवाळीनंतरच

काही कारखाने तर सरकारने ठरवून दिलेल्या तारखेच्या आठवडाभर अगोदर चालू करण्यात फार मोठेपणाचे समजतात. परंतु यामुळे साखर उद्योगाचे आणि अर्थातच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. ऊस हा गवत वर्गीय जातीतील पीक गणले जाते. प्रत्येक वनस्पतीच्या वाढीसाठी विशिष्ट असा कालावधी निश्‍चित असतो त्याप्रमाणेच उसाची शाकीय वाढ (व्हिजेटेटिव्ह ग्रोथ) ही प्रामुख्याने पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये गतिमान असते. या कालावधीत वातावरणात असणारी आर्द्रता व कमी उष्णता उसाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर पोषक असते. त्यामुळे पावसाळ्यात उसाच्या कांड्या, उंची, खोड यांच्या वाढीबरोबरच वजनात झपाट्याने वाढ होत असते. हवेत मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा नायट्रोजन हा वारंवार पडणाऱ्या पावसाबरोबर उसाच्या मुळांना मिळतोच. परंतु आर्द्रता आणि भुसभुशीत झालेली जमीन यामुळे मुळांना मिळणारा ऑक्सिजन उसाच्या वाढीला अतिशय पोषक असतो.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Season : पावसाने दडी मारल्याने गळीत हंगाम धोक्यात

जेव्हा परतीचा पाऊस बंद होतो म्हणजेच आपणाकडे ऑक्टोबर १५ नंतर उसात काय बदल होतात ते जाणून घेणे गरजेचे आहे. आपण ज्याला ऑक्टोबर हीट म्हणतो म्हणजेच तापमान वाढीबरोबरच आर्द्रता कमी होण्यास प्रारंभ होतो. या कालावधीत उसाच्या पानावरील घर्म ग्रंथींमधून पाण्याचे उत्सर्जन चालू होते. याच वेळी शाकीय वाढीचा वेग मंदावतो आणि उसाची पक्वता वाढण्यास प्रारंभ होतो. नोव्हेंबरमध्ये जसजसे थंडीमुळे तापमान
आणि आर्द्रता कमी होते, तसतसे ग्लुकोज आणि फ्रुकटोजचे रूपांतर साखरेत होण्याची प्रक्रिया सुरू होते. हिवाळ्यात शाकीय वाढ कमी होत असताना उसाला स्वतःसाठीचे पोषण मूल्याचे प्रमाण कमी लागते. त्यामुळेच साखर झपाट्याने वाढत जाते. त्यातच २६५ सारख्या उसाच्या जातींचा शाकीय वेग जास्त असतो, तर ८६०३२ चा पक्वता वाढीचा वेग जास्त असतो. त्यामुळेच हंगामाचे सुरुवातीस ८६०३२ आणि तत्सम जातीस प्राधान्य देणे गरजेचे असते.

ऑक्टोबरमध्ये कारखाने चालू केल्यास साखर उतारा ८.५ ते ९ टक्के एवढाच मिळतो. तोच उतारा नोव्हेंबर १५ नंतर ९.५ ते १० टक्के एवढा मिळतो. म्हणजेच आपण किमान अर्धा टक्के उतारा कमी मिळत असताना देखील कारखाने चालू करण्याची गडबड करतो. अर्धा टक्के उतारा जास्त म्हणजे शेतकऱ्यास आगाऊचे १५० रुपये प्रति टन देता येऊ शकतात आणि ही रक्कम चांगली आहे. कारखाने ऑक्टोबरमध्ये चालू करण्याची तीव्र स्पर्धा सोलापूर, पुणे या भागांत अधिक आहे. या उलट मराठवाडा तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा येथील कारखाने १५ नोव्हेंबर दरम्यान चालू होत असतात. परिणामी, त्यांचा ऊसदर आणि उतारा दोन्हीही जास्त आहे, हेही येथे ध्यानात घेणे गरजेचे आहे.

गळीत हंगामास लवकर सुरुवात केल्याने शेतकरी आणि कारखाने या दोन्ही घटकांचे नुकसान होत असून देखील हा विषय कायम दुर्लक्षित आहे. या वर्षी पाऊस कमी असल्याने उसावर पडणारे तांबेरा रोग, मावा तसेच हुमणी कीड यामुळे शेतकरी त्रस्त आहे. मात्र कधी नव्हे तो साखरेचा बाजार तेजीत असल्याने जास्तीत जास्त साखर उत्पादनाकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कारखाने उशिरा चालू केल्यास शेजारील राज्य म्हणजेच कर्नाटकमधून उसाची पळवापळवी होण्याचा एक धोका असतो. मात्र या वर्षी कर्नाटक सरकारने देखील कारखाने लवकर चालू करण्याने साखर उत्पादनात होणारी तूट लक्षात घेऊन एक नोव्हेंबरपूर्वी कारखाने चालू करण्यास मनाई आदेश जारी केला आहे. ही आपणासाठी आनंदाची बाब आहे.

राज्य सरकारने असाच आदेश गूळ पावडर कारखान्यांना (गुऱ्हाळांना) देखील लागू करणे गरजेचे आहे. या वर्षी दीपावली १५ नोव्हेंबरला संपत आहे. शेतकऱ्यांच्या आणि कारखान्याच्या आर्थिक हिताचा हा महत्त्वपूर्ण निर्णय या वर्षी घेऊन दरवर्षीसाठीच १५ नोव्हेंबर हीच गाळप हंगामाला सुरुवात करण्याची तारीख जाहीर केल्यास साखर उद्योगाच्या आणि अर्थातच शेतकऱ्यांच्या हिताचे होईल. राज्य सरकार याचा नक्कीच विचार करेल, अशी आशा करूया.

(लेखक हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना, वाळवा येथे कार्यकारी संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com