
इंद्रजीत भालेराव
परवा कोल्हापूरकडून येताना मंगळवेढ्याजवळ आलो आणि इंद्रजीतची आठवण झाली. त्याला आधी फोन केला नाही, ऐनवेळी करावा की नाही अशा संभ्रमात मी होतो. जेवायला कुठे थांबूयात असा विचार करत होतो. तेवढ्यात कोल्हापूरकडून सोलापूरकडे येताना मंगळवेढा ओलांडलं आणि रानात 'सुगरण' नावाचं एक सुंदर हॉटेल दिसलं.
थांबलो. आत गेलो. हॉटेल सुंदरच होतं. निसर्गात निसर्गासारखं सजवलेलं. जेवणाची ऑर्डर दिली आणि वाटलं एकदा संधी घेऊयात, असेल इंद्रजीत तर त्याला यायला हे हॉटेल म्हणजे काही फार दूर नाही. नसेल तर निदान त्याच्याकडे निरोप तरी जाईल. फोन केला आणि इंद्रजीत म्हणाला, मी इथेच आहे. म्हटलं, वाहन असेल तर ये, आपण सोबत जेवण करूयात. तो म्हणाला, येतो.
इंद्रजीत आला आणि सोबत माझे आवडते चित्रकार श्रीधर अंभोरेही आले. मला विलक्षण आनंद झाला. म्हटलं केवळ इंद्रजीतची भेट व्हावी म्हणून आपण संधी साधली आणि ती सुवर्णसंधी ठरली. श्रीधर अंभोरे सरांचीही भेट झाली. पाच-सहा महिन्यापूर्वीच त्यांच्या श्रीधररेषा या पुस्तकावर मी माझ्या फेसबुक वर नोंद लिहिलेली होती.
श्रीधर अंभोरे यांच्या रेखाटणांचं महावीर जोंधळे यांनी संपादित केलेलं एक सुंदर पुस्तक इंद्रजीत घुले या मंगळवेढ्याच्या मित्रानेच त्याच्या शब्दशिवार प्रकाशाच्या वतीने प्रकाशित केलेले होते.
आणि आज साक्षात सरांची भेट होत होती. मध्ये एकदा भेट झाली होती, पण खूपच घाईत. त्या पार्श्वभूमीवर ही निवांत भेट खूप आनंददायी ठरली. खूप छान गप्पा मारत आम्ही जेवलो. चित्रांवर, कवितेवर, साहित्यावर, वांङ्मयव्यवहारावर छान चर्चा झाली.
इंद्रजीत हा गेल्या अनेक दिवसापासून 'शब्दशिवार' नावाचा एक सुंदर दिवाळी अंक प्रकाशित करत असतो. मागच्या वर्षी महाराष्ट्रात प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या दिवाळी अंकांची नोंद लोकसत्ताच्या रविवार पुरवणीत घेण्यात आली होती. त्यात इंद्रजीतने संपादित केलेला शब्दशिवार हा दिवाळी अंक ठळकपणे समोर आलेला होता.
खूप मेहनत घेऊन, वेगळे विषय, वेगळे लेखक घेऊन इंद्रजीत हा अंक तयार करतो. या अंकाची संपूर्ण सजावट मुखपृष्ठापासून शेवटच्या पानापर्यंत श्रीधर अंभोरे करत असतात. त्यासाठी दिवाळीपूर्वी ते मंगळवेढ्याला इंद्रजीतकडे येऊन राहतात.
हरफन मौला असा हा माणूस. साहित्य आणि चित्रांवर जीव असलेला. चित्रांचा व्यवसाय न करणारा थोर चित्रकार. ठरवलं असतं तर पुण्यामुंबईच्या सर्व प्रमुख दिवाळी अंकांनी त्यांना कामं दिली असती. रात्रंदिवस ती कामं संपली नसती. पैसाही भरपूर मिळवता आला असता.
पण हा हरफण मौला दुसऱ्या एका फकीराच्या नादी लागतो आणि ऐन दिवाळीच्या आधी इथे मंगळवेढ्यात येऊन शब्दशिवार दिवाळी अंकाची संपूर्ण सजावट करून मगच इथून जातो. त्या काळात हे दोन फकीर आपलं खाणं-पिणं, झोपणं विसरलेले असतात. रात्रंदिवस त्यांचा जीव गुंतलेला असतो तो दिवाळी अंकाच्या निर्मितीमध्ये.
श्रीधर अंभोरे यांना इंद्रजीतसोबत येताना पाहिलं आणि माझ्या एकदम डोक्यात आलं की अरे दिवाळी अंकाच्या तयारीचा मौसम सुरू आहे. इंद्रजीत गेल्या अनेक दिवसापासून हा दिवाळी अंक काढतो आणि शब्दशिवार नावाचं प्रकाशनही चालवतो. मागच्या काही वर्षात मराठीत प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या सामाजिक पुस्तकांपैकी बरीचशी पुस्तकं इंद्रजीतच्या शब्दशिवार प्रकाशानाच्या वतीने प्रकाशित झालेली आहेत.
आ. ह. साळुंखे यांचा गौरवग्रंथ 'आ. हं.' या नावाने इंद्रजीतने प्रकाशित केला. तो महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तऐवज म्हणून मान्यता पावला. गणपतराव देशमुख यांच्या स्मृती जागवणारा एक स्मृतीग्रंथही इंद्रजीतने नुकताच प्रकाशित केलेला आहे. रामदास फुटाणे यांच्यासारख्या कवीने पुण्यामुंबईचे कुठलेही प्रकाशक त्यांचे पुस्तक प्रकाशित करायला तयार असताना आपला नवा कवितासंग्रह इंद्रजीतला दिलेला आहे.
तोही नुकताच बाजारात आलेला आहे. विजय चोरमारे यांचं एक महत्त्वाचं पुस्तकही इंद्रजीतनं केलेलं आहे. संजय आवटे हे देखील शब्दशिवारशी जोडलेले आहेत. याशिवाय नव्याजुन्या अनेक लेखकांची पुस्तकं इंद्रजीत करत असतो. रणधीर शिंदे यांनी संपादित केलेलं एक पुस्तक सध्या इंद्रजीत करतो आहे.
मागच्या सहा महिन्यापूर्वी सांगोल्याला शहाजीबापू पाटील यांनी घेतलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या वेळी इंद्रजीत किशोर कदमची मुलाखत घेण्यासाठी येणार होता. नेमकं त्याच दिवशी इंद्रजीची आई गेली.
संमेलनाहून परतताना मी मुद्दाम इंद्रजीतला भेटून आलेलो होतो. इंद्रजीतची आई हा इंद्रजीतचा हळवा कोपरा होता. तोही आता नाहीसा झाला. त्यामुळे इंद्रजीत सावरतो की नाही अशी चिंता मला वाटली होती. पण तो हळूहळू सावरला आणि त्यानं छानपैकी स्वतःला कामात बुडवून घेतलं.
मंगळवेढ्यासारख्या छोट्याशा गावात इंद्रजीतनं एक सांस्कृतिक वातावरण तयार केलेलं आहे. इथली सगळी धनाढ्य माणसं इंद्रजीतवर प्रेम करतात. त्याला, त्याच्या प्रकाशनाला, दिवाळी अंकाला हवी ती मदत करतात. पण इंद्रजीत कधीही या थोरामोठ्यांचा दुरुपयोग करून घेत नाही.
बऱ्याचदा इंद्रजीतने या भागात माझे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. मी त्या भागात येणार असलो की, 'मला पूर्वकल्पना द्या सर एखादा कार्यक्रम आयोजित करतो,' असं तो म्हणत असतो. खरंतर कार्यक्रमाची अपेक्षा नसते. इंद्रजीतच्या भेटीची अपेक्षा असते. म्हणून पुष्कळ वेळा त्याच्या निमंत्रणाला न टाळता मी आवर्जून मंगळवेढ्याला गेलेलो आहे.
इंद्रजीत स्वतः चांगला कवी आहे. त्यानं ठरवलं असतं तर कवी म्हणूनही त्याला स्वतःचं भवितव्य निर्माण करता आलं असतं. पण त्यानं स्वतःच्या कवितेकडे दुर्लक्ष करून इतरांच्याच कवितेकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. रामदास फुटाणे यांच्या लोकप्रिय कवीसमूहात इंद्रजीत हमखास असतो. त्याच्या कवितेला दादही मिळत असते. इंद्रजीतच्या कवितेइतकंच रामदास फुटाणे इंद्रजीत या माणसावरही प्रेम करतात.
मागच्या वर्षी मी इंद्रजीतकडे गेलो तेव्हा इंद्रजीतच्या घरी इंद्रजीतच्या आईने केलेलं जेवण जेवलो होतो. त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या होत्या. व्यसनी नवरा, मुलांची कसलीच भवितव्य नसलेली स्थिती, यामुळे ही माऊली खचलेली होती. इंद्रजीतने कुठली तरी नोकरी केली असती, आयुष्यात स्थिर झाला असता तर बरं झालं असतं, असं या आईला वाटत होतं.
पण इंद्रजीत ठरला फकीर माणूस. तो कुठे एका ठिकाणी रमणं शक्यच नव्हतं. छोटा भाऊही असाच भणंग निघाला. त्यामुळे आई खचल्यासारख्या वाटत होत्या. त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांना पुष्कळ बोललो. परत आल्यावर त्यांच्यावर एक कविताही लिहिली होती. ती मी माझ्या फेसबुक मित्रांसाठी इथे टाकलीही होती. आणि अख्ख्या महाराष्ट्रातून तिला प्रचंड प्रतिसादही मिळालेला होता.
मराठीचा प्राध्यापक होण्याची सर्व शैक्षणिक योग्यता त्याच्याजवळ आहे. पण प्राध्यापक होणं हे कसं सोंगाचं होऊन बसलेलं आहे हे आपण सर्व जाणताच. अशा पार्श्वभूमीवर त्याच्या शिक्षणाचा, वाचनाचा तसा फारसा व्यावहारिक उपयोग नव्हताच. पण त्याने स्वतःला घडवण्यासाठी हे लेखन, वाचन केलेलं होतं. इंद्रजीत हा आपल्या हक्कासाठी कधीच जागृत नव्हता, नसतो. त्यामुळे नेकी कर आणि दर्यात टाक अशी त्याची अवस्था. म्हणून आतापर्यंतची त्याची सगळी नेकी व्यवहारात उपयोगाला येण्याऐवजी दर्यातच वाया गेलेली आहे.
इंद्रजीतच्या आईवर मी कविता लिहिली तेव्हा इंद्रजीत म्हणाला होता, मला माझ्या आईवर कविता लिहिता आली नाही ती तुम्ही लिहिली. खरंतर इंद्रजीतची आई काय आणि माझी आई काय, सारख्याच माऊल्या. त्यामुळे इंद्रजीतच्या आईवर कविता लिहिणं मला काही अवघड गेलं नाही.
आणि त्यानंतर सहा महिन्यांनी आई गेल्या. आई गेल्यानंतर इंद्रजीतला भेटलो होतोच. नंतर फोनवरून एक दोनदा बोललोही होतो. पण आज इंद्रजीतची भेट झाली आणि तो आता सामान्य स्थितीत आलेला पाहून मला खूप आनंद वाटला.
इंद्रजीत खूप जग, खूप यशस्वी हो आणि खूप मोठा हो. तुझ्यासोबत महाराष्ट्रातली खूप मोठी माणसं आहेत. कारण तुझं काम नेक आहे. त्यामुळे प्रत्येकाला तुझ्याकडे यावसं वाटतं. तुझी समाजाला गरज आहे हे तर तू सिद्ध केलेलं आहेसच. कधीतरी समाजाच्याही लक्षात येईल की या माणसाच्याही काही गरज आहेत त्यासाठी आपण उपयोगी पडलं पाहिजे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.