Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Article by Vijay Sukalkar : शेतीमाल निर्यातीत मोठी घट होण्यामागे जागतिक अशांततेपेक्षा केंद्र सरकारने राबविलेली चुकीची धोरणे अधिक जबाबदार आहेत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Agriculture Export Condition : आपला देश विविधतेने नटलेला आहे. येथील वैविध्यपूर्ण वातावरणात विविध शेतीमालाचे अत्यंत दर्जेदार उत्पादन शेतकरी घेत असतात. तांदळामध्ये बासमतीपासून ते आंब्यामध्ये देवगड-रत्नागिरीचा हापूस, नागपूरची संत्रे, नाशिकची द्राक्षे, कांदा ही काही विशेष गुणवैशिष्ट्ये लाभलेली शेतीमाल उत्पादने आहेत. अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांनी संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे.

असे असले तरी जागतिक निर्यातीत आपला वाटा केवळ २.५ टक्के असून, पुढील काही वर्षांत हा वाटा ४ ते ५ टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन सरकार पातळीवर करण्यात आले आहे. खरे तर निर्यातवृद्धीच्या नियोजनालाही फार उशीर झाला म्हणावे लागेल. दुर्दैवी बाब म्हणजे एप्रिल ते फेब्रुवारी (२०२३-२४) या काळात आपली कृषी निर्यात नऊ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे २०२२-२३ मध्ये ४७.९ अब्ज डॉलरवर असलेली आपली शेतीमाल निर्यात आता ४३.७ अब्ज डॉलरवर येऊन ठेपली आहे.

Agriculture Market
Agriculture Export : देशाच्या कृषी निर्यातीत नऊ टक्क्यांनी घसरण

मागील जवळपास पाच वर्षांपासून शेतीमाल निर्यातीसाठी पूरक वातावरणच दिसत नाही. २०२० ते २०२२ ही दोन वर्षे कोरोना आपत्तीने गाजविली. त्या वेळी जागतिक व्यापार पूर्णपणे ठप्पच होता. कोरोना आपत्तीनंतर जागतिक व्यापाराचा गाडा रुळावर येत असतानाच रशिया-युक्रेन युद्धाचा भडका उठला.

आयात-निर्यातील आघाडीवरच्या या दोन देशांत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक व्यापारावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला. जागतिक अशांतता आणि त्यात जगभर वाढत्या नैसर्गिक आपत्तीत शेतपिकांचे होणारे नुकसान यामुळे अन्नसुरक्षेचा भीतीने अनेक देशांनी आपल्या आयात-निर्यातील मोठे बदल केले. त्याचाही परिणाम जागतिक व्यापारावर झाला. यातूनही काही देश सावरत असताना ऑक्टोबर २०२३ पासून इस्त्राइल-पॅलेस्टाइन (हमास), इराण-इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या ड्रोन हल्ल्यांनी जागतिक व्यापार विस्कळीत करण्याचेच काम केले.

Agriculture Market
Agriculture Export : २०२३-२४ आर्थिक वर्षात शेतमालाची निर्यात ८.८ टक्क्यांनी घटली; केंद्र सरकारच्या निर्यातबंदीचा फटका

शेतीमाल निर्यातीत मोठी घट होण्यामागे जागतिक अशांततेपेक्षा केंद्र सरकारने राबविलेली चुकीची धोरणे अधिक जबाबदार आहेत. शेतीमाल असो की इतर कोणतीही उत्पादने, त्यांच्या निर्यातीत विश्‍वासार्हता खूप महत्त्वाची असते. आणि ही विश्‍वासार्हता निर्यातीतील सातत्याने मिळविता येता. आपण शेतीमाल निर्यातवृद्धी त्यात सातत्याने ती मिळविली देखील होती. त्यामुळे जागतिक व्यापारात एक प्रमुख निर्यातदार देश अशी आपली ओळख निर्माण झाली होती.

परंतु मागील काही वर्षांपासून भात, गहू, साखर, कांदा अशा शेतीमालावर अचानकच आपण निर्यात निर्बंध, बंदी लादत असल्याने आपली जागतिक व्यापार विश्‍वासार्हता कमी झाली आहे. आपल्याकडून शेतीमाल आयात करणाऱ्या देशांनी इतर पर्यायी देश शोधून त्यांच्याकडून ते शेतीमालाची आयात आता करू लागले आहेत. शेतीमाल निर्यातवृद्धीसाठी वेगवेगळ्या देशांचा शोध घेणे अपेक्षित असताना आपण मात्र एकएक देश निर्यातीपासून तोडत आहोत.

अनेकदा निर्यात निर्बंध लादण्यासाठी केंद्र सरकारकडून चुकीच्या माहितीचा आधार घेतला जातो. त्याही पुढील बाब म्हणजे ग्राहकहितापोटी किरकोळ बाजारात शेतीमालाचे दर वाढू नयेत म्हणून अनेकदा निर्यातबंदी लादली जाते. अशा प्रकारच्या निर्यातबंदीने शेतकऱ्यांच्या पातळीवरील (घाऊक बाजार) शेतीमालाचे दर पडतात.

परंतु ग्राहक पातळीवरील (किरकोळ बाजार) दरावर मात्र काहीही परिणाम होताना दिसत नाही. अर्थात, निर्यातबंदीचा त्यांचा हेतू साध्य होत नाही, यात नुकसान मात्र शेतकऱ्यांचे होते. असे अनेकदा घडलेले असताना त्यातून केंद्र सरकार काहीही धडा न घेता निर्यात बंदीचे निर्णय या देशावर वारंवार लादते आहे. एकीकडे अधिक निर्यातीची संभावना असलेल्या २० शेतीमालाच्या निर्यातवृद्धीसाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे, असे दाखवायचे आणि दुसरीकडे त्यास विसंगत धोरणांचा अवलंब सातत्याने करीत राहायचे. अशा प्रकारच्या दुहेरी नीतीने या देशात शेतीमाल निर्यातीचा खेळखंडोबा होतोय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com