
सातारा : मधमाश्यांच्या (Beekeeping) वसाहतीचे जतन व संवर्धन (Bee Conservation) करणे, या उद्देशाने जिल्हा परिषद व मधसंचालनालयातर्फे शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान (Beekeeping Subsidy) देण्याची नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
मधसंचालनालय महाबळेश्वर व जिल्हा परिषदेच्या सेस निधीमधून प्रत्येकी ५० टक्के असे शंभर टक्के अनुदान देण्यात येईल. या योजनेला जिल्हा परिषदेच्या ठराव समितीने मान्यता दिली आहे. या वर्षी महाबळेश्वर, वाई, जावळी, सातारा, पाटण, माण व खटाव तालुक्यांत ही योजना राबवण्यात येईल.
जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्चना वाघमळे, कृषी विकास अधिकारी विजय माईणकर, जलसंधारण अधिकारी अरुण दिलपाक या वेळी उपस्थित होते. कृषी विभागाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मधपेटीसाठी अनुदान देण्याची नावीन्यपूर्ण योजना राबविण्याच्या ठरावास समितीने मान्यता दिली.
‘‘‘जिल्हा परिषद सेस २०२२-२३’ अंतर्गत या वर्षी निवडक शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी मधपेटीस अनुदान देण्याची नावीन्यपूर्ण योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. मधमाश्यापेटी, मधमाश्यांची वसाहत व इतर आवश्यक साहित्यासह चार हजार ४३४ इतका खर्च आहे. त्यास मध संचालनालय महाबळेश्वर यांच्या कार्यालयाकडून प्रति मधपेटीस किमतीच्या ५० टक्के म्हणजे दोन हजार २१७ व तेवढेच अनुदान जिल्हा परिषद सेसमधून देण्यात येईल, अशी माहिती माईणकर यांनी दिली.
पात्रता निकष
- लाभार्थी शेतकरी असावा
- लाभार्थ्याचे स्वमालकीचे क्षेत्र असावे
- परिसरात मधमाश्या पालनासाठी उपयुक्त जंगली वनस्पती असाव्यात
- मधमाश्या पालनासंबंधी प्रशिक्षण घेणे बंधनकारक
- लाभार्थीकडे मधमाश्या पालनासाठी फळझाडे, फळभाज्या, फुलपिके, कडधान्ये, गळीतधान्य पिके असावीत
मधुमक्षिका पालनासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येईल. प्रति लाभार्थ्यास पाच मधपेट्यांना जिल्हा परिषद ११ हजार ८५ रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करेल. या वर्षात महाबळेश्वर, वाई, जावळी, सातारा, पाटण, माण व खटाव तालुक्यांत ही योजना राबविण्यात येईल.
- ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.