झुंजार म्हातारा आणि अजस्र मासा

वैभवाच्या शिखरावर पोचण्यापूर्वी हेमिंग्वेला जगण्यासाठी बरीच मगजमारी करावी लागली. कारखान्यात कामगार म्हणून तो राबला. काही काळ शेतीभातीत मजुरीसाठी घाम गाळला. निसर्गाचं गान त्याला शेतीनं शिकवलं. पत्रकारितेतही त्यानं हात मारून पाहिला. अमेरिकी लष्कराकडून तो पहिल्या महायुध्दात सामील झाला. रुग्णवाहिकेचा चालक बनून त्यानं अनेक जखमी सैनिकांचे प्राण वाचवले
old man
old man

अर्नेस्ट हेमिंग्वे हा अफाट आणि अचाट माणूस होता. खरं तर अरभाटच! त्याच्या बलदंड शरीरयष्टीत रेड्याची ताकद होती. काय केलं नाही त्यानं? दुनियेच्या छाताडावर उभं राहून जगण्याच्या विविध अंगांवर अक्षरशः राज्य केलं. उन्मत्तपणे शिंगं उगारून अनेक जीवनानुभव मदमस्तपणे अंगावर झेलले. साहित्य विश्वातले उत्तुंग आणि अखेरचे समजले जाणारे ‘नोबेल’ आणि ‘पुलित्झर’ पुरस्कार त्याच्या अल्मारित बंदिस्त झालेले असले तरी त्याला केवळ साहित्यात गती आणि रुची होती असं नाही. तो उत्तम दर्यासारंग होता. मच्छिमारीत त्याचा हात धरणारा कोणी सापडणे मुश्कील. कोणाही आडदांडाला लोळवणारा निष्णात मुष्टियोध्दाही होता तो. अट्टल शिकारी होता. श्वापदांना अंगावर घेवून खेळवून मारण्याचा शौक होता त्याला. चित्रकलेतही चांगली गती होती.

वैभवाच्या शिखरावर पोचण्यापूर्वी हेमिंग्वेला जगण्यासाठी बरीच मगजमारी करावी लागली. कारखान्यात कामगार म्हणून तो राबला. काही काळ शेतीभातीत मजुरीसाठी घाम गाळला. निसर्गाचं गान त्याला शेतीनं शिकवलं. पत्रकारितेतही त्यानं हात मारून पाहिला. अमेरिकी लष्कराकडून तो पहिल्या महायुध्दात सामील झाला. रुग्णवाहिकेचा चालक बनून त्यानं अनेक जखमी सैनिकांचे प्राण वाचवले. या काळात दोनदा जीवघेण्या विमान अपघातांतून वाचला. एकदा तर कवटीलाही तडा गेला. अंगावर शे-दीडशे जखमांचे व्रण घेऊनच तो युध्दाच्या खाईतून बाहेर पडला. नंतर त्यानं पॅरिसमध्ये लेखनकामाठी सुरू केली. या उमेदीच्या काळात दारिद्र्यच त्याच्या वाट्याला आलं. इतकं की, काही वेळा कबुतरांच्या मांसावर गुजराण करावी लागली. पण तो हटला नाही. आपल्यासारख्या ‘आराम छाये’त जगायला सोकावलेल्यांच्या दृष्टीनं त्याचा हा बेडरपणा हेवा वाटावा असाच. अनुभवांच्या या लोलकाचा प्रकाशवर्णपट त्याच्या लेखणीतून न पाझरता तरच नवल!

अजोड साहित्यिक म्हणून जगभर डंका दुमदुमू लागल्यावर हेमिंग्वे केवळ त्यालाच शोभेल अशा मिजाशीत राहू लागला. क्युबातल्या हवाना शहराजवळ त्यानं मोठी शेतीवाडी घेतली. तिथं केळीसह विविध फळबागा फुलवल्या. आयुष्याच्या धकाधकीत एकामागोमाग तब्बल चार लग्नं केली. पहिली तीन तुटली. चौथं त्याच्या अंतापर्यंत टिकलं. शेतीवाडीत मनोऱ्याची गढी बांधून तो लेखन करू लागला. पत्नीबरोबरच नऊ नोकर, बावन्न मांजरं, सोळा कुत्रे, दोनशे कबुतरं, तीन गाई असा खटाला घेऊन तो राहायचा. पेंटिग्ज, पुस्तकांची तर मोजदादच नाही. रात्रीचं लिखाण त्याला शिळंपाकं वाटायचं. पहाटेच त्याची लेखनसमाधी लागायची. लेखनसाधना इतकी पराकोटीची की एखाद्या पुस्तकाचा खर्डा सुधारून वीस-तीस वेळा टाईपरायटरवर बडवण्याचा त्याला कधीच कंटाळा आला नाही. ‘फेअरवेल टू आर्म्स’ या गाजलेल्या कादंबरीचा शेवट त्यानं एकोणचाळीस वेळा पुन्हा पुन्हा सुधारून लिहिला. साहजिकच असा हा लेखनअर्क अस्सलच उतरायचा. उतारवयात मानसिक संतुलन बिघडलेल्या अर्नेस्टनं डोक्याला बंदुकीची नळी भिडवून चाप ओढला. त्याच्या वडिलांनीही असाच जीवनत्याग केलेला. अशा मृत्यूचं त्याला नेहमी अप्रूप होतं. माणसाला हवं तेव्हा मरता आलं पाहिजे, तो त्याचा जन्मदत्त हक्क आहे, असं वाटायचं त्याला. त्यानं हट्टानं हा हक्क बजावला.

डोळे मिटण्यापूर्वी डोळसपणानं हवं तसं जगता यायला हवं. ऐऱ्यागैऱ्यांचं ते काम नव्हे. मनमौजी जगण्याची एक किंमत असते. अस्सल जीवनानुभवासाठी ती चुकवण्याची हेमिंग्वेची सदोदीत तयारी असायची. संसारी माणसासारखी पैशाची तमा त्यानं बाळगली नाही. तारुण्यात भूकेकंगाली अनुभवलेल्या या साहित्यिकाच्या बॅंक खात्यात नंतर बक्कळ पैसा आला. ही संपत्ती उधळायलाही तो कमी पडला नाही. एकूण काय तर, ‘सेटल’ होण्याचा सोस न बाळगता चांगलं रसरशीत आयुष्य जगला तो. आपल्या कानावरून हेमिंग्वेचं नाव गेलेलं असतं. त्याच्या साहित्याविषयी मात्र वरवरची माहिती असते. त्याच्या लिखाणात जशा युध्दाच्या पडछाया होत्या, तशाच्या प्रेमाच्या शीतल सावल्याही होत्या. मानवी जगण्याला असलेली प्रेमाची किनार तो कधी विसरला नाही. त्यानं विपुल लिखाण केलं. ‘दि सन आल्सो रायझेस’, ‘ए फेअरवेल टू आर्म्स’, ‘फॉर हूम द बेल टोल्स’, ‘दि ओल्ड मॅन अँड दि सी’ या त्याच्या साहित्यकृती जगभर गाजल्या. अनेक भाषांत त्या अनुवादित झाल्या. काहींवर दोन-दोन चित्रपट निघाले. तेही गाजले. सर्वांत महत्वाची आणि जगभर गाजलेली कादंबरी ‘दि ओल्ड मॅन अँड दि सी’. तिला १९५२ साली ‘पुलित्झर’ मिळालं. पुढे दोनच वर्षांनी एकूण साहित्य सेवेबद्दल हेमिंग्वेचं नाव ‘नोबेल' वर कोरलं गेलं. एका लेखकाला यापरता आणखी कोणता बहुमान हवा?

‘दि ओल्ड मॅन ॲन्ड दि सी’ ही अजरामर कादंबरी प्रस्तुत लेखाची विषयवस्तू. त्याआधी हेमिंग्वेवर लिहिण्याचा मोह टाळता येण्यासारखा नव्हता, म्हणून नमनालाच हे घडाभर तेल. अर्थात ही कादंबरी त्याच्याच अनुभवाचा एक कवडसा असल्यानं त्याच्या चरितकहाणीला वळसा घालून पुढं जाताच येणार नव्हतं.

माणूसजात तशी चिवट. माणसाला उध्वस्त करता येईल एखाद्यावेळी, पण त्याला पराभूत करणं कठीण, असं हेमिंग्वेचं मत. त्याच्या या मताचं साहित्यिक रूपांतरण म्हणजे ‘दि ओल्ड मॅन ॲन्ड दि सी’. जिद्द, चिकाटी आणि विजिगीषू वृत्तीचं अनोखं दर्शन घडवणारी कादंबरी म्हणून तिला जगभरातल्या साहित्य रसिकांनी डोक्यावर उचलून धरलं, समीक्षकांनीही गौरवलं.

गोष्ट तशी साधीच, एका म्हाताऱ्याच्या मासेमारीच्या पराक्रमाची! क्युबातल्या हवानाजवळ एका समुद्रकाठच्या खेड्यात राहणारा सांतियागो हा कित्येक उन्हाळे-पावसाळे पाहिलेला गरीब कोळी. हा एकटा जीव सदाशिव, झापाच्या झोपडीत राहायचा. तो दररोज दर्यात होडी लोटायचा, पण वयोमानानुसार हल्ली मासे मिळेनासे झाले होते. सलग ८४ दिवस गळाला एकही मासा न लागल्याने त्या छोट्या खेड्यातील टावरणांत (बार) जमणाऱ्या कोळ्यांच्यादृष्टीने तो चेष्टेचा विषय बनलेला. बारा-चौदा वर्षांचा मनोलिन हा पोऱ्या त्याचा शागीर्द. या म्हाताऱ्याकडून तो मासेमारीतल्या खूप गोष्टी शिकला, त्यामुळं रक्ताचं नातं नसलं तरी त्याचा म्हाताऱ्यावर जीव होता. मासेमारीत सलग अपयशी ठरू लागल्यानं पोराच्या बापानं त्याला दुसऱ्या होडीवर मासेमारीसाठी जायला सांगितलेलं. पोरगा नाखुशीनंच दुसऱ्या कोळ्यांबरोबर मासेमारीला जात असला तरी सकाळ-संध्याकाळ तो म्हाताऱ्याच्याच आगेमागे करायचा. त्याला हवं नको पाहायचा. गावातील हॉटेलातून त्याला खायला काही पदार्थ, बीअर, गरमागरम कॉफी आणून द्यायचा. होडीतलं मासेमारीचं साहित्य झोपडीपर्यंत पोचवायला मदत करायचा. हा म्हाताराच त्याचं भावविश्व होतं, त्याचा हीरो होता.

एके दिवशी म्हातारा नशीब आजमावण्यासाठी खोल समुद्रात मासेमारीला जातो. दीर्घकाळचा माशांचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार करून होडी हाकारलेल्या म्हाताऱ्याच्या गळाला एक मोठा मर्लिन मासा लागतो. सुरवातीला म्हाताऱ्याला त्याच्या आकाराचा अंदाजच येत नाही, पण गळाच्या खेचण्यावरून आणि होडीला बसत असलेल्या ओढीवरून हे भलं मोठं घबाड असल्याचं त्याला जाणवतं. नंतर मासा अचानक पाण्याबाहेर झेपावतो, तेव्हा त्याचा आकार पाहून म्हातारा अवाकच होतो. तो त्याच्या होडीपेक्षाही किती तरी मोठा असतो. दोन दिवस आणि रात्री तोंडात गळ रुतलेला हा मासा म्हाताऱ्याला झुंजवत राहतो. म्हातारा त्यात जखमी होतो, गळाचे दोरखंड कचल्याने त्याचे हात काम देईनासे होतात. पण तो जिद्द सोडत नाही. नंतर दमून होडीभोवती गिरक्या मारणाऱ्या माशाला म्हातारा बर्चीच्या साह्यानं मारतो. त्याचं धूड आत घेणं शक्य नसल्यानं होडीला बांधतो. गलितगात्र झालेला म्हातारा खोल समुद्रातून किनाऱ्याकडे जायला निघतो तेव्हा अक्राळविक्राळ शार्क मासे त्याच्या मर्लिन माशावर ताव मारण्यासाठी हल्ले करीत राहतात. म्हातारा त्यांना बर्चीनं, सुऱ्यानं भोसकतो, वल्ह्यानं बदडत राहतो. शार्कच्या हल्ल्यातून केवळ मर्लिन माशाचं डोकं आणि शेपटी वाचते, बाकी सगळा मांसल भाग शार्क फस्त करतात. दमलेला, थकलेला म्हातारा चौथ्या दिवशी पहाटे बंदरात पोचतो. त्याच्या होडीला बांधलेला माशाचा भलामोठा सांगाडा गावात चर्चेचा विषय बनतो. म्हाताऱ्याच्या शौर्यानं भारावून गेलेला छोटा मनोलिन रडत रडत आपल्या जखमी गुरुच्या सेवेला लागतो. आख्खं गाव म्हाताऱ्याच्या शौर्याची तारीफ करत असतं.

देशमुख आणि कंपनीनं सन १९६५ मध्ये ही कादंबरी मराठीत आणली. ‘एका कोळीयाने’ या नावानं तिचं सुरेख भाषांतरण केलं आहे पु. ल. देशपांडे यांनी. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कोळ्यांशी, जाणकारांशी संपर्क साधून मासेमारीतले बारकावे जाणून घेतले. आधी हा अनुवाद वि. स. खांडेकर करणार होते, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांना हे काम पूर्ण करता आलं नाही. ‘पु. लं.’ नी अर्नेस्ट हेमिंग्वेचा हा म्हातारा मराठीत ताकदीनं आणला आहे. आनंदाची बाब म्हणजे पुठ्ठा बांधणीतील दर्जेदार छपाई असलेलं हे पुस्तक मूळ इंग्रजी पुस्तकाप्रमाणे रंगीत चित्रांनी सजलं आहे. त्यामुळं त्यात एकप्रकारचा जिवंतपणा आला आहे. खूप कमी मराठी पुस्तकांच्या वाट्याला असं भाग्य येतं. ही छोटेखानी कादंबरी खरं तर एकाच बैठकीत हातावेगळी करता येते. ‘पु. लं’चा परिसस्पर्श झाल्यानं तिचं भाषावैभव अफलातूनच!

समुद्रावरच्या एकटेपणाला कंटाळलेल्या म्हाताऱ्याला स्वतःशीच बोलायची सवय लागलेली. त्यासंदर्भातील एक उतारा येथे देण्याचा मोह टाळता येण्यासारखा नाही...

-----------------

तिसऱ्या फेरीच्या वेळी मात्र त्याला तो मासा प्रथम दिसला. सुरवातीला त्याला तो लांब सावलीसारखा वाटला. ती गडद सावली इतका वेळ सरकत गेली की तिच्या लांबीवर त्याचा विश्वासच बसेना. ‘‘छे! तो इतका मोठा असणं शक्यच नाही,’’ म्हातारा स्वतःशीच म्हणाला. पण खरोखरीच तो तितका मोठा होता. एखाद्या भल्याथोरल्या कोयत्याच्या पात्याहून उंच फिकट जांभळ्या रंगाची त्याची शेपटी गडद निळ्या पाण्यावर आली होती. मासा आता चक्कर मारून आत वळत होता. शांत आणि देखणा दिसत होता तो. फक्त त्याचं भलंमोठं शेपूट काय ते हलत होतं. ‘‘काही झालं तरी तुला मरायचंच आहे रे माशा! पण माशा माझाही जीव घेतलाच पाहिजे का तुला?’’ म्हातारा म्हणाला. म्हाताऱ्याने दोर सोडला आणि त्याच्यावर पाय रोवला. बर्ची जितकी वर उचलता येईल तितकी उचलली आणि माणसाच्या छातीइतक्या उंचीवर चढलेल्या आणि वर उघड्यावर आलेल्या त्या माशाच्या भल्यामोठ्या छाताडाच्या पंखाच्या मागच्या बाजूला आपल्या अंगचं बळ एकवटून खोल खुपसली. मग स्वतःचं मरण शरीरात भिनलेलं असतानाही तो मासा तरारून वर आला. आपली ती विशाल लांबी, रुंदी, सारी ताकद आणि लावण्य याचं दर्शन घडवीत पाण्यावर उंच उभारून राहिला. मग तो म्हाताऱ्याच्या अंगावर आणि साऱ्या होडीवर पाण्याचा फवारा उडवीत समुद्रात दाणकन कोसळला.

-------------

जगभर डंका वाजवला गेलेल्या या कादंबरीची दखल चित्रपट क्षेत्राने घेतली नसती तरच नवल! सन १९५८ मध्ये स्पेन्सर ट्रेसीची मुख्य भूमिका असलेला चित्रपट आला. मूळ साहित्यकृतीला फारसा न्याय तो देऊ शकला नाही. पुढे १९९० मध्ये अँथोनी क्वीनने म्हाताऱ्या नायकाची भूमिका साकारलेला चित्रपट तुलनेने उजवा ठरला. त्यापेक्षाही सुरेख एक ॲनिमेशनपट आला. हा लघुपट यू ट्यूबवरही उपलब्ध आहे.

आपण आपल्या आवाक्याचे, क्षमतांचे, मर्यादांचे गुलाम असतो. त्यांना आव्हान मिळेल अशी कोणतीही गोष्ट करायला धजावत नाही. त्यामुळं आपली होडी कधी खोल समुद्रात जातच नाही. काठावरच ती हेलकावत राहते. जिद्द, चिकाटी नसेल, प्रयत्नांचा अभिषेक नसेल तर भव्यदिव्य यश कसे मिळणार? ते हवं असेल तर म्हाताऱ्यासारखा चिवटपणा अंगी बाळगायला हवा. वारंवार अपयश आलं तरी आपली होडी खवळलेल्या दर्यात लोटायला हवी. अंगात बळ नसलं तरी चालेल, पण मीच जिंकेन हा आत्मविश्वास असेल तर दर्याचं पोट चिरून हवा तो मासा बाहेर खेचण्याचं सामर्थ्य आपल्या ठायी असतंच असतं. त्याचं प्रभावी आविष्करण झालं तर मानव अजिंक्य ठरतो, हा हेमिंग्वेचा विश्वास मला तरी सार्थ वाटतो. तुम्हाला काय वाटतं?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com