Turmeric : हळदीचा बदलता रंग

विदर्भ, मराठवाड्यात पिकांसाठी फारसे पर्याय उपलब्ध नसताना हळदीसारख्या हमी पिकाचे क्षेत्र घटत असेल तर ही बाब चिंताजनक म्हणावी लागेल.
Turmeric
TurmericAgrowon

हळदीची लागवड (Turmeric Cultivation) आणि काढणी या दोन्हींसाठी शेतकऱ्यांना खूप वेळ मिळतो. सध्याच्या वाढत्या नैसर्गिक आपत्तीत ही दिलासादायक बाब आहे. हळदीचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान (Crop Damage)कमी होते. हळदीवर फारसा कीड-रोगांचा प्रादुर्भाव आढळत नाही. या पिकाला जंगली प्राण्यांचा त्रास नाही. काढणी -प्रक्रिया सोडली तर फारशी मेहनत करावी लागत नाही. हमखास उत्पादन आणि बऱ्यापैकी भाव आदी कारणांमुळे मागील एक-दीड दशकांत राज्याच्या मराठवाडा तसेच विदर्भात हळद क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे.

या भागातील सोयाबीननंतर पीक पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झालेले हळद हे दुसरे महत्त्वाचे पीक म्हटले तर वावगे ठरणार नाही. असे असताना एकट्या हिंगोली जिल्ह्यात या वर्षी हळद क्षेत्र जवळपास १५ हजार हेक्टरने कमी झाले आहे. असाच काहीसा ट्रेंड मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसह विदर्भातही दिसून येतो. मागील काही वर्षांपासून देशभर १५ ते २० टक्क्यांनी हळदीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मागील हंगामात देखील गतवर्षीच्या तुलनेत देशात ३३ हजार हेक्टरने हळदीचे क्षेत्र वाढलेले असताना मराठवाडा, विदर्भात मात्र क्षेत्र घटत आहे. या भागात हळद लागवड क्षेत्रात घट होण्याची कारणे अनेक आहेत.

Turmeric
Weed Control : खरीप पिकांतील तणनियंत्रण

मागील तीन वर्षांपासून विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी होतेय. अतिवृष्टीमुळे हळदीच्या शेतात पाणी साचून राहत असल्याने कंदमाशी कीड तसेच कंदसडचा प्रादुर्भाव वाढत आहे. हळद लागवड ते काढणी-प्रक्रिया ही कामे मजुरांकडून करून घ्यावी लागतात. त्यात मजूरटंचाई, मजुरीचे वाढलेले दर यामुळे काढणी-प्रक्रिया अशी कामे खूपच कष्टदायक आणि खर्चीक ठरताहेत. पारंपरिक लागवडीत उत्पादकता फारच कमी मिळतेय. मागील काही वर्षांपासून हळदीला दरही कमी मिळतोय. नैसर्गिक आपत्तीत हळदीचे नुकसान वाढत आहे.

विदर्भ, मराठवाड्यात पिकांसाठी फारसे पर्याय उपलब्ध नसताना हळदीसारख्या हमी पिकाचे क्षेत्र घटत असेल तर ही बाब चिंताजनक म्हणावी लागेल. या परिसरात प्रामुख्याने सेलम जातीची लागवड होते. इतर जातींचा फारसा पर्याय शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. सेलमचे पण शुद्ध, खात्रीशीर बेणे शेतकऱ्यांना मिळत नाही. भारतात हळदीच्या ५३ जातींची लागवड होते. त्यात सेलमपेक्षा कमी कालावधीच्या, अधिक उत्पादनक्षम आणि कुरकुमीनचे प्रमाणही जास्तीचे असलेल्या जाती आहेत.

अशावेळी या परिसरात उत्तम येणाऱ्या इतर जातींवर संशोधन व्हायला पाहिजेत. हळदीचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान वाढले असताना या पिकाला विमा संरक्षण मिळायला पाहिजे. हळदीमध्ये प्रगत लागवड तंत्र आले आहे. बेडवर लागवड त्यात ठिबकचा वापर, रासायनिक खते-कीडनाशकांचा प्रमाणबद्ध वापर यातून लागवड खर्चात घट होऊन उत्पादनक्षमता वाढते. बेडवरील लागवडीत पाण्याचा निचरा होत असल्याने कंदमाशी, कंदकुज रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. हळद लागवड, काढणी, गोळा करणे यासाठी उत्पादकांना यंत्रे-अवजारे उपलब्ध झाले पाहिजेत.

हळदीमध्ये अशा तंत्र-यंत्राचा वापर झाल्यास कमी क्षेत्रात अधिक उत्पादन मिळ शकते. हळद शिजविणे, वाळविणे, ड्रम रोलिंग करणे ही कामेही वेळखाऊ आणि कष्टदायक आहेत. कच्च्या हळदीवर प्रक्रियेचे तंत्र तैवान, डेन्मार्क या देशांमध्ये उपलब्ध आहे. कच्ची हळद न शिजविता ड्रायरमध्ये वाळविल्यानंतर त्याचे तुकडे करून अथवा तशाच हळदीवर प्रक्रिया करता येते. यामध्ये कुरकुमीनचे प्रमाण पण अधिक राखले जाते. हे तंत्र आपल्या राज्यात उपलब्ध झाले तर उत्पादकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील. बाजारपेठा विकसित न झाल्यामुळे हळदीच्या

दरातही मोठी तफावत आढळून येते. लागवड क्षेत्र वाढत असताना हळदीच्या बाजारपेठा विकसित व्हायला हव्यात. त्याचबरोबर प्रक्रिया, साठवण, विक्रीसाठीच्या पायाभूत सुविधा देखील सर्वत्र उपलब्ध झाल्या पाहिजेत. असे झाले तर विदर्भ, मराठवाड्यात हे पीक उत्पादकांना किफायतशीर ठरून लागवड क्षेत्रात घट नाही तर वाढ होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com