Monsoon Impact: जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे संकट संपल्यात जमा आहे, असे मानणे वास्तवाला धरून नाही. .महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे एकूण पावसाची सरासरी बऱ्यापैकी भरून निघाल्याचे चित्र उभे राहिले. वरकरणी ही दिलासादायक बाब वाटत असली, तरी या सरासरीच्या आकड्यांमागे लपलेले वास्तव अधिक चिंताजनक आहे. कारण राज्याचा जवळपास अर्धा भाग अजूनही पावसासाठी तहानलेलाच आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे..Monsoon Rain: पाऊस, पाणी अन् पिके .म्हणजे राज्याची पावसाची सरासरी समाधानकारक असली, तरी त्याचे वितरण अत्यंत विषम आहे. मॉन्सूनचे यश केवळ राज्याच्या सरासरी पर्जन्यमानावर मोजता येत नाही. पाऊस कुठे, किती आणि कधी पडतो, यावर शेतीचे भवितव्य ठरत असते. एकीकडे अतिवष्टी होत असताना दुसरीकडे कमी पावसाच्या प्रदेशात मात्र पेरण्या रखडल्याचे चित्र दिसते. राज्यात पूर आणि दुष्काळ एकाच वेळी अनुभवण्याची वेळ ही हवामान बदलाच्या नव्या वास्तवाची जाणीव करून देते..यंदा मे महिन्यापासूनच ‘एल निनो’ हा घटक चर्चेत राहिला. विविध हवामान संस्थांनी यंदाच्या हंगामात एल निनोचा मोठा प्रभाव असण्याची भाकिते वर्तविली होती. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे हे अंदाज खरे ठरण्याची चिन्हे दिसू लागली. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागांत चांगला पाऊस झाल्याने एल निनोचा धोका टळल्याचे वातावरण तयार होऊ लागले आहे. प्रत्यक्षात हवामानशास्त्र तसे सांगत नाही. एल निनोचा प्रभाव संपूर्ण मॉन्सून हंगामभर जाणवत राहतो..जून महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा ३९.८ टक्के कमी पाऊसमानाची नोंद झाली. त्यातच जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला. मात्र जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत पश्चिम किनारपट्टीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे देशातील पावसाची तूट कमी होत १५.२ टक्क्यांवर आली. मॉन्सूनमध्ये आता खंड पडण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत ही तूट पुन्हा वाढू शकते, असे हवामान विभागाच्या तज्ज्ञाने म्हटले आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील मुसळधार पाऊस हा संकट संपल्याचा पुरावा ठरत नाही..Weekly Weather: यंदाचा मॉन्सून उशिरा का?.हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजानुसार नऊ जुलैनंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर लक्षणीय कमी होण्याची शक्यता आहे आणि ही परिस्थिती पुढील दहा-बारा दिवस टिकू शकते. जुलैच्या उत्तरार्धात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात तापमानात वाढ होण्याचाही अंदाज आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसू शकतो. खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या पिकांना या टप्प्यावर सलग आर्द्रतेची गरज असते..सुरुवातीला पाऊस पडून नंतर दीर्घ खंड पडला तर उगवण, वाढ आणि उत्पादन यावर परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या सुरूवातीला झालेल्या पावसाने निश्चितच दिलासा मिळाला असला तरी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मॉन्सून कसा वागतो, ही चिंता अजून कायम आहे. दुर्दैवाने, आपल्या व्यवस्थेला सरासरीच्या आकड्यांत समाधान मानण्याची सवय लागली आहे. राज्याचा पाऊस नॉर्मल म्हणजे सरासरीइतका झाला की संकट टळल्याचा समज करून घेतला जातो. प्रत्यक्षात जिल्हानिहाय आणि पाणलोट क्षेत्रनिहाय नियोजनाची गरज आहे. .ज्या भागात तूट आहे तेथे पाणी, चारा आणि पर्यायी पिकांसाठी आतापासून तयारी करावी लागेल. हवामान बदलाच्या युगात ‘सरासरी’ हा शब्द दिशाभूल करणारा ठरत आहे. महाराष्ट्राला आता सरासरी पाऊस केंद्रस्थानी ठेवून नव्हे, तर पावसाच्या विषम वितरणाशी सामना करण्याची तयारी ठेऊन नियोजन करावे लागेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.