Maharudra Mangnale: शहरापेक्षा गावात चांगलं आयुष्य जगता येतं?

मला नेहमीच प्रश्न पडतो,हे वास मलाच येतात का? इतर लोक एवढे अस्वस्थ झालेले दिसत नाहीत मला .
Maharudra Mangnale: शहरापेक्षा गावात चांगलं आयुष्य जगता येतं?
Agrowon

- महारुद्र मंगनाळे

स्वच्छ हवा, प्रसन्न, आल्हाददायी वातावरण असणारं शहर शोधतोय मी! असं कोणतं शहर आहे तुमच्या अनुभवातलं! तीन दिवसातच एखाद्या जेलमध्ये कोंडल्यागत अवस्था झालीय, माझी या शहरात! रस्त्याने पायी निघालो की,सगळीकडं गटारीच्या घाणीचे उग्र वास येतात.धुळीसाठी गॉगल आणि मास्क वापरता येतो. पण हे वास टळत नाहीत. श्वास घ्यायला त्रास होतो. अस्वस्थ होऊन जातो. त्यातही घरात,मुक्तरंग मध्ये असलो तर ठिक असतो.

मला नेहमीच प्रश्न पडतो,हे वास मलाच येतात का? इतर लोक एवढे अस्वस्थ झालेले दिसत नाहीत मला .त्यांना वासाची सवय झालीय की, वासच येत नाहीत? इथं आलो की,नसलेली सर्दी सुरू होते. डोळे जळजळतात. घशात खरखर सुरू होते. कितीही प्रयत्न केला तरी, या शहरातली माझी सकाळ उत्साही होत नाही!

मुक्काम करणं आवश्यकच असतं,तेव्हाच मी थांबतो..तरीही हे टाळता यावं असं वाटतं..पण मुक्तरंग मधील काम वेगाने संपवायचं तर,लातूरात मुक्काम करणं अटळ ठरतं. मुक्तरंग मध्ये असतो तेव्हा मात्र फ्रेश,उत्साही असतो. पहिल्या मजल्यावर जागा असल्याने, रस्त्यावरील वर्दळीचा तसा थेट त्रास होत नाही. धूळ व आवाज माझ्यापर्यंत पोचत नाहीत. शिवाय ते काम माझ्या आवडीचं असल्याने, मी रमून जातो.

Maharudra Mangnale: शहरापेक्षा गावात चांगलं आयुष्य जगता येतं?
Rural Story : नेकी कर आणि दर्यात टाक

तिथून बाहेर पडलो की,अस्वस्थता सुरू होते.तरीही सध्या बाहेरचं जेवण टाळतोय. अपवाद सोडला तर शहरातील हॉटेलमध्ये स्वच्छता नाही. त्यामुळं जेवायला कुठं जायचं याचा नीट विचार करावा लागतो. हर्षच्या घरी जेवायची सोय आहे. रात्री भात आणि वरण हा आमचा आवडता मेनू असतो.त्यातही वरणाला मी फोडणी देत असल्याने, आवडीची चव मिळते.या चवीला घरातील सगळ्यांनीच पसंदी दिलीय.बेअर ग्रिल्सचा मँन वर्सेस वाईल्ड हा शो बघत बघत जेवण करायचं आणि झोपायचं. मला मच्छरदाणीत झोपायची सवय आहे. इथं ती सोय नाही. पंखा आणि ऑल आऊट लावून पांघरूण घेऊन झोपतो.तरीही डास झोपमोड करतातच. इथंही भल्या पहाटे उठतो पण बाहेर फिरायला जायची इच्छा होत नाही. घरीच थोडासा व्यायाम करतो.काळी कॉफी घेऊन वाचत बसतो. कधीतरी इडली सांबर खायला बाहेर जायचो.पण तो अनुभवही चांगला नाही. सांबर एवढं भंगार बनवतात की,चमचाभर खाववत नाही. चटणी कधी बरी असते,कधी खारट.त्यामुळं तोही उत्साह संपलाय.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंठाळेनगरला बरोबर साडेआठ वाजता मीरा मावशी भाकरी करायला येतात.मी तयारीत असतो.फुगलेली गरमागरम भाकरी ताटात पडली की,तिचा पाप्रूदा काढून वर भरपूर तूप टाकायचं.त्यावर शेंगदाणा आणि जवसाची चटणी टाकून ती सगळ्या भाकरीला व्यवस्थित लावायची.तिचा रोल बनवायचा.सोबत ईडलिबूचं लोणचं.. एक एक घास निवांत चावत गिळायचा...या चवीला तोड नाही. सकाळी कुठल्याही नाष्त्यापेक्षा हे खाणं मला मनापासून आवडतं.आज दिड भाकरी खाल्ली. तृप्त झालो आणि फ्रेशही!

गेल्या अनेक वर्षांपासून मी तळलेले पदार्थ खात नाही. महिना-दोन महिन्याला पकौड्यांचा अपवाद. १९९५ पासून बाहेरचा दुधाचा, खव्याचा कसलाच पदार्थ अपवादानेसुध्दा खात नाही.बाहेरच्या दुधावर माझा विश्वास नाही आणि तसंही माझ्या पोटाला दूध पचत नाही. त्यामुळं दिवाळी वा कुठल्याही सणाचं कौडकौतूक मला नाही. चिवडा,शिरा,चिक्की,विविध प्रकारचे तुपातले लाडू हे बारमाही आमच्याकडं बनतं.त्यामुळं सण ही बाब आमच्याकडं दखलपात्र नाही.भाकरी सणावारालाही बनतेच..हे सांगण्याचा हेतू हा आहे की, याचा प्रकृतीशी संबंध आहे.दिवाळीला काहीबाही तळीव खाऊन खोकणारे मोठ्या संख्येने दिसतात. याच काळात दवाखान्यातली गर्दी वाढते. आपल्या पोटाला काय पचतं,काय खावं आणि काय खाऊ नये,हे न कळणारे लोक अडाणीच म्हणावे लागतील....

ज्यांना स्वच्छतेचं,प्रदुषणाचं भान नाही, त्यांना दिवाळीच्या प्रसन्नतेचं, प्रकाशाचं महत्त्व कसं कळणार? ते दिवाळी नावाचं अवडंबर साजरं करून,इतरांना भरपूर त्रासदायक होणारं वर्तन करून..वर Happy Diwali म्हणणार!

आम्ही रुद्रा हटवर कायम दिवाळी जगतो. इथं दोन दिवस राहिलो की,मला रुद्रा हटच्या जगण्याचं मोल कळतं...मी या शहरातल्या कोणाही करोडपतीपेक्षा चांगलं आयुष्य जगतो,हे नक्की!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com