
Animal Research Center : दिनांक २१ मार्च २३ रोजी महसूल-पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrisna Vikhe Patil) पाटील यांनी देशातील पहिले पशू विज्ञान केंद्र सावळी विहीर (अहमदनगर) येथे उभारणार असल्याची घोषणा केली.
सोबत पशुवैद्यकीय महाविद्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय, संशोधन केंद्रासह सुरू करणार असल्याच्या घोषणाही केल्या.
देशातील पहिल्या पशुविज्ञान केंद्राचा शुभारंभ महाराष्ट्रात होतोय त्याचे स्वागतच करायला हवे. देशात १९६०च्या दशकात अन्नधान्याच्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करताना भारतीय कृषी संशोधन परिषदेपुढे (आयसीएआर) एक मोठे आव्हान होते.
सर्व कृषी शास्त्रज्ञ कठोर परिश्रमाद्वारे, कृषी व संलग्न विभागांनी संशोधन करून नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याला म्हणावे इतके यश मिळत नव्हते. त्यामुळे ज्या वेगाने कृषी क्षेत्रात प्रगती होणे अपेक्षित होते ती होत नव्हती.
त्यासाठी डॉ. मनमोहनसिंग मेहता कमिटीने केलेल्या शिफारशीनुसार १९७४ मध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला पथदर्शक प्रकल्प म्हणून तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोइमतूरच्या आधिपत्याखाली पॉंडिचेरी येथे १९७४ मध्ये देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आले.
आज देशात वेगवेगळ्या कृषी, पशू विद्यापीठे, आयसीएआर संस्था, शासकीय-निमशासकीय कृषी संबंधित संस्थांद्वारे संचालित एकूण ७३२ कृषी विज्ञान केंद्रे आहेत.
त्यांपैकी महाराष्ट्रात ५० अशी केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांना केंद्र शासनाकडून १०० टक्के अर्थ पुरवठा केला जातो. कामकाजाचा विचार केला तर कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार करणे, शेतकरी-कृषी अधिकारी-कर्मचारी यांच्यात कौशल्य वाढवणे,
जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सार्वजनिक खाजगी आणि स्वयंसेवी क्षेत्रातील उपक्रमांना मदत करण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व संशोधन केंद्र म्हणून काम करणे, शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणे, सल्ला देणे आदी कामासह पशुसंवर्धन विषयक काही किरकोळ कार्यक्रम राबवले जातात.
महाराष्ट्रात सध्या पशुसंवर्धन विषयक विस्तार कामाबाबत काय परिस्थिती आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
प्रत्येक पशुसंवर्धन विभाग, सेवाभावी संस्था आपापल्या परीने इतर सर्व कामकाज सांभाळून विस्तार, प्रशिक्षण, कौशल्यवृद्धी, व नवनवीन तंत्रज्ञान पशुपालकापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत.
अजून चांगले आणि दृश्य परिणाम दिसण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या धर्तीवर ज्याप्रमाणे पशू विज्ञान केंद्र सुरू होत आहेत, अशा अनेक संस्थांची गरज आज राज्याला आहे.
सध्या महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत तीन कृषी विज्ञान केंद्र आहेत. विद्यापीठ पशुसंवर्धनाशी निगडित पण संस्थांची नावे कृषीशी संबंधित सर्व नियम, कार्यवाही केव्हीके सारखीच आहे. त्यामुळे कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचा गोंधळ होतो. प्रशासकीय बाबी, अनुदान खर्ची टाकताना अडचणी येतात.
विद्यापीठाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्रांची स्थापना करताना तशी योजना केंद्राकडे नव्हती. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्र याच नावाने या संस्था सुरू झाल्या. परंतु आता या केंद्रांचे स्वरूप बदलून पशुविज्ञान केंद्र व्हावे त्यासाठी पाठपुरावा केला जातोय आणि विद्यापीठाने देखील तसा प्रस्ताव दिला आहे.
अशा प्रकारचा निर्णय झाला तर राज्यासह देशात कृषी विज्ञान केंद्राच्या धरतीवर पशू विज्ञान केंद्र सुरू करण्याचा मान महाराष्ट्राला मिळेल.
पशुसंवर्धन विभागाला त्यातून प्रबोधन आणि प्रशिक्षणाद्वारे चांगले तंत्रज्ञान पशुपालकापर्यंत पोहोचविता येईल. केंद्र सरकारने पशुसंवर्धन विभागाचे महत्त्व ओळखून स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. भरीव तरतूद देखील करीत आहे.
तेव्हा भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्था (आयव्हीआरआय) जी सध्या आयसीएआरच्या अधिनस्त काम करते ती जर स्वतंत्र केली तर अनेक बाबींना न्याय देताना अडचणी येणार नाहीत. याचाही विचार सुज्ञ संस्था, लोकप्रतिनिधी व संबंधित संघटनांनी करायला हवा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.