
आज ‘ॲग्रोवन’चा वर्धापन दिन! यानिमित्त महिला शक्तीचा जागर ॲग्रोवनने विशेषांक काढून केला आहे. पुराणात अष्टभूजा देवीची कथा आपण ऐकली असेल. अष्टभूजा देवीला आठ भुजा म्हणजे हात आहेत.
ढाल, तलवार, त्रिशूल, धनुष्यबाण, कमळ, शंख अशी आयुधे तिच्या हाती आहेत. दृष्ट राक्षसांपासून स्वतःच्या अन् भक्तांच्या रक्षणार्थ अशी आयुधे अष्टभूजा देवीने आपल्या हाती धरली असल्याची आख्यायिका आहे.
आजच्या युगातील आधुनिक अष्टभुजांना दोनच हात असले तरी शेतीतील अनेक कामे करण्याकरिता त्यांनी विविध आयुधे हाती धरलेली आहेत. खरे तर शेती हा शब्दच ‘तिच्या’शिवाय पूर्ण होत नाही. शेती व्यवसायाची तीच जननी आहे.
शेतीचा शोध आणि त्यानंतर आजपर्यंतचे शेतीतील सर्व कालसुसंगत बदल, या सर्व टप्प्यांत महिलांचा सहभाग वाढतच गेला आहे. आजही घर-संसार सांभाळून पेरणीपासून ते पिकांच्या काढणी-मळणीपर्यंतची बहुतांश कामे महिलाच करतात.
एवढेच नव्हे तर काढणीपश्चात धान्य स्वच्छता, साठवण, प्रतवारी या कामांतही महिलांचाच सहभाग अधिक दिसून येतो. शेतीला कल्पकतेने दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी-कोंबडीपालन, रेशीम शेती या पूरक उद्योगाची जोड देऊन घर-कुटुंबाचं अर्थकारण मजबूत करण्याचे कामही महिलाच करतात.
काळाची पावले ओळखून शेतीमाल प्रक्रिया आणि प्रक्रियायुक्त उत्पादने विक्री महिलांनी आपल्या हाती घेतले आहे. अर्थात, महिलांचा हात लागला नाही, असे कोणते काम नाही.
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अभंगाच्या या ओळी त्या काळात महिलांचे महत्त्व विषद करतात. महिलांचा कुटुंब सुधारण्यासाठीच नाही, तर एकूणच समाज उद्धारासाठी देखील मोलाचा वाटा असल्याचे यातून स्पष्ट होते.
असे असताना आजही महिलांना समानतेचा दर्जा नाही. शेतीचा सर्व भार आपल्या माथी पेलणाऱ्या बहुतांश महिलांच्या नावे घर-शेती-पशुधन नाही. भारतात केवळ १२ टक्के महिलांची नोंद सातबारावर आहेत. शेती-व्यवसायाचे नियोजन असो, की मुलीबाळींचे लग्नकार्य अशा निर्णयप्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले जात नाही.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना ३० टक्के मजुरी कमी दिली जाते. मुलींच्या शिक्षण आणि पोषणातही दुजाभाव दाखविला जातो. त्यातून मुली-महिलांचे कुपोषण वाढत आहे.
बालविवाह, अल्पवयात मातृत्व, कौटुंबिक हिंसाचार अशा सामाजिक समस्या वाढत आहेत. जुन्या चालीरीती, परंपरा महिलांवर लादून त्यांचे शोषण होत आहे. महिलांचे शिक्षण तसेच त्यांना समान दर्जा देण्याबाबत प्रबोधनापासून ते प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा लागेल. खासकरून निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवावा लागेल.
महिलांकरिता अनेक योजना, उपक्रम, कार्यक्रम, कायदे आहेत. हे सर्व कार्यक्रम, उपक्रम महिलांपर्यंत पोहोचवावे लागतील. शेतीमध्ये महिलांना केवळ निविष्ठा वेळेवर उपलब्ध करून दिल्या, तर उत्पादकतेत २० ते ३० टक्के वाढ होईल, असा अन्न व कृषी संस्थेचा एक अहवाल सांगतो.
याचबरोबर महिलांना निर्णयाचे स्वातंत्र्य तसेच आधुनिक शेतीचे प्रशिक्षण त्यांना दिले, तर उत्पादकतेत किती वाढ होईल, याचा विचार झाला पाहिजेत. शेतीतील महिलांचे कष्ट कमी करण्यावर पण भर द्यायला हवा. सध्या बहुतांश महिला स्वखुशीने कुठलेली प्रशिक्षण न घेतात प्रक्रिया उद्योगात उतरल्या आहेत.
अशावेळी अन्नप्रक्रियेतील प्रशिक्षण देऊन त्यांचा कौशल्य विकास केला तर शेतीमाल प्रक्रियेचा टक्का झपाट्याने वाढणार आहे. घर-संसाराचा गाडा रेटताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यात मात्र त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या आरोग्याची हेळसांड होणार नाही, हे पाहायला हवे.
महिला सक्षमीकरण, सबलीकरणाच्या केवळ गप्पा मारून चालणार नाही तर त्यांच्या हक्क, अधिकार, कर्तव्य, स्वातंत्र्य यावर गदा येणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. असे झाले तरच नवदुर्गांचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.