Onion Rate : मी कांदा बोलतोय...

एरवी लोकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा बोलणार म्हटल्यावर तुमच्या डोक्यात विचारांचे चक्रीवादळ सुरू होणे साहजिकच आहे. पण वाडवडील म्हणतात ना, बोलणाऱ्यांचे कुळीथ विकले जातात आणि न बोलणाऱ्यांचे गहू पण विकले जात नाहीत. म्हणून मी बोलायला आलोय.
Onion Rate
Onion Rate Agrowon
Published on
Updated on

माझं वय आज दहा महिन्यांचं असलं तरी माझं अस्तित्व शेकडो वर्षांपासूनचे आहे. फरक एवढाच की पूर्वी मला जास्त दिवस जवळ ठेवण्याची व्यवस्था माझ्या बापाकडे (कांदा उत्पादकाकडे) नव्हती. त्यामुळे तो मला उशापाशी ठेवायला घाबरायचा. पटकन येईल त्या भावात विकून मोकळा व्हायचा. पण आज माझा बाप मला उरावर घेऊन बसलाय. अक्षरशः छाती दबतेय त्याची! तरी आज ना उद्या कांद्याबाबत शासनाचे धोरण बदलेल आणि माझ्या बापाला माझ्यामुळे अपेक्षित दोन पैसे भेटतील अशी खोटी आशा आहेच.

Onion Rate
Onion Export : कांदानिर्यात शुल्क कमी करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव द्या

कारण सत्ताधाऱ्यांनी खोटी आश्वासने खरी करून सांगितलीत. कधी वीजपुरवठा बंद, कधी खतांचा तुटवडा, कधी उळ्याच्या किमती वाढल्या, कधी बोगस बियाणांनी थोबाडीत मारली. कधी धुक्याने करपा, कधी कीडनाशकांनी वाट लावली. कधी मजुराने लायकी काढली तर कधी वळव्याच्या पावसाने धुतलं. पण शेती निसर्गाचा जुगार आहे अशी म्हण डोक्यात भिनलेल्या माझ्या बापाने मायचं मंगळसूत्र गहाण ठेवलं. आणि परिस्थितीशी दोन हात करत मला लालबुंद रंगातच जन्माला घातलं.

जन्म झाल्या झाल्या या वर्षी कांद्याचं विक्रमी उत्पादन झालंय आणि यामुळे बाजारभाव लवकर वाढणार नाहीत अशी राजकारण्यांनी मीडियामार्फत पेरलेल्या बातम्या कानावर आल्या. तेव्हाच वाटलं स्वतःच्या पायावर उभे राहण्याआधीच माझे पाय कापण्याचं काम या दळभद्री राजकारण्यांनी केलं. पण माझ्या बापाने गेल्या कित्येक वर्षांत माझ्यामुळे सरकार पाडल्याचे मला ज्ञात असल्याने मी पण धीराने बापाने बनवलेल्या चाळीत जाऊन निवांत पडलो. आज भाव वाढेल, उद्या भाव‌ वाढेल, मला परदेशात जायला मिळेल आणि माझ्या बापाला निदान घामाचा दाम दिल्याच्या आनंदात मी विदेशवारी करेल अशी स्वप्नं पाहत होतो. पण शासनाच्या धोरणांनी माझा पासपोर्ट तयार होणार नाही.

Onion Rate
Onion Rate : ‘नाफेड’मार्फत दोन लाख टन कांदा खरेदी करा

मला व्हिसा मिळणार नाही. आणि मिळाला तरी बाहेर देशात जायची संधी मिळणार नाही याची व्यवस्था केली. इतकं कमी की काय म्हणून इतर देशांतल्या कांद्याला आयात करण्याची धमकी पण दिली. यावर कळस करताना मला घेणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गोडावून वर छापेमारी, निर्यातबंदी, निर्यातमूल्यात वाढ या गोष्टींची भेट दिली. आणि बाजारभाव स्थिर कसे राहतील याची काळजी घेतली. कमवणाऱ्यांपेक्षा खाणारे जास्त आहेत याचा हिशेब ठेवणारे सरकार जगाचा पोशिंदा म्हणून गौरव करणाऱ्या माझ्या शेतकरी बापाला कधी हिशेबात पकडेल माहीत नाही. पण माझा बाप येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भामट्यांना आणि नतद्रष्ट्या राजकारण्यांना जागा दाखवेल एवढं नक्की!

आज माझं आयुष्य शेवटच्या टप्प्यात आलंय, चाळींमध्ये जखमांमधून पू वाहवा तसा माझा रस गळून पडतोय. माझी लालबुंद त्वचा सरकारच्या काळ्या धोरणांमुळे काळीकुट्ट झालीय. महागाईचे चटके बसून बसून माझी कातडी सोलून मी नग्न झालोय. मार्केटमध्ये वाढणाऱ्या आवकेमुळे माझ्या अब्रूचे धिंडवडे रोजच निघताना समाज बघतोय. तरी निर्लज्ज व्यवस्थेचे माझ्याकडे लक्ष जात नाही. ज्या राज्यकर्त्यांच्या हातात मला न्याय देण्याचे काम आहे त्यातल्या प्रत्येकाला माझ्या बापानेच मतदान दिलंय.

Onion Rate
Onion Rate : नाफेड कांदा दराला आधार देईल का?

त्यातले बहुतेक माझ्या शेतकरी बापाच्या औलादी आहेत हे सांगण्याची लाज वाटते. मला न्याय मिळावा म्हणून माझ्या बापाच्या नावाने असलेल्या वेगवेगळ्या संघटना बाजारभाव वाढावा या एकमात्र अजेंड्यावर माझ्यासाठी एकत्र आहेत ही बाब माझ्यासाठी आनंदाची असली तरी या संघटनांना आमचे शेतकरी वंशजच मदत करायला पुढे येत नाहीत. अशा परिस्थितीत मी कुणाकडून न्यायाची अपेक्षा करावी. त्यामुळे माझ्या बापाला मदत न करणारे राजकारणी आणि माझे बाजारभाव वाढले म्हणून महागाईवाढीच्या बोंबा ठोकणारे शहरवासीयांना माझी विनंती आहे.

माझा बाप जगला तर तुमच्या शहरातले दिवाळी दसरे साजरे होतील. कधी वीजमाफी देऊ, कधी सरसकट कर्जमाफी देऊ, कधी शिक्षण मोफत देऊ, कधी आरोग्य मोफत देऊ, अशा घोषणा करून माझ्या पिचलेल्या बापाला वेड्यात काढण्यापेक्षा आणि भीक देण्यापेक्षा माझ्या बापाच्या कष्टाला हक्काचे दाम द्या. माझी मूलभूत आधारभूत किंमत द्या. आणि असेल हिंमत तर मला हमीभाव द्या. मग माझा बाप या जगाचा बाप आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज पडणार नाही.

आज माझं अस्तित्व संपत असलं तरी माझ्या बापामध्ये जगाचा पोशिंदा म्हणून लढण्याची आणि जिंकण्याची वृत्ती आहे. फक्त एवढीच अपेक्षा आहे की माझ्या बापाशी खिलाडूवृत्तीने खेळ खेळा. तुमच्या बहुमतात माझ्या बापाचे एक मत आहे. तुमच्या खुर्चीला माझ्या बापाचा एक पाय आहे. तुमच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या पदाला माझ्या बापाची मदत आहे. तुमच्या असण्याला माझ्या बापाचा आशीर्वाद आहे. वर्षानुवर्षे कधी विजेसाठी, कधी भाववाढीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या बापाने कित्येक वेळा जेलवारी केली. उपोषणे केली. तरी तुम्हाला कीव आली नाही.

आमच्या मागण्या समजून न घेता तुम्ही नाफेडकडून कांदा खरेदी सुरू केली. खरेदी सुरू करताना कोणता आणि किती व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरेदी करतोय का? तुम्ही ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना नाफेडने ठरवलेल्या दरात कांदा खरेदीसाठी प्रोत्साहन देताय त्या कंपन्या खरंच तुम्ही ठरवलेला दर देतात का? कांदा विक्री झाल्यानंतर त्याचे पक्के बील माझ्या बापाला मिळतंय का? ज्या कांदाचाळी नाफेडने शेतकऱ्यांकडून भाड्याने घेतल्या होत्या त्यांचे भाडे शेतकऱ्यांना मिळाले काय? कधीकधी तर वाटतंय तुम्ही व्यापारी वर्गाची परतफेड करायला नाफेड सुरू केलीयं की माझ्या बापाची हाउस फेडायला सुरू केली?

योजना कागदावरच ठीक वाटतात पण प्रत्यक्षात अंमलबजावणी होते का याची जरा बांधावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करा. माझ्या बापासाठी सुरू केलेली नाफेडची कांदा खरेदी शेतकरी उत्पादक नामक कंपन्यांच्या आणि दलालांच्या फायद्यासाठी किती याचा अंदाज तुम्हांला येईल. तेव्हा तुमच्या डोळ्यावर बांधलेली परोपकाराची पट्टी सुटेल आणि आपण नेमके काय करतो याचा अनुभव याची देही याची डोळा येईल. योजना फक्त राबवण्यासाठी आणि राबवणाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी असतात. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नसतात हे सिद्ध होईल.

एकीकडे आज माझ्या बापाकडून तुम्हाला एका मताशिवाय दुसरा फायदा नाही. दुसरीकडे विकास कामांमध्ये मिळणारा मलिदा तुम्हांला मिळतोय. म्हणून तुम्ही पुढाऱ्यांनी नेत्यांनी विकासकामे जरूर करावीत पण वर्षानुवर्षे ढिली होत जाणारी बाजारू व्यवस्था सुधारेल, शेतकऱ्यांना मदत होईल म्हणून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून एखाद्या शिष्टमंडळात शेतकरी म्हणून समाविष्ट होऊन पंतप्रधान, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना निवेदन देण्याची आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची पण तयारी ठेवावी. नाहीतर फुलांच्या सत्काराऐवजी कांद्याच्या माळा घेऊन सत्कार करायला आणि जाब विचारायला माझा स्वाभिमानी बाप आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्यासाठी वेळीच योग्य धोरण ठरवा. नाहीतर माझा शेतकरी बाप तुमच्या आयुष्यातील ध्येय धोरणांचा वांदा केल्याशिवाय राहणार नाही.

(लेखक कांदा उत्पादक शेतकरी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com